Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

अखेर डीएसके तुरुंगात
vasudeo kulkarni
Tuesday, February 20, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: ag1
आपण कुणाचाही पैसा बुडवलेला नाही आणि बुडवणारही नाही. ठेवीदारांच्या ठेवी लवकरच परत देणार आहोत, अशा भूलथापा गेले वर्षभर ठेवीदारांना देणारे पुण्याचे बडे बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम तथा डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने अखेर तुरुंगात डांबले गेले आहे. तुरुंगाच्या कोठडीची हवा लागताच, ठेवीदारांना आणि न्यायालयालाही फसवणार्‍या डीएसकेंना दरदरून घाम फुटला. ते घाबरेघुबरे झाले आणि पोलीस कोठडीतच चक्कर येऊन पडले. उपचारासाठी त्यांना आधीच पुण्याच्या ससून आणि नंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. आपल्याला अटक होणार नाही, अशी खात्री त्यांना होती.  10 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर गेले दोन महिने ते न्यायालयाच्या आदेशानुसार पन्नास कोटी रुपयांची रक्कम भरायची हमी ते प्रत्येक तारखेला देत राहिले. ही रक्कम भरायसाठी मुदत मागत राहिले आणि न्यायालयाने मुदतवाढ दिल्यावरही, ही रक्कम काही त्यांना भरता आली नाही. न्यायालयाला डीएसके फक्त वायद्या पाठोपाठ वायदेच देत असल्याची खात्री पटल्यानेच, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची खरडपट्टी तर काढलीच, पण तुम्ही न्यायालय आणि  ठेवीदारांचीही फसवणूक करीत आहात, तुम्ही विश्‍वासघात केला आहे, असे सुनावत त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला. डीएसके यांनी या आधी ठेवीदारांची दिशाभूल केली आणि आता त्यांनी खुद्द न्यायालयाचीही दिशाभूल केली असल्याने, ते विश्‍वासास पात्र राहिले नाहीत, असे निरीक्षण नोंदवत त्यांना पोलिसांच्या अटकेपासून दिलेले संरक्षण रद्द केले होते. गुंतवणूकदारांना पैसे परत मिळावेत, याच उद्देशाने उच्च न्यायालयाने त्यांना मालमत्ता विकून पैसे उभे करायची संधी आणि त्यासाठी मुदतही दिली होती. पण बुलढाणा अर्बन बँकेच्या प्रस्तावित कर्जाच्या नावाखाली त्यांनी पुन्हा फसवणूक केल्याचे न्यायालयात उघड झाल्याने, न्यायमूर्ती साधना जाधव यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. बुलढाणा अर्बन बँकेला ज्या मालमत्ता गहाण ठेवून आपण शंभर कोटी रुपयांचे कर्ज मिळवणार आहोत, असा दावा डीएसके करीत होते, तीच मालमत्ता त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रकडे गहाण ठेवून कर्ज काढल्याचे उघड झाल्यानेच, न्यायालय संतप्त झाले. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबत त्यांच्याकडून वारंवार वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे न्यायालयाला गृहीत धरता येणार नाही आणि असहाय्य गुंतवणूकदारांची कष्टाची कमाई लुबाडून असेच जाता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला. न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द करताच, अडीच हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची किमान 230 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी डीएसके आणि त्यांच्या पत्नीला राजधानी दिल्लीतल्या एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे करून पोलीस कोठडी मिळवली होती. पण आता ते आजारी पडल्याने, पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा तपास काही दिवस रेंगाळायची शक्यता असली, तरी तो काही डीएसकेंना टाळता येणारा नाही.   

ठेवीदारांना आश्‍वासनांचे पाणी
‘घराला घरपण देणारी माणसं’, अशा ब्रीदाने पुणे आणि परिसरात अनेक इमारती, प्रकल्प बांधून डी. एस. कुलकर्णी यांनी सर्वसामान्य जनतेचा प्रचंड विश्‍वास मिळवला होता. अधिक संपत्ती आणि मालमत्ता मिळवायच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी गेल्या काही वर्षात आपल्या बांधकाम व्यवसायाचा झपाट्याने विस्तार केला. व्यवसायाच्या वाढीसाठी राज्यातल्या हजारो लोकांकडून शेकडो कोटी रुपयांच्या ठेवीही घेतल्या. याच ठेवींचा वापर करत, त्यांनी पुण्याच्या परिसरात इमारतींच्या बांधकामाच्या प्रकल्पासाठी मोठे भूखंडही विकत घेतले. पण त्यातले काही भूखंड विकत घेताना त्यांनी त्या जमिनी शेतकर्‍यांच्याकडून आपल्या नातेवाइकांच्या नावे विकत घेतल्या आणि नंतर आपल्याच मालकीच्या कंपन्यांसाठी दुप्पट-चौपट किंमतीने विकत घेतल्या. या सार्‍या व्यवहारात त्यांचे आणि त्यांच्या कंपन्यांचे चांगभले झाले. पण त्यातल्या काही कंपन्या त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मंजुरीशिवायच स्थापन केल्या होत्या. ठेवीदारांनी अत्यंत विश्‍वासाने डी. एस. कुलकर्णी यांच्या मालकीच्या कंपन्यांत गुंतवलेल्या ठेवींवर गेल्या वर्षीपासून नियमित व्याज मिळणे बंद झाल्यावरही, ठेवीदारांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवत, त्यांना संधी दिली. पण ते ठेवीवरचे व्याज आणि मुदत संपलेल्या ठेवी परत देण्याबाबत फक्त टोलवाटोलवीच करीत असल्याची खात्री झाल्यावर काही ठेवीदारांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसात कायदेशीर फिर्यादी दाखल केल्या. डीएसके यांच्या विरोधात आतापर्यंत पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे 4099 अर्ज आले आहेत. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 285 कोटी 21 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय डीएसके यांनी कर्ज म्हणून वैयक्तिक घेतलेल्या रकमासंदर्भात आलेल्या तक्रारीप्रमाणे 39 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांची 376 बँकांची खाती गोठवली तर 300 हून अधिक मालमत्तांचा अहवाल लिलावासाठी जिल्हाधिकार्‍यांच्याकडे पाठवला आहे. डीएसके यांनी केलेल्या फसवणुकीने हताश आणि निराश झालेल्या ठेवीदारांनी, पोलिसात धाव घेताच, हेच डीएसके आपण काही परदेशात पळून जाणार नाही, आपले पैसे मालमत्तात गुंतले आहेत आणि सध्या आपल्या विरुद्ध अपप्रचार झाल्याने, या मालमत्ता विकत घ्यायला कुणी पुढे येत नाही, असे ते सातत्याने सांगत होते. पण त्यांनी कर्ज आणि ठेवीदारांच्याकडून पैसा नेमका कसा आणि कुठे गुंतवला आणि गैरव्यवहार कसा केला, हे पारदर्शीपणे ठेवीदारांना सांगितले नाही. डीएसके यांना अटक होण्यापेक्षा ठेवीदारांचे पैसे परत मिळणे, हे महत्त्वाचे असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अनेकदा संधीही देत, त्यांच्या अटकेची सरकार पक्षाने केलेली मागणी अमान्य केली होती. ठेवीदारांबरोबरच न्यायालयाचीही फसवणूक करायच्या आणि पोलिसांच्या कोठडीबाहेर रहायच्या, चौकशी टाळायच्या लटपटी-खटपटी संपल्या असल्याने, या बड्या उद्योजकाने केलेला गैरव्यवहार आणि फसवणुकीचा तपशील पोलिसांच्या चौकशीनंतर जनतेसमोर येईल. डीएसके हे प्रतिष्ठित मराठी यशस्वी उद्योजक आहेत, हे मान्य केले तरी त्यांनी ठेवीदारांची आणि जनतेची फसवणूक केली आणि त्यावरच आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला, हे सत्य आता चव्हाट्यावर आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: