Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

आकड्यांच्या खेळात महागाईचा मेळ
ऐक्य समूह
Tuesday, February 20, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: st1
अलीकडेच अमेरिकन शेअर बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. पण आता टोकाची पडझड थांबली आहे. दुसरीकडे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. महागाईतही वाढ होत होती. परंतु, आता महागाई कमी झाली आहे. जागतिक बाजारातही कच्च्या तेलाचे दर कमी व्हायला लागले आहेत. हे वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवरील सुचिन्ह म्हणायचे का?
रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात या आर्थिक वर्षातले शेवटचे पतधोरण जाहीर केले, तेव्हा महागाईबाबत चिंता व्यक्त केली होती. वाढत्या महागाईचे कारण पुढे करत मध्यवर्ती बँकेने रेपोदरात कपात केली नाही. त्यामुळे सरकार नाराज झाले. परंतु, सरकारचा भर असतो तो महागाई रोखण्यावर. रिझर्व्ह बँकेने डिसेंबरअखेर महागाईवाढीचा दर चार टक्क्यांच्या आसपास असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, तो प्रत्यक्षात पाच टक्क्यांच्याही पुढे गेल्याने चिंता व्यक्त होणे स्वाभाविक होते. वेगवेगळ्या जागतिक वित्तीय संस्था तसेच भारताच्या सांख्यिकी विभागाने देशाचा विकासदर जगात सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने देशात एक प्रकारचे आशादायी वातावरण तयार होत आहे. आतापर्यंत औद्योगिक उत्पादनाचा विकासदर फारसा वाढत नव्हता. आता त्याही पातळीवर चांगले संकेत मिळत आहेत. दुसरीकडे मोदी यांच्या परदेश भेटीत संयुक्त अरब अमिरातीबरोबर झालेल्या करारान्वये सुमारे 15 लाख टन क्षमतेचा साठवण टँक बांधला जात आहे. मंगलोरजवळ ही टाकी बांधली जात असून आता देशांपुढचा इंधन साठवणुकीचा मोठा प्रश्‍न मिटण्याच्या दिशेने एक चांगले पाऊल पडले आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही झाला आहे. यापूर्वी कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वरच जात होत्या. कच्च्या तेलाच्या किंमतवाढीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत असतो. वित्तीय तूट वाढत असते. मालवाहतूक महागली, की महागाईवाढीला चालना मिळते. या पार्श्‍वभूमीवर आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतवाढीला ब्रेक लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला चांगली फळे लागतील, असे एकंदरित चांगले आणि आशादायी चित्र सध्या निर्माण झाले आहे. मोदी सरकारच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बाब आहे. आठ राज्यांच्या निवडणुका आणि त्यापाठोपाठ येणारी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता मोदी यांना असे गुलाबी चित्र फायद्याचे आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ आल्याचे सांगणे त्यांना सोपे झाले आहे.
महागाईत घट
जानेवारीचा महागाई निर्देशांक अलीकडेच जाहीर झाला. फळे आणि भाज्यांच्या भावात कमी वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाई दरात काहीशी घट आली. जानेवारीत तो 5.07 टक्के होता. डिसेंबर 2017 मध्ये तो गेल्या 17 महिन्यांमधील सर्वात जास्त महागाई दर होता. महागाई 5.21 टक्के दराने वाढत होती. जानेवारी 2017 मध्ये किरकोळ महागाई दर 3.21 टक्के इतका होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे भाव 4.7 टक्के वाढले. डिसेंबरमध्ये त्याचा महागाई दर 1.54 टक्क्यांंच्या कनिष्ठ स्तरावर होता. गेल्या आठ महिन्यांमध्ये तो तिपटीपेक्षा जास्त वाढला आहे.
व्याजदर कायम
खाद्यपदार्थांच्या महागाई दरात किरकोळ म्हणजे 0.01 टक्के घट झाली आहे. पूर्वी हा दर 4.97 टक्के होता. तो आता 4.96 टक्के झाला आहे. गेल्या महिन्यात भाज्यांनी महागाई दरात वाढ केली होती. जानेवारी महिन्यात भाज्यांची महागाई घटली आहे. विशेषतः कांदा, टोमॅटोचे भाव चांगलेच उतरले आहेत. भाज्यांच्या महागाई दरात 29.13 टक्क्यांंहून 26.97 टक्के इतकी घट झाली. फळांचे दरही घटले. पूर्वी फळांच्या महागाईचा दर 6.63 टक्के होता. तो आता 6.24 टक्के इतका खाली आला आहे. नवा कांदा  बाजारात आल्यानंतर हे दर उतरले आहेत. कोथिंबिरीसह अन्य पालेभाज्यांचे दर उतरले आहेत. असे असले, तरी भाजीपाल्याच्या दरात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यातील पतधोरणात म्हटले होते, की डिसेंबरमध्ये फळे-भाज्यांचे भाव कमी झाले. मात्र, भावाची घसरण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी झाली. महागाईवाढीची शक्यता पाहता रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली नव्हती. त्यांच्या अंदाजानुसार जानेवारी-मार्चमध्ये महागाई दर 5.1 टक्के इतका राहील. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा तो थोडा जास्त असला तरी त्यामुळे चिंता करण्यासारखं काहीच कारण नाही.
विकासदरात वाढ
नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन विकासात घट झाली असली तरी जानेवारीत मात्र वाढ झाली आहे. या महिन्यात औद्योगिक उत्पादन सूचकांक 7.1 टक्के राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये तो 8.8 टक्के होता. औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजे आयआयपीमध्ये 7.1 टक्के वाढ झाली. नोव्हेंबर 2017 मध्ये यात 8.8 टक्के तर डिसेंबर 2016 मध्ये 2.4 वाढ राहिली होती. नोव्हेंबरचा विकास दर 19 महिन्यांमध्ये सर्वात जास्त होता. आयआयपीमध्ये 77.63 टक्के भागीदारी राखणार्‍या उत्पादन क्षेत्रानेही चांगली कामगिरी केली आहे. त्यामध्ये 8.4 टक्के विकास दर नोंदवला गेला. वर्षभरापूर्वी हा दर केवळ 0.6 टक्के होता. उत्पादनक्षेत्रात 23 उद्योगक्षेत्रे समाविष्ट आहेत. यामध्ये 16 क्षेत्रांमध्ये वाढ नोंदवण्यात आली. गुंतवणुकीचा संकेत मानल्या जाणार्‍या भांडवली मालाचे उत्पादन 16.4 टक्के वाढले. डिसेंबर 2016 मध्ये ते 6.2 टक्के वाढले होते. एफएमसीजी उत्पादनाची मागणीही 0.2 टक्क्यांंच्या तुलनेत 16.5 टक्के वाढली आहे. असे असले तरी ‘बेस इफेक्ट’ हे वेगवान वाढीचे कारण आहे. नोटबंदीमुळे डिसेंबर 2016 मध्ये विकासदर खूप कमी होता. टीव्ही-फ्रिजची उत्पादनवाढ 0.9 टक्के राहिली.
वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवर देशातील महागाई दरातील घटीचे आणि औद्योगिक उत्पादन वाढीतील दराचे स्वागत केले आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धोरणाची ही फलश्रुती असल्याचे ते मानतात. भाज्या, फळे आणि इंधन यांच्या किंमती कमी झाल्यामुळे महागाई दर खाली आल्याचे सरकारने सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर केले. औद्योगिक उत्पादन वाढल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जाहीर केले. हा निर्देशांक वधारण्यासाठी कारखानदारी,  यंत्रसामग्री व नाशवंत ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रांमधील उत्पादनातील वाढ कारणीभूत ठरली आहे. डिसेंबर 2016 मध्ये आयआयपी वाढून 2.4 टक्के झाला होता. नोव्हेंबर 2017 मध्ये आयआयपीचा अंदाज 8.4 टक्क्यांवरून 8.8 टक्के करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर डिसेंबर 2017 मधील आयआयपीची वाढ ही मुख्यतः कारखानदारीमुळे झाली आहे. कारखानदारीचा आयआयपीमध्ये 77.63 टक्के वाटा असतो. यंत्रसामग्री क्षेत्रात लक्षणीय 16.4 टक्के वाढ झाली आहे. या क्षेत्रात वर्षभरापूर्वी 6.2 टक्के घट झाली होती. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात 0.9 टक्के वाढ झाली आहे.
      - कैलास ठोळे, अर्थतज्ज्ञ
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: