Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

संवाद होणार कसा?
vasudeo kulkarni
Thursday, February 15, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: ag1
युद्धात पाकिस्तानचा सातत्याने भारताकडून पराभव झाल्याने, ते राष्ट्र पुन्हा युद्धाचे धाडस करणे शक्य नाही. पण, दहशतवादाला चिथावणी आणि सक्रिय मदत करीत, या राष्ट्राने गेल्या 27 वर्षात जम्मू काश्मीर राज्यात प्रचंड दहशतवादी कारवायांचे सुरू केलेेले सत्र थांबवले नसल्याने, आतापर्यंत हजारो निरपराध्यांची हत्याकांडे झाली. हजारो जवानांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. अशा स्थितीत जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करायसाठी केंद्र सरकारने पाकिस्तानशी चर्चा आणि संवादाचा मार्ग खुला करायला हवा, असा सल्ला अलीकडेच दिल्याने, पुन्हा एकदा या संवादाच्या विषयाची चर्चा सुरू झाली. उभय राष्ट्रातील समस्या, वादग्रस्त प्रश्‍नांची सोडवणूक चर्चेच्या मार्गाने व्हावी, यासाठी भारताने पाकिस्तानला अनेकदा आवाहने केली. उभय राष्ट्रात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची लाहोरमध्ये जाऊन भेटही घेतली. उभय नेत्यात झालेल्या चर्चेनंतर ‘लाहोर’ शांतता करार जाहीर करण्यात आला. पण, या करारावरची सही वाळायच्या आधीच तेव्हाचे लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी लडाख भागातल्या कारगिलमध्ये दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य घुसवले होते. पाकिस्तानच्या त्या विश्‍वासघातकी कृतीमुळेच कारगिलचे अघोषित युद्ध झाले. संसदेवर सशस्त्र दहशतवादी हल्ला चढवायच्या कारस्थानातही पाकिस्तानचाच हात होता. मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, वाराणसीसह देशभरातल्या अनेक शहरात पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच बाँबस्फोट घडवून हजारो निरपराध्यांचे सामूहिक हत्याकांड घडवले. हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीची होळी केली. हजारो लोक आयुष्यभरासाठी अपंग झाले. धर्मांध दहशतवाद्यांना चिथावण्या आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये याच पाकिस्तानने सशस्त्र प्रशिक्षण देऊन काश्मीर खोर्‍यात घुसवले. संपूर्ण राज्यातल्या जनतेला दहशतवादाच्या दावणीला बांधले. आतापर्यंत या राज्यात दहशतवाद्यांनी 25 हजाराच्या वर निरपराध्यांचे बळी घेतलेले आहेत तर दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करताना 15 हजाराच्या वर जवान शहीद झाले आहेत. संपूर्ण राज्यच काही वर्षापूर्वी हिंसाचाराच्या वणव्यात धडाडून पेटले होते. त्या वणव्यात सामान्य आणि गरीब काश्मिरी जनतेचीच होरपळ झाली, उपासमार झाली. पर्यटनाचा व्यवसाय ठप्प झाला. याच दहशतवाद्यांनी शेकडो काश्मिरी युवतींवर अत्याचार केले. शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त केली. दहशतवादाच्या वणव्याच्या धगीनेच 1990 च्या दशकात काश्मीर खोर्‍यातून पलायन केलेल्या, निर्वासित झालेल्या तीन लाख हिंदू कुटुंबांना अद्यापही आपल्या भूमीत-गावात-घरात परतता आलेले नाही. पाकिस्तान नेहमीच शांततेची जपमाळ ओढतो पण कृती मात्र सैतानाचीच करत असल्यानेच, अशा सैतानी वृत्तीच्या विकृतीने पछाडलेल्या राष्ट्राशी शांततेसाठी चर्चा करायची कशी आणि हा तिढा सोडवणार कोण या प्रश्‍नाचे उत्तर मात्र मेहबुबा मुफ्तीच काय पण, अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्रही देवू शकलेले नाही.     

चिघळलेली समस्या
1971 मधल्या बांगला देश मुक्ती युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केल्याने, त्याचा सूड उगवायसाठी पाकिस्तानी लष्कराने आणि सरकारने, आय. एस. आय. या गुप्तहेर संघटनेने भारताशी हे अघोषित, रक्तरंजित युद्ध सुरू केले आणि ते संपवायची पाकिस्तानची इच्छाही नाही. 1971 मधल्या युद्धानंतर झालेल्या सिमला करारात दोन्ही राष्ट्रातील समस्या मध्यस्थाशिवाय थेट चर्चेने सोडवायची अटही पाकिस्तानने मान्य केली असल्याने, आता पूर्णपणे उभय राष्ट्रात बंद झालेली चर्चा पुन्हा सुरू करायसाठी तिसर्‍या राष्ट्राला मध्यस्थी करताही येणार नाही आणि भारत ते मान्यही करणार नाही. खुद्द पाकिस्तान दहशतवाद्यांच्या कारवायांनी हैराण झालेला असतानाही, काश्मीर खोर्‍यात अशांतता कायम ठेवायची आय. एस. आय. ची कटकारस्थाने नव्या जोमाने सुरू आहेत. अमेरिकेकडून दहशतवादाचा नायनाट करायसाठी मिळालेल्या शस्त्रांचा आणि निधीचा वापर अफगाणिस्तान-जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद्यांसाठी केल्याची खात्री झाल्यानेच, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी अब्जावधी डॉलर्सची मदत तडकाफडकी बंद केली. अमेरिकेने पाकिस्तानला प्रचंड अर्थ आणि लष्करी सहाय्य केले असतानाही, न्यूयॉर्कमध्ये प्रचंड विध्वंस घडवणार्‍या अल कायदाचा म्होरक्या ओस्मा  बेन लादेनला याच पाकिस्तानने आश्रय देत, अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसला होता. पाकिस्तान हा विश्‍वास ठेवण्यासारखा देश नसल्याचे गेल्या 70 वर्षात अनेकदा सिद्ध झाले आहे. अशा स्थितीत नव्याने पाकिस्तानशी आणि तीही काश्मीरच्या समस्येवर चर्चा सुरू करून काहीही साध्य होणार नाही. अशी चर्चा झाल्यास पाकिस्तान शांततेचे गोडवे गाईल आणि त्याचवेळी काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांच्या टोळ्या घुसवायचे सत्रही सुरूच ठेवील. पाकिस्तानने बळकावलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि बलूचिस्तानातील जनता, पाकिस्तानच्या जुलमी राजवटीला, अत्याचारांना कंटाळली असल्यानेच उघडपणे त्या भागात सरकारच्या विरोधात निदर्शने होतात. बाल्टिस्तानातील चीनच्या सैन्याच्या हालचालीही तिथल्या जनतेला मान्य नाहीत. तिथेेही चिनी सैन्यावर बंडखोरांच्याकडून हल्ले होतात. पंजाबी आणि सिंधी अशा राजकीय-लष्करी वर्चस्वाच्या संघर्षाची किंमत पाकिस्तानी जनतेला मोजावी लागते आहे. शिया आणि सुन्नी यांच्यातला पंथीय संघर्ष धडाडून पेटल्यामुळे, पाकिस्तानच्या अनेक भागात वांशिक दंगली होतात. जाळपोळ होते. हजारो निरपराध्यांचे बळी जातात. तरीही आपल्या राष्ट्रात अंतर्गत शांतता प्रस्थापित व्हावी, असे लष्कर-आय. एस. आय.ला वाटत नाही. पाकिस्तानातील अशांतता हेच पाकिस्तानी लष्कराच्या वर्चस्वाचे खरे सूत्र आहे, पाकिस्तानातील लोकशाही सरकार हे सुद्धा लष्कराच्या मर्जीनुसारच चालते. लष्कराला दुखावून पाकिस्तानातल्या घटनात्मक लोकशाहीवादी सरकारला कोणतेही निर्णय घेता येत नाहीत आणि येणारही नाहीत. उभय राष्ट्रात चर्चा झालीच आणि काश्मीरमधली दहशतवाद्यांची घुसखोरी बंद करायचे पाकिस्तानने मान्य केले, तरी पाकिस्तानी लष्कर मात्र दहशतवाद्यांना काश्मीर खोर्‍यात घुसवायची, हिंसाचार घडवायची कारस्थाने बंद करणार नाही. अशा स्थितीत मेहबुबा मुफ्ती म्हणतात त्याप्रमाणे पाकिस्तानशी काश्मीरमधल्या धर्मांधांच्या दहशतवादाच्या समस्येवर चर्चा करून काही उपयोग नाही. काश्मीरमधला दहशतवाद पूर्णपणे संपेल, जनताच या दशहतवाद्यांच्या विरोधात संघटितपणे रस्त्यावर उतरेल, तेव्हाच हिंसाचाराच्या वणव्यातून या राज्यातल्या जनतेची सुटका होईल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: