Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

निवडणुका जिंकायसाठी
vasudeo kulkarni
Tuesday, February 13, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: lolak1
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू मित्र आणि सल्लागार. फडणवीस यांनी मैत्रीला जागूनच, मुख्यमंत्री होताच चंद्रकांत दादांना आधी मंत्री केले आणि नंतर एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्रिपद सोडल्यावर ते खाते चंद्रकांत दादांच्याकडे दिले. मंत्रिमंडळातले दुसर्‍या क्रमांकाचे हे खाते. राज्याचा महसूल कसा वाढवायचा, यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणतानाही चंद्रकांत दादांना आपल्या भारतीय जनता पक्षाचा मतांचा महसूलही वाढवायची काळजी घ्यावी लागते आहे. ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री असले, तरी आपल्या लाडक्या कोल्हापूर जिल्ह्याला ते वारंवार भेटी देतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटतात. कधी कर्नाटकातल्या जाहीर समारंभात कर्नाटकचे गीत गातात, या राज्यात जन्मायला यायला भाग्य लागते, अशी इच्छाही व्यक्त करतात. त्यांच्या या कर्नाटकातल्या सभेतल्या भाषणाने वादळही उठले. पण, या असल्या वादळाला घाबरेल तर तो भुदरगडचा पाटील कसला? छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुदरगड किल्ल्याच्या परिसरात झालेल्या युद्धसंघर्षामुळेच, त्यांना शब्दांचे दांडपट्टेही  चांगलेच चालवता येतात. काही झाले, तरी सत्ता मिळवा आणि टिकवा, हेच भाजपचे एकमेव ध्येय असल्याने, चंद्रकांतदादा स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकांच्या सत्ताही पक्षासाठी काबीज करायच्या मोर्चे बांधणीत गर्क आहेत. आपल्या पक्षाचे निवडणुका जिंकायच्या डावपेचात पक्षाच्या क्रियाशील कार्यकर्त्यांना तरबेज करायची जबाबदारी सध्या त्यांच्यावर आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली सांगली महापालिका काबीज करायसाठी त्यांनी शहरातल्या भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात, पक्षाला मते मिळवायसाठी जनसंपर्क कसा वाढवावा, घराघरात चार पाच वेळा जावे, घरातल्यांची विचारपूस करावी, मग अशा वाढत्या स्नेहाने प्रत्येक बूथवर किमान 350 ते 400 हक्काचे मतदार तयार होतील आणि निवडणूक जिंकता येईल, अशी मतदारांच्या मनात पक्षाबद्दल विश्‍वास निर्माण करायची  गुरुकिल्ली त्यांनी सांगितली. पण, मतदारांचा फक्त विश्‍वास मिळवून चालणार नाही. निवडणुकीच्या बदलत्या प्रचार तंत्रानुसार भाजपलाही बदलायलाच हवे, याचा अनुभव असल्याने चंद्रकांत दादांनी मतदारांना भेटवस्तू देऊन आपलेसे करा. मतदारांना आपलेसे करायच्या पहिल्या टप्प्यात एक लाख भेटवस्तू आपण बूथ कार्यकर्त्यांना देणार आहोत, असे वचनही त्यांनी दिले असल्याने, दादांनी दिलेल्या भगव्या वेष्टनातील भेटवस्तू काखोटीला मारून किंवा पोत्यात भरून त्या घरोघर वाटणे एवढीच काय ती बूथ कार्यकर्त्यांची जबाबदारी! आता ही भेटवस्तू काय द्यायची हे काही त्यांनी सांगितलेले नाही. दादांनी दिलेली भेटवस्तू घरोघर पोहोचवायची एवढीच                  पक्षाच्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची जबाबदारी. सांगलीत भेटवस्तू घरोघर वाटायची ही युक्ती शेजारच्या  कोल्हापूर शहरात काही चालणार नाही. मग त्यासाठी दादांनी कोल्हापूरकरांच्या आवडत्या ‘मिसळ-पाव’ची पार्सले महिला मंडळांना घरोघर पोहोचवायची व्यवस्था करावी. पुरुष मतदारांसाठी गल्लीगल्लीत रस्सा मंडळांना विश्‍वासात घेवून त्यांच्यावर मतदारांना रश्श्याच्या पार्ट्यांचे आयोजन करावे. त्यासाठी शहरातल्या रस्सा मंडळांची यादी  कार्यकर्त्यांच्याकडून तयार करून घ्यावी. एकदा का रस्सा मंडळांच्या भाजपच्या पार्ट्या सुरू झाल्या, की भाजपचे काम अधिकच सुकर झाले. बरे, कोल्हापूरकर मंडळी खाल्ल्या मीठाला जागणारी. ती काही आपल्याला कुणी आणि कोणत्या पक्षाने रस्सा दिला, हे विसरणार नाहीत. भाजपच्या उमेदवारांनाच निवडून देतील. मिसळपाव अणि रस्सा, ही कोल्हापूर महापालिकेच्या  निवडणुका जिंकायची गुरुकिल्ली असल्याने चंद्रकांत दादांनी कोल्हापूरकरांना खूश करून त्यांचा विश्‍वास मिळवायसाठी हे करावेच!  
लोकांना खाऊ घालणे हे पुण्याईचेच काम असल्याने, पुरोगाम्यांनी कितीही टीका केली, तरी चंद्रकांत दादांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जिंकायसाठी अशी मोर्चेबांधणी करावीच!
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: