Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

दक्षिण आफ्रिकेत भारताचा ऐतिहासिक मालिका विजय
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: sp1
कुलदीप यादवच्या फिरकीची जादू
5पोर्ट एलिझाबेथ, दि. 13 (वृत्तसंस्था) :  तब्बल 26 वर्षानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेत पाचवा एक दिवसीय सामना 73 धावांनी जिंकत मालिकेवर कब्जा केला. सहा सामन्यांच्या मालिकेत भारताने आतापर्यंत 4 तर आफ्रिकेने 1 सामना जिंकला आहे. अद्याप एक सामना बाकी आहे. मंगळवारी झालेल्या पाचव्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 73 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात 42.2 षटकात 201 धावांपर्यंतच मजल मारता आली. आजच्या विजयात कुलदीप यादव याचा सिंहाचा वाटा आहे. त्याने 10 षटकात 57 धावा देत 4 गडी बाद केले. त्याला यजुवेंद्र चहल याने 9.2 षटकात 43 धावा देत दोन गडी बाद करत उत्तम साथ दिली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, रबाडाने धवनला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. धवनने 23 चेंडूत 34 धावा केल्या. त्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला. बर्‍याच दिवसांनी फॉर्ममध्ये परतलेल्या रोहित शर्माने आज दमदार खेळाचे प्रदर्शन केले. रोहित आणि विराटने दुसर्‍या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी करत भारताला दीडशेचा टप्पा पार करून दिला. परंतु रोहित शर्माच्या चुकीमुळे विराट कोहली (36) धावचीत झाला. त्यानंतर रोहितने धाव घेताना पुन्हा एकदा चूक केल्याने अजिंक्य रहाणेला माघारी परतावे लागले.
रोहितने एक बाजू लावून धरत आपले शतक पूर्ण केले. रोहितचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे सतरावे शतक ठरले. या दरम्यान, रोहितने श्रेयस अय्यरसोबत 60 धावांची भागीदारी रचली.  पण एन्डिगीने  रोहित शर्मा (115), हार्दिक पांड्या (0) आणि श्रेयस अय्यरला (30) धावांवर झटपट बाद करत भारताला अडचणीत आणले. अखेर महेंद्रसिंग धोनी (13) आणि भुवनेश्‍वर कुमार ( नाबाद 19) यांच्या सावध खेळाच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 7 बाद 274 धावा कुटल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एन्डिगीने चार आणि रबाडाने एक गडी बाद केला. भारताचे दोन फलंदाज धावबाद झाले.
रोहित शर्माच्या 115 धावांच्या बळावर भारताने 7 बाद 275 धावा केल्यानंतर मैदानात उतरलेले आफ्रिकेचे सलामीवीर हाशिम आमला व एडन मार्क्रम यांनी डावाची सुरुवात सावध केली. त्या नंतर या दोघांनी जम बसवत फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. परंतु जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विराट कोहलीकडे झेल देत एडन मार्क्रम माघारी परतला. त्यानंतर जे. पी. ड्युमिनी अवघ्या एका धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठच हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर एबी डिव्हीलियर्सही तंबूत परतला. त्यामुळे आफ्रिकेची परिस्थिती खूपच नाजूक झाली होती. एका बाजूने हाशिम आमला भारतीय गोलंदाजांचा सामना करत होता. त्यानंतर त्याच्या जोडीला आलेल्या डेव्हिड मिलरने आफ्रिकेचा डाव सावरत आमला व मिलर यांनी अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर आफ्रिकेने शंभरचा टप्पा कसा तरी पार केला. परंतु चहलने मिलरचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडण्यात यश मिळवले. त्यानंतर आलेल्या क्लासेनने आमलाला चांगली साथ करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जम बसवत असतानाच हार्दिक पांड्याच्या अचूक चेंडू फेकीमुळे हाशिम आमला धावबाद झाला. फेलुक्वायो याला कुलदीप यादवने त्रिफळाचीत केल्यामुळे आफ्रिकेची अवस्था बिकट झाली होती. क्लासेनने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा हा प्रतिकार जास्त काळ टिकला नाही. त्यामुळे आफ्रिकेचे खेळाडू एका मागे एक बाद होत गेले. अखेर त्याचा संपूर्ण संघ 201 धावांवर बाद झाला आणि भारताने एक ऐतिहासिक विजय आपल्या नावावर केला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 7 षटकात 22 धावा देत 1 गडी, हार्दिक पांड्याने 9 षटकात 30 धावा देत 2 गडी बाद केले. भुवनेश्‍वर कुमारला एकही गडी बाद करता आला नाही. रोहित शर्माला सामनावीरचा किताब देण्यात आला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: