Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: na2
एक जवान शहीद, सतर्क जवानांमुळे हा प्रयत्न फसला
5श्रीनगर, दि. 12 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 23 व्या बटालियनच्या तळावरही सोमवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्क जवानांमुळे हा प्रयत्न फसला. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला. सध्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. चकमकीत एक जवान शहीद झाला आहे.
श्रीनगरमधील श्री. महाराजा हरीसिंह रुग्णालयापासून काही अंतरावर सीआरपीएफचे मुख्यालय आहे. या तळावर निवासी इमारती देखील आहेत. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मुख्यालयातील एका जवानाला दोन संशयित दहशतवादी दिसले. दोन्ही दहशतवादी गोळीबार करत तळाच्या दिशेने येत होते.
सतर्क जवानाने दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या प्रत्युत्तरानंतर दोन्ही दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. दहशतवादी तळाजवळील एका इमारतीमध्ये लपून बसले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी जम्मूतील सुंजवा लष्करी तळावर जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये एका नागरिकासह पाच जवान शहीद झाले. हल्ला करणार्‍या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले असले तरी या हल्ल्यामुळे लष्करी तळांवरील सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. 24 तासांपेक्षा अधिक वेळ ही चकमक सुरू होती. या पाठोपाठ हा हल्ला झाल्याने श्रीनगरमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, सीमा रेषेवरही पाकच्या कुरापती सुरुच आहेत. पाक सैन्याने पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात रविवारी एका महिलेचा मृत्यू झाला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: