Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बिजवडी येथे फटाक्यांची ठिणगी पडून दोन गाड्या भस्मसात
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: re1
5बिजवडी, दि. 11 :  येथील मधुयोग मंगल कार्यालयात दुपारी 3 च्या सुमारास विवाह पार पडल्यानंतर फटाके वाजवण्यात आले. त्याप्रसंगी माळरानात ठिणगी पडल्यामुळे गवत पेटून  विवाहासाठी आलेल्या नागरिकांनी लावलेल्या गाड्यांनी पेट घेतला. यामध्ये दोन चारचाकी गाड्या जळून खाक होऊन अंदाजे 
सात लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील मधुयोग मंगल कार्यालयात आज दुपारी 3.05 मिनिटांनी विवाह सोहळा पार पडला. त्या विवाह सोहळ्यासाठी तोंडले (डांगेवाडी), ता. माण व कोरेगाव येथील वर्‍हाड आले होते. मंगल कार्यालयासमोरीस मोकळ्या पटांगणावर सर्व वाहने पार्किंग करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर कार्यालयाच्या गेटवर फटाके वाजवण्यात आले. वार्‍यामुळे फटाक्यांची ठिणगी गेटच्या बाहेरील मोकळ्या पटांगणावर असलेल्या वाळक्या गवतात पडली.  त्यामुळे गवताने अचानक पेट घेतला. वार्‍यामुळे काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. बघता बघता ही आगी पार्किंग केलेल्या वाहनांकडे गेली. त्या आगीत कळस्करवाडी, ता. माण येथील शंकर भिकू पवार यांनी दोन महिन्यांपूर्वीच घेतलेली मारूती ओमनी (क्र. एम.एच.11 सीजी 4795) ही गाडी तर उरळी कांचन, ता. हवेली येथील संजय हरिभाऊ डांगे यांची मारूती ऑल्टो (क्र.एम.एच.12 जेझेड 8028) ही गाडीही जळून खाक झाली. या गाडीत महत्त्वाची कागदपत्रे व काही पैसे होते. प्रसंगावधान राखून ती बॅग बाहेर काढण्यात यश मिळाले. मधुयोग मंगल कार्यालयाच्या मालकाच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरने तसेच पाणी पिण्यासाठी आणलेले कॅन युवा कार्यकर्त्यांनी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
गाड्यांनी पेट घेतल्यानंतर आगीची झळ इतर गाड्यांना पोहोचू नये म्हणून काही युवकांनी बाकीच्या गाड्या त्या ठिकाणाहून दूर हटविल्या, अन्यथा आणखी काही गाड्यांनी पेट घेतला असता. जळालेल्या दोन्ही गाड्या गॅसवर होत्या. या गाड्यांमधील गॅसच्या टाक्यांनी पेट घेतला असता तर मोठा अनर्थ घडला असता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेचा दहिवडी पोलिसांनी पंचनामा केला असून सपोनि. प्रवीण पाटील तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: