Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या ते रामेश्‍वरम रामराज्य रथयात्रा रवाना
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: na4
5लखनौ (उत्तर प्रदेश), दि. 13 (वृत्तसंस्था) : राम मंदिर बनवण्याची शपथ घेऊन अयोध्येतून रामराज्य रथयात्रा मंगळवारी रवाना झाली. 40 दिवसांनंतर रामराज्य रथयात्रा रामेश्‍वरममध्ये पोहोचणार आहे. तेथेच या यात्रेचा समारोप देखील होणार आहे.
रामदास मिशनची ही रथयात्रा असल्याचे म्हटले जात असले तरी या यात्रेमागे भाजप, विश्‍व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद एकवटली आहे. या यात्रेच्या रुपाने कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून वातावरण तापवण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे.
अयोध्येच्या कारसेवकपुरममध्ये साधू-संत, भाजप आणि विहिंपचे नेते जमा झाले होते. तेथे भाषणे झाली, पूजा झाली, अयोध्येत राम मंदिर बनवण्याची शपथ घेण्यात आली, ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर रामराज्य रथयात्रा अयोध्येतून रामेश्‍वरमसाठी रवाना झाली. महाशिवरात्रीला सुरू झालेल्या या रथयात्रेचा रामनवमीला समारोप होईल.
रामदास मिशनचे महामंत्री शक्ती शांतनंद म्हणाले, आता सगळीकडे सरकार केवळ रामभक्तांचेच बनतील. पाहा दिल्लीत (केंद्रात) मोदी तर यूपीत योगी आहेत. आता वेळ बदलत आहे. रामदास मिशन आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जुने नाते आहे. त्यामुळे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी योगींना बोलावण्यात आले होते. मात्र त्रिपुरातील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या  योगींना इथे उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे रथयात्रा सुरू  करण्यासाठी फैजाबादहून भाजप खासदार लल्लू सिंह आणि अयोध्येहून भाजपचे महापौर पिंटू उपाध्याय आले होते. विहिंपचे महामंत्री चंपत रायही उपस्थित होते.
यात्रेसाठी जे रथ तयार करण्यात आले आहेत ते राम मंदिराच्या प्रतिकृतीसारखे आहे. यात्रेच्या मार्गात मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही दोन राज्यही आहेत. याच वर्षी एप्रिल-मे महिन्यात कर्नाटकमध्ये तर वर्षअखेरपर्यंत मध्य प्रदेशात निवडणुका होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये सरकार आणण्याचे तर मध्य प्रदेशात सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. त्यासाठी रामराज्य रथयात्रा मदतीला धावेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रथयात्रेचा प्रवास कसा असेल?
दि. 15 फेब्रुवारी रोजी वाराणसी,  16 रोजी अलाहाबाद,  17 रोजी चित्रकूट, 19  रोजी भोपाळ,  20 रोजी  उज्जैन,  21 रोजी  इंदौर,  25 रोजी  औरंगाबाद,  8 मार्च रोजी बंगलोर,  10 रोजी म्हैसूर,  13 रोजी  कोझीकोड,  21 रोजी  रामेश्‍वरम व 22 रोजी  कन्याकुमारी येथे पोहोचणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: