Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एस.टी.त झोप लागलेल्या महिलेचे शूटिंग करणार्‍यास प्रवाशांकडून चोप
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 13 : कोल्हापूर-भोर एस.टी. प्रवासात झोप लागलेल्या महिलेचे व्हिडिओ शूटिंग करणार्‍या उदय रामचंद्र चव्हाण (रा. जवाहरनगर, इचलकरंजी) याला प्रवाशांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या एस.टी. बसमधून प्रवास करणार्‍या महाविद्यालयीन युवकाच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. याबाबत उदय चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस व प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून भोरकडे निघालेल्या एस.टी. बसमधून पारगाव खंडाळ्याकडे निघालेले जोडपे प्रवास करत होते. त्यावेळी त्यातील महिलेला झोप लागली. त्यांच्या सीटच्या मागील बाजूस बसलेला उदय चव्हाण हा त्या महिलेचे मोबाईलवर रूमाल टाकून शूटिंग करत होता. ही बाब त्याच्या पाठीमागे बसलेला गडहिंग्लज येथील महाविद्यालयीन युवक मोहसीन बशीर अहमद पठाण  (रा. महगाव, ता. गडहिंग्लज) याच्या लक्षात आली. त्याने उदय चव्हाणला शूटिंग करताना पकडले. धाडस करून मोहसीनने तो शूटिंग करत असतानाचेही फोटो काढले. त्यानंतर त्याने याबाबत बसच्या वाहकाला माहिती दिली. त्यावेळी बसमधील प्रवाशांनी उदय चव्हाण याला चोप दिला. त्यावेळी त्याने शूटिंग करत असल्याचे कबूल केले. त्याने चालत्या बसमधून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाशांनी त्यास रोखले. तोपर्यंत बस कराडमध्ये आली होती. चालकाने बस शहर पोलीस ठाण्याकडे नेली. तेथे पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. या प्रकरणी महिलेची तक्रार घेण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही घटना कोल्हापूर येथील किणी टोल नाका ते पेठ नाका या दरम्यानच्या प्रवासात घडल्याचे तक्रारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही तक्रार संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे कराड शहर पोलिसांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: