Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

बलात्कार्‍यांचे जमावाकडून मुडदे
ऐक्य समूह
Wednesday, February 21, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: vi1
अरुणाचल प्रदेशातल्या तेजू शहरात संतप्त जमावाने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणार्‍या दोन संशयित आरोपींना बेदम मारहाण करून, जिवंतपणीच त्यांना जाळून ठार केल्याची थरारक घटना सोमवारी घडली. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असताना, एक हजार लोकांच्या संतप्त जमावाने या कोठडीवरच भर दुपारी बारा वाजता जोरदार हल्ला चढवला. पोलिसांच्या उपस्थितीतच कोठडीचे कुलूप तोडून, या दोन्ही संशयितांना खेचून बाहेर काढले. या दोन्ही आरोपींना जमावाने चोपून काढले आणि नंतर विवस्त्र करून भर चौकातच त्यांना पेटवून दिले. या संशयितांचे मृतदेह चौकातच फेकून जमाव निघून गेला.
या शहरातील पाच वर्षाची बालिका बेपत्ता झाल्यावर, तिच्या आई-वडिलांनी आणि लोकांनी तिचा शोध घेतला. नंतर पोलीस ठाण्यात बालिका बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पाच दिवसानंतर या बालिकेचा मृतदेह शहराजवळच्या चहाच्या मळ्यात सापडला. तो मृतदेह विवस्त्र होता आणि मुंडके तोडून या दुर्दैवी बालिकेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. रविवारी पोलिसांनी संजय सोबोटो, वय 30 आणि जगदीश लोहर, वय 25, या दोन संशयित आरोपींना या बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणी अटक केली होती. संजयने या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची तर त्याचा मित्र जगदीश याने या प्रकरणात त्याला मदत केल्याची कबुली पोलिसांना तपासात दिली होती.
पोलिसांचा तपास सुरू असतानाच, बालिकेच्या बलात्कार प्रकरणी दोन संशयितांना अटक केल्याची माहिती सोमवारी सकाळी लोकांना समजली आणि हजारो लोकांनी घोषणा देत थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. जमावाला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांनाही लोकांनी मारहाण केली आणि या दोन्ही संशयितांना आपल्या ताब्यात घेतले. संतप्त जमावाने या दोघांनाही बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांचे मुडदे पाडत, कायदा हातात घेत शिक्षाही दिली. या घटनेने शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आणि अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली. शहरातले सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
संतप्त जमावाला रोखण्यात आणि संशयित आरोपींना संरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी बालिकेवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना, ही क्रौर्याची असल्याचे आणि कायदा हातात घेऊन दोघा संशयितांचे खून पाडायची घटना दुर्भाग्यपूर्ण असल्याची प्रतिक्रिया देत, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारने या प्रकरणी तीन पोलिसांना तडकाफडकी बडतर्फ केले, तर लोहितच्या जिल्हा पोलीस प्रमुखांची तडकाफडकी बदली केली आहे. 2015 मध्ये याच राज्यातल्या दिमापूर शहरात बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताला पोलीस ठाण्यातून ताब्यात घेऊन उग्र जमावाने त्याचा खून पाडून त्याचा मृतदेह भरचौकात टांगल्याची घटना घडली होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: