Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

मांज्याचे बळी
vasudeo kulkarni
Tuesday, February 13, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: vi1
 देशाच्या सर्व भागात पतंग उडवायचा खेळ परंपरेने सुरू असला, तरी पूर्वी पतंग उडवायसाठी दोरा वापरला जात असे. पतंगांच्या काटा-कटीच्या खेळात आपला पतंग काटला जावू नये आणि दुसर्‍याच्या पतंगाचा दोरा काटला जावा, यासाठी काचेच्या चुर्‍याचा वापर करून मांज्याचा दोरा वापरला जात असे. गेल्या काही वर्षात मांज्याच्या या परंपरागत दोर्‍याच्या ऐवजी चिनी आणि नॉयलॉनच्या मांज्याचा सर्रास वापर सुरू झाला. हा मांजा सहजासहजी तुटत नसल्याने आधी पतंगाच्या काटाकाटीच्या खेळासाठी त्याचा वापर होत असे. पण, पुढे मात्र सर्रास गल्लीबोळ आणि छपरावर पतंग उडवणारी मुलेही हाच मांजा वापरायला लागली. गुजरातमध्ये संक्रांत ते फेब्रवारी अखेर दीड महिना राज्यभर उत्साहाने पतंगोत्सव साजरा होतो. नव्या खेळांच्या जमान्यातही पतंग उडवायचा उत्साह काही त्या राज्यात कमी झालेला नाही. पण, चिनी आणि नॉयलॉनच्या मांज्यामुळे त्या राज्यात काही मुलांचे जखमी होऊन बळीही गेले आहेत. पक्ष्यांसाठी तर हा मांज्या म्हणजे मृत्यूचे सापळेच ठरतात. पक्ष्याचा पंख मांज्यात अडकल्यास त्याचा जखमी होऊन बळी जातो. गुजरातमध्ये हजारो पक्ष्यांचा मांज्यामुळे मृत्यू होतो तर महाराष्ट्रातही याच मांज्यामुळे पक्षी जखमी होण्याचे आणि बळी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी दुचाकीवरून जाणार्‍या  सुवर्णा मुजुमदार यांच्या गळ्याला उडवल्या जाणार्‍या पतंगाचा चिनी मांजा अडकल्याने त्यांचा गळा क्षणार्धात चिरला गेला. त्या रक्तबंबाळ झाल्या. रस्त्यावरच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखलही केले. पण, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे पुन्हा एकदा नॉयलॉन आणि चिनी मांंजा पक्ष्यांबरोबरच मानवी जीवितालाही घातक असल्याचे चव्हाट्यावर आल्याने, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चिनी आणि नायलॉनच्या मांज्यावर केंद्र सरकारने आणि राष्ट्रीय हरित न्यायालयानेही कायदेशीरपणे बंदी घातली असली, तरी त्याची सर्रास विक्री सुरूच असल्याचे, पुण्यातल्या घटनेने उघड झाले आहे. स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांनी बंदी असलेल्या चिनी आणि नायलॉनच्या मांज्याची विक्री करणार्‍या दुकानावर छापे घालून हा मांजा तातडीने जप्त करायला हवा. त्याची विक्री करणार्‍यावर कठोर कारवाई करायला हवी. नायलॉन आणि चिनी मांजा वापरणे, त्याची विक्री करणे हा दखलपात्र गुन्हा ठरवून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद केल्याशिवाय या घातक मांज्याच्या विळख्यातून पक्षी आणि लोकांचीही सुटका होणार नाही. पतंग उडवताना आणि कटलेल्या पतंगाचा मांजा विजेच्या तारा, इमारतीवरच्या डिश, विजेच्या तारा आणि झाडांवर अडकून  बसतो. पक्ष्यासाठी तयार झालेल्या या सापळ्यात अडकून शेकडो पक्षी जखमी होतात. हा मांजा पक्ष्यांना चोचीने तोडणे शक्य होत नाही. उलट तो तोडताना पक्षी रक्तबंबाळ-जखमी होतात आणि त्यांची वेळीच सुटका झाली नाही तर त्यांचे मृत्यूही होतात. पतंगाचा खेळ आनंददायी असला, तरी तो निरपराध्यांचे, पक्ष्यांचे बळी घेणारा ठरू नये, अशी अपेक्षा आहे.                  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: