Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

द. आफ्रिकेला मालिकेत आव्हान राखण्याची संधी
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: sp1
5पोर्ट एलिझाबेथ, दि. 12 (वृत्तसंस्था) : आकाशात कडाडणार्‍या विजा, वादळी वारे आणि पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमावलीनुसार कठीण आव्हान असतानाही चौथ्या एकदिवसीय सामन्यात मिळवलेल्या विजयाने दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय मालिकेत आत्मविश्‍वास मिळाला आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकून मालिकेतील आव्हान राखण्याची संधी यजमानांना आहे. दुसरीकडे भारताची मदार पुन्हा एकदा युजवेंद्र चहल व कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीवर असेल. त्याच वेळी भारताच्या मधल्या फळीवरही चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल. उद्याचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने टीम इंडिया सेंट जॉर्जेस पार्क मैदानावर उतरणार असली तरी एबी डीव्हिलियर्सच्या समावेशाने मजबूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
चहल व कुलदीप यादव यांचा भेदक फिरकी मारा आणि शिखर धवन व विराट कोहली यांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिले तीन सामने सहज जिंकून सहा सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त मुसंडी मारली. मात्र, ‘पिंक डे’ला झालेल्या चौथ्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमावलीनुसार कडवे आव्हान असूनही यजमान दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळू न शकलेला डीव्हिलियर्स परतल्याने यजमान संघाचा आत्मविश्‍वास उंचावला. त्यामुळे ‘पिंक डे’ सामन्यात अपराजित राहण्याची परंपरा त्यांनी कायम राखली. या एकाच सामन्यात चहल व कुलदीप या जोडगोळीला दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा तडाखा सोसावा लागला. मात्र, आता यजमान संघाला पुन्हा फिरकीच्या मायाजालात गुरफटून टाकण्यासाठी हे दोघेही उत्सुक आहेत. या दोघांनी चार सामन्यांमध्ये एकूण 24 बळी घेतले असून त्यांना जसप्रीत बूमराहच्या अचूक वेगवान गोलंदाजीची साथ मिळत आहे. बूमराहने हाशिम आमलाला दोन वेळा पायचित पकडण्याचा पराक्रम केला आहे, हीच बाब त्याच्या गोलंदाजीचे बलस्थान दाखवते.
एका बाजूला गोलंदाज जबरदस्त कामगिरी करत असताना फलंदाजीत भारतीय संघ या मालिकेत कर्णधार विराट कोहली व शिखर धवन यांच्यावर अधिक अवलंबून आहे. ज्या सामन्यात हे दोघेही अपयशी ठरतील, तो सामना भारताने गमावलेला असेल, हे निश्‍चित आहे. कोहलीने सलग दोन शतके आणि चौथ्या सामन्यात अर्धशतक ठोकून कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरीत्या पेलली आहे. धवननेही पहिल्या तीन सामन्यांमध्ये अर्धशतके फटकावली तर कारकिर्दीतील शंभराव्या सामन्यात शतक ठोकण्याचा पराक्रमही केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. मात्र, सलामीवीर रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील फलंदाज निराशाजनक कामगिरी करत आहेत. चौथ्या सामन्यातही रोहित बाद झाल्यानंतर कोहली व धवन यांनी डाव सावरतानाच पुन्हा एकदा फटकेबाज शतकी भागीदारी केली. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर पुढचे पाच फलंदाज अवघ्या 76 धावांत गारद झाले. हीच बाब डकवर्थ-लुईस नियमावली लागू झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या पथ्यावर पडली. त्यामुळे त्यांना विजयासाठी 28 षटकांत 202 धावांचे आव्हान मिळाले. पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढल्याने चेंडूवर पकड मिळवण्यास भारतीय फिरकीपटूंना अडचण येत होती. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक खराब चेंडू पडले. त्याचा फायदा उठवत दक्षिण आफ्रिकेने आवश्यक असलेला विजय मिळवला.पहिल्या सामन्यानंतर पुढच्या दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पार ढेपाळली होती. मात्र, डीव्हिलियर्स परतल्यानंतर त्यांनी चौथ्या सामन्यात छान कामगिरी केली. आमला व एडन मार्क्रम यांनी 43 धावांची सलामी दिल्यावर डीव्हिलियर्स, डेव्हिड मिलर, हेन्रिच क्लासीन व अँडिल फेलुक्वायो यांनी जबरस्त फटकेबाजी करत आपल्या संघाला मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला. उद्यादेखील याच फलंदाजांकडून दक्षिण आफ्रिकेला मोठ्या अपेक्षा आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: