Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

मुंबई-पुणे प्रवास अवघ्या अर्ध्या तासात
vasudeo kulkarni
Tuesday, February 20, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lolak1
 पंचवीस वर्षांपूर्वी पुणे-मुंबई या खंडाळा घाटातून जाणार्‍या जुन्या रस्त्यावरून प्रवास करायसाठी वाहनांना सरासरी चार ते पाच तास लागत असत. खंडाळा घाटात एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास, वाहतुकीची कोंडी तर सातत्याने होत असे. या कोंडीत दोन्ही बाजूला अडकलेल्या वाहनांना रस्त्यातच, अपघाती वाहनाचा अडथळा दूर होईपर्यंत काही वेळा दहा-पंधरा तासही अडकून पडावे लागे. अनेक वेळा हजारो वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला लागत. वाहतुकीची झालेली ही कोंडी फुटायला खूपच वेळ लागत असे. लोणावळा ते खोपोली या जुन्या पुणे-मुंबई खंडाळा घाटातल्या रस्त्याने वाहने चालवणेही, अतिवळणामुळे धोकादायक होते. 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर पुणे-मुंबई या नव्या द्रूतगती मार्गाच्या विकासाला मंजुरी देण्यात आली आणि हा चौपदरी नवा रस्ता अवघ्या चार वर्षात बांधून पूर्णही झाला. या द्रूतगती मार्गावर वळणेही नसल्याने, पुणे-मुंबई हा प्रवास पूर्वीपेक्षा निम्म्या वेळात आणि तोही अडथळ्याशिवाय करणे सुलभ झाले. पण दरम्यानच्या काळात वाहनांची संख्याही प्रचंड वाढल्याने, मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई या दोन्ही बाजूने वाहनांची प्रचंड गर्दी नेहमीच असते. या मार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनांचे अपघातही होतात. पुणे-मुंबई-मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ पूर्वीपेक्षा खूपच कमी झाला असला, तरी मुंबईत प्रवेश केल्यावर वाहने संथ गतीनेच चालवावी लागतात. वाहतूक नियंत्रक सिग्नलवरही बराच काळ वाहनांना थांबावे लागते. त्यामुळे द्रूतगती मार्गानेही प्रवासाला लागणारा वेळ कंटाळवाणा झाला आहे.
मुंबई-पुणे दरम्यानची प्रचंड वाहतूक आणि ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, या दोन्ही शहरातील प्रवास जलद गतीने करायसाठी, विमानाने प्रवास केला, तरीही दोन-चार तास लागतातच! या वाहतूक कोंडीवर आणि प्रवासाचा वेळ वाचायसाठी केंद्र आणि राज्य सरकारने ‘मुंबई-पुणे’ मार्गावर ‘हायपरलूप’ या नव्या तंत्रज्ञानाने ताशी हजार ते बाराशे किलोमीटर वेगाने धावणार्‍या वाहनाची यंत्रणा अंमलात आणायचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हर्जिन ग्रूप आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात करारही झाला. पुणे ते नवी मुंबई विमानतळापर्यंत भारताची पहिली हायपरलूप गाडी सुरू होईल आणि अवघ्या तीस मिनिटात 150 किलोमीटरचे अंतर ती पार करेल. विमानापेक्षाही कमी वेळात प्रवाशांना पुणे किंवा मुंबईला जाता-येता येईल.
2013 मध्ये टेस्ला या कंपनीचे संस्थापक इलोन मास्क यांनी हायपरलूपची नवी संकल्पना जगासमोर मांडली. मोठ्या पोकळ नळीतून वाहतूक करायचे हे नवे तंत्रज्ञान अभिनव आहे. बंदुकीच्या गोळीच्या वेगाप्रमाणे चुंबकीय शक्तीच्या गतीने वाहन चालवता येईल, असा दावा त्यांनी केला होता. अमेरिकेत हायपरलूपचे तंत्रज्ञान विकसितही झाले आणि हे तंत्रज्ञान अंमलात येवू शकते, असे प्रयोगही यशस्वी झाले. आता जगातल्या अनेक देशात वाहतुकीसाठी या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार सुरू झाला आहे. मुंबई-पुणे या सध्याच्या द्रूतगती मार्गावर उड्डाणपुलासाठी वापरले जातात, तसा पूल बांधला जाईल आणि त्या पुलावरूनच सुसाट वेगाने हायपरलूप गाडी धावेल. विमानाच्या प्रवासापेक्षाही वीस टक्के कमी वेळात प्रवासी मुंबई-पुण्याला पोहोचू शकतील, असा या कंपनीचा दावा आहे.  हवेचा कमी दाब असलेल्या, मोठ्या पोकळ बंदिस्त नळ्यातून हे वाहन धावेल. भारतात विजयवाडा ते अमरावती या मार्गावर हायपरलूपसाठी आंध्र प्रदेश सरकारने करारही केला आहे. ही नवी हायपरलूप योजना कधीपासून सुरू होईल, याचा तपशील सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. विमान किंवा प्रथमश्रेणी रेल्वेच्या प्रवासाइतके भाडे हायपरलूपसाठी प्रवाशांना द्यावे लागेल. पूर्णपणे प्रदूषणमुक्त असलेली ही वाहतूक व्यवस्था वीज, सौरऊर्जा आणि पवनऊर्जेवरही चालणार असल्याने, या अतिवर्दळीच्या वाहतुकीच्या मार्गावरचे प्रदूषणही कमी होईल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: