Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अखेर हाफिज सईद दहशतवादी घोषित
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: mn1
अध्यादेशावर राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी केली स्वाक्षरी
 5कराची, दि. 13 (वृत्तसंस्था) : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने मोठा झटका दिला आहे. सईद व त्याची दहशतवादी संघटना जमात उद दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे (यूएनएससी) प्रतिबंधित व्यक्ती आणि लष्कर ए तोयबा, अल कायदा तसेच तालिबानसारख्या संघटनांना लगाम घालण्याचा उद्देश असलेल्या एका अध्यादेशावर राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी स्वाक्षरी केली आहे. या सूचीत हाफिज सईदची दहशतवादी संघटना जमात उद दावाचाही समावेश आहे.
आतापर्यंत पाकिस्तानने जमात उद दावासारख्या संघटनांचा फक्त दहशतवादी संघटनांच्या सूचीत समावेश केला होता. पाकिस्तानकडून कधी बंदीची चर्चा केली जात तर कधी या संघटनेला देणगी घेण्यावर बंदी लादण्याची चर्चा केली जात होती. परंतु आता राष्ट्रपतींद्वारे अध्यादेशावरील स्वाक्षरीनंतर जमात उद दावा अधिकृतरीत्या दहशतवादी संघटना ठरली आहे. यामागे पॅरिस येथे फायनान्शियल टास्क फोर्सची बैठक होणार आहे. यामध्ये मनी लाँडरिंगसारख्या विविध प्रकरणांवरून विविध देशांवर निगराणी ठेवली जाते. त्यापूर्वीच पाकिस्तान स्वत:ला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानचे हे पाऊल निव्वळ धुळफेक असल्याचेही बोलले जात आहे. कारण अध्यादेश हा ठरावीक काळानंतर संपुष्टात येऊ शकतो. कारण त्याचा निश्‍चित असा कालावधी ठरलेला असतो. त्यामुळे जर पाकिस्तानने वेळेत कायदा केला नाही तर ही सरळसरळ धुळफेकच असेल, असे म्हटले जाते.
याबाबत विस्तृत माहिती देण्यास राष्ट्रपती भवनातील अधिकार्‍याने नकार दिला आहे. पण त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यूएनएससीच्या प्रतिबंधित सूचीत अल कायदा, तहरिक ए तालिबान पाकिस्तान, लष्कर ए झांगवी, जमात उद दावा, फलाह ए इन्सानियत फाऊंडेशन, लष्कर ए तोयबा आणि इतर संघटनांचा समावेश आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: