Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अभियांत्रिकी सहाय्यक व लिपिकाला पाच हजाराची लाच घेताना अटक
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 12 : बरड, ता. फलटण ग्रामपंचायतीचे लिपिक अनंत हरिभाऊ लंगुटे (वय 32, रा. लंगुटेवस्ती, बरड) व जिल्हा परिषदेच्या फलटण बांधकाम उपविभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रफुल्लकुमार हणमंतराव भोसले (वय 35, सध्या रा. संजीवराजेनगर, फलटण, मूळ रा. संगमनेर, ता. भोर, जि. पुणे) यांना 5 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूल कामाचा मूल्यांकन दाखला फलटण पंचायत समिती येथे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराला 5 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. घरकूल कामाचा मूल्यांकन दाखला मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पैसे मागितले असून ते द्या, म्हणजे तुमचा चेक काढला जाईल, असे म्हणत बरड ग्रामपंचायतीचा लिपिक अनंत लंगुटे हा पैसे मागत होता. लाचलुचपत अधिकार्‍यांनी त्याला ग्रामपंचायत कार्यालयासमोर रंगेहात पकडले. त्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रफुल्लकुमार भोसले यांचे नाव घेतल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बरड ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षे प्रशासक असल्याने या काळात लेखी व तोंडी तक्रारी झाल्याने लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, फलटण पंचायत समिती या ठिकाणाहून संबंधित प्रकरणी काही कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचे समजते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलीस कर्मचारी अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर व विशाल खरात यांनी ही कारवाई केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: