Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

गाता शिवमहिमा...
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: st1
भारतात मोठ्या संख्येने शिवउपासक आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाची आराधना केली जाते. भाविक त्याच्या पायी नतमस्तक होतात. मूर्तिशास्त्राचा अभ्यास करताना शिवाच्या नानाविध मूर्ती समोर येतात. मूर्तींमधले असे वैविध्य अन्य कोणत्याही देवतेबाबत आढळत नाही. शिव ही लयाला कारक असणारी देवता असली तरी ती भोळीदेखील आहे. शिव नृत्यनिपुण आहे. त्याची ही सगळी रूपे मूर्तींमध्ये आढळतात
भारतवर्षामध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्साह आणि आनंदात साजरी होते. या दिवशी शिवाची आराधना केली जाते. अभिषेक, पूजादी विधी केले जातात. शिवभक्त मोठ्या श्रद्धेने शिवपूजेत मग्न होतात. असा हा शिव अनेकांची आराध्यदेवता आहे. आपल्याकडे त्रिमूर्ती म्हणतात त्यात ब्रह्मा सृष्टीकर्ता, विष्णू पालनकर्ता आणि शिव हा संहारक अशी माहिती  येते. पण पुराणाच्या आधीदेखील वेदवाड्मयामध्ये शिवाचा उल्लेख रुद्र म्हणून आला आहे. तोही विचारात घ्यायला हवा. यावरूनच आपल्याला शिवाची प्राचीनता समजू शकेल. शिव दोन प्रकारांमध्ये पूजला जातो. एक म्हणजे शिवलिंग आणि दुसरे म्हणजे शिवाची मूर्ती. आपण शिवलिंगाला पिंड असंही म्हणतो. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ अशी एक म्हण आपल्याकडे ऐकायला मिळते. याचा अर्थच शिव हा ब्रह्मांड व्यापून टाकणारा देव आहे असा होतो. खरं तर सर्वार्थाने शिवाची महती आपल्या लक्षात आलेली नाही.
शिवलिंगाचे पूजन
 सिंधू संस्कृतीच्या काळापासून म्हणजे सुमारे 5000 वर्षांपासून आपल्याला शिव माहीत आहे. ब्रह्मा अथवा विष्णूची इतकी प्राचीन मूर्ती अद्याप तरी मिळालेली नाही. शिवाच्या दृष्टीने विचार करता विष्णू आणि ब्रह्मा जास्त पुरस्कृत देव आढळतात. शिव मात्र विचित्र वेशभूषा, केशभूषा, विचित्र अलंकार अशा रूपात समोर येतो. तो नरमुंड माळा मिरवणारा, व्याघ्रचर्म ल्यालेला, जटाजूटधारी, भस्मार्चन करणारा आणि स्मशानात राहणारा आहे. असे असले तरी तो मनाने भोळा आहे. तो आशुतोष म्हणजे अल्पसंतुष्ट आहे. अमरकोशात शिवाला 48 नावांनी संबोधले आहे. पुराणादी वाड्.मयातून त्याच्या उपकारक आणि संहारक अशा प्रकारच्या कथा प्रसिद्ध आहेत. आपल्याकडील मूर्तिकारांनी या कथांना रूप दिले आहे. शिवाची पूजा लिंगरूपाने होत असली तरी क्वचित ठिकाणी शिवाची मूर्तीही प्रतिष्ठापित झालेली दिसते. उदाहरणार्थ तमिळनाडूतील चिदंबरम येथील मंदिरात शिवाची मूर्ती आढळते.
अन्य देवतांच्या शिवाइतक्या वैविध्यपूर्ण मूर्ती उपलब्ध नाहीत. या देवतेच्या केवल शिव, वृषवाहन शिव, सोमस्कंद शिव अशा प्रकारच्या सामान्य मूर्ती असल्या तरी काही विशेष मूर्तीही उपलब्ध आहेत. आजूबाजूला पार्वती, गणपती, कार्तिकेय असे कोणीही नसलेली, केवळ शिव असणारी ती केवलशिव मूर्ती. नंदीसह असतो तो वृषवाहन शिव आणि उमा आणि कार्तिकेयाबरोबर तो बसलेला आहे असे दाखवणारी मूर्ती म्हणजे स्कंदशिव. या शिवाच्या सामान्य मूर्ती आहेत. त्याच्या विशेष मूर्तींचे काही गट आहेत. त्यांना संहार मूर्ती, अनुग्रह मूर्ती, दक्षिणा मूर्ती असे म्हणतात. संहार मूर्तीमध्ये शिव वध केलेल्या राक्षसांच्या आकृतींसह असतो. उदाहरणार्थ अंधकासुर शिवमूर्ती-मध्येे शिव अंधक नावाच्या राक्षसाला ठार करताना दिसतो. याच धर्तीवर शिवाची त्रिपुरांतक मूर्ती आहे. यात शिव त्रिपुरांतक नावाच्या राक्षसाचा वध करताना दिसतो. गजासुरवधमूर्ती म्हणून शिवाची एक संहारमूर्ती आढळते. त्यात शिवाने इतर देवांना आपापल्या शक्ती देण्याचे आवाहन करून, त्या शक्ती मिळवून गजासुराचा वध केला. दक्षिणेमध्ये या गजासुर वधाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.काही प्रमाणात महाराष्ट्रातही आढळतात.
विविध रूपातील शिवशिल्पे
सांगायचे कारण एवढेच, की ‘परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष़्कृताम’ असे आपण म्हणतो ते इथे दृष्टीस पडते. शिवाने जनसामान्यांना छळणार्‍या, यज्ञसंस्थेचा नाश करणार्‍या दुष्ट राक्षसांचा नि:पात केला. परिणात्राणाय साधूनाम हा प्रकार शिवाच्या अनुग्रह मूर्तींमध्ये आढळून येतो. उदाहरणार्थ शिवाची मार्कंडेयानुग्रह-मूर्ती आढळते. अंबरनाथच्या देवळावर, वेरुळच्या लेण्यांमध्ये अशा मूर्ती आढळतात. अशाच एका मूर्तीला अर्जुनानुग्रहमूर्ती म्हणतात. इथे शिवाने अर्जुनाला पाशुपातास्त्र दिल्याचे दाखवले जाते. शिव भिल्लाच्या रूपात अर्जुनासमोर आल्याचे यात दाखवले जाते. महाभारतात याच पाशुपतास्त्राने अर्जुनाने कर्णाचा वध केल्याचं वर्णन आढळते. अनुग्रहाची यापेक्षाही एक चांगली मूर्ती म्हणजे रावणानुग्रह मूर्ती. कुबेराचा पराभव केल्यानंतर परतत असताना रावणाला कैलास पर्वत दिसतो. तिथे प्रवेश करण्यास मज्जाव झाल्याने रावण चिडतो आणि हा पर्वत उखडून टाकण्याचा प्रयत्न करतो. रावण सर्व शक्तिनिशी कैलास हलवू लागतो तेव्हा शिवाला तो रावणच असल्याची खात्री पटते. पण अत्यंत शांतपणे तो आपल्या अंगठ्याने रावणाला पाताळात दाबून टाकतो. ही शक्ती शिवाशिवाय कोणाचीही नाही हे जाणल्यामुळे रावण शिवाची स्तुती करू लागतो. ही शिवस्तुती अत्यंत प्रसिद्ध आहे. ही स्तुती ऐकून शिव प्रसन्न होतोे आणि रावणाला भेटस्वरूपात वीणा देतो. या कथेवर आधारलेली उत्तम शिल्पाकृती वेरुळच्या कैलास लेण्यात आहे.
अनुग्रहाच्या असो, की संहाराच्या,  अन्य देवतांच्या अशा कथा आणि शिल्पे आढळत नाहीत. या कथा शिवाचे महत्त्व सांगणार्‍या असल्या तरी शिव हे दैवत म्हणून किती मोठे हे या कथांमधून पुढे येतेच असे नाही. शिवाच्या विशेष मूर्तीमध्ये दक्षिणामूर्ती आढळते. दक्षिणा म्हणजे ज्ञान. दक्षिणेमध्ये शिवाच्या देवळात दक्षिणेकडे तोंड करून असणारी शिवाची अशी दक्षिणामूर्ती असते.  या मूर्ती दोन-तीन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे व्याख्यान दक्षिणामूर्ती, दुसरी आहे ध्यान दक्षिणामूर्ती, तिसरी म्हणजे वीणा दक्षिणामूर्ती. शिव उत्तम गायक आहे, त्याच्याजवळ वीणा असते. शिवाचे हे रूप दाखवणार्‍या मूर्तीला वीणा दक्षिणामूर्ती म्हणतात. आपल्याकडे नृत्य दक्षिणामूर्तीदेखील आढळते. शिवाचे 108 प्रकाराचं तांडव-नृत्य आपल्याला माहीत आहे. याशिवाय उमातांडव, प्रदोषतांडव, आनंदतांडव अशा प्रकारचे नऊ तांडव आहेत. म्हणजेच शिव इतक्या प्रकारांमध्ये नृत्य करत असतो. आश्‍चर्य वाटेल पण इतक्या प्रकारच्या मूर्ती चिदंबरम येथील देवळामध्ये कोरलेल्या आढळतात. तंजावरच्या मंदिरातही शिवाच्या 108 मूर्ती असून त्यांची नावंही खाली कोरलेली आहेत.
गंगाधर शिवमूर्ती
शिवाने भगीरथाच्या विनंतीवरून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली. त्याला गंगाधर शिव म्हणतात. अशा प्रकारच्या तीन मूर्ती असतात. स्वर्गातून गंगा खाली येत असते त्याला गंगावतरण म्हणतात. गंगा शिवाच्या डोक्यावर दाखवलेली असते तो गंगाधर शिव असतो. केसाच्या एका बटीतून शिव गंगेला सोडून देतो तेव्हा त्याला गंगाविसर्जन मूर्ती म्हणतात. गंगेचा सोडून दिलेला हा प्रवाह खाली तपश्‍चर्या करणार्‍या जन्हू नावाच्या ऋषींनी गिळून टाकलेला असतो. प्रार्थना केल्यानंतर ते कानातून गंगेचा प्रवाह सोडून देतात. म्हणून जान्हवी हे गंगेचं एक नाव आहे. शिवाच्या या मूर्तीही खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. आम्ही नागपूर जिल्ह्यात उत्खनन केले तेव्हा शिवाच्या अगदी वेगळ्या प्रकारच्या दोन मूर्ती आढळल्या. एका मूर्तीच्या देहावर आठ तोंडे आहेत. मूर्तीचं एक मुख्य मुख आहे तर त्याच्या खांद्यावर दोन तोंडे आहेत, मानेवरच्या एका तोंडाला आणखी तीन तोंडं फुटलेली आहेत. म्हणजे चार दिशेला चार तोंडे आहेत. शिवाय जंघामुलावर दोन तोंडे आहेत. अशा शिवाला अष्टमूर्ती शिव म्हणतात. ‘शांकुतल’मध्ये सुरुवातीलाच या मूर्तीचा उल्लेख आढळतो. बंगालचे सेन, पाल राजे अष्टमूर्ती शिवाचे उपासक होते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, चंद्र, सूर्य आणि शिव असे मिळून एकत्र झालेली शक्ती या अष्टमूर्तीमध्ये दाखवली जाते. असा दुसरा देव आढळत नाही. याशिवाय आम्हाला बारा तोंडे असणार्‍या शिवाची मूर्तीही आढळून आली. नागपूरमधील मांढळमध्ये ही मूर्ती आढळली. या मूर्ती-मध्ये शिवाच्या मानेवरील चार तोंडांच्या वरदेखील चार तोंडे आहेत. म्हणजेच मानेवर एकूण आठ तोंडे आहेत. वरची तोंडे उपदिशांकडे आहे. याला द्वादशशिव म्हणतात. सर्वपार्श्‍वमुखशिव या नावानेही ही मूर्ती ओळखली जाते. इथे शिवाचे सर्वव्यापी स्वरूप दाखवले आहे. हे शिवाचं दुर्मीळ रूप अशीच एक मूर्ती आम्हाला मार्कंडी या ठिकाणी आढळली. खजुराहोलादेखील अशा दोन मूर्ती आढळून आल्या. त्या सदाशिवाच्या असल्या तरी वैशिष्ट्य म्हणजे त्यांना चार पाय आहेत. दोन खाली सोडलेले आहेत तर दोन पायांची मांडी घातली आहे. हे चार पाय म्हणजे शैव सिद्धांताचे चार पाद आहेत. ब्रह्माचे आकलन होण्यासाठी जे तत्त्वज्ञान सांगितले गेले त्याला शैव सिद्धांत म्हणतात. त्याची चार प्रमेय म्हणजेच चार पाद आहेत. आपल्या कलाकारांनी शिल्प-श्‍लेष करत पाद याचा अर्थ पाय असा घेतला आणि चार पाय असणारी मूर्ती घडवली. अशी मूर्ती मूर्तिशास्त्रातील एक महत्त्वाचे स्थित्यंतर म्हणून ओळखली जातो.        - गो. बं. देगलुरकर
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: