Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
समाजविघातक कृत्ये करणारे दोघे चार तालुक्यांमधून तडीपार
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 13 : समाजविघातक कृत्ये, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व चोरी प्रकरणी आकाश संदीप साबळे (वय 20) व निखिल शंकर साबळे (वय 20, रा. शिवथर, ता. सातारा) यांना सातारा, कोरेगाव, जावली व वाई या चार तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी जारी केला आहे.
याबाबत माहिती अशी, संशयित युवकांविरुध्द मारामारी, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व चोरी प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव काळात या दोघांनी बेकायदा जमाव जमवून फटाक्यांच्या माळा, बॅनर व पेट्रोल टाकून दुचाकी गाड्या पेटवल्या होत्या. दुचाकी पेटवल्यानंतर संशयितांनी हातात धारदार तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या समाजविघातक कृत्यांमुळे सार्वजनिक ठिकाणच्या शांततेचा भंग होत होता. त्यांना पोलिसांनी वेळोवेळी अटक करुन सुधारण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांच्याकडून सामान्य नागरिकांना उपद्रव सुरुच होेता. त्यामुळे संशयितांवर कठोर कारवाईची मागणी होत होती. तालुका पोलिसांनी संशयितांना तडीपार करण्यासंबंधी
प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षकांकडे पाठवला. त्यानुसार मंगळवारी दोन्ही युवकांना सातारा, कोरेगाव, जावली व वाई या तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 48 तासांमध्ये करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आणखी काही जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार असून त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: