Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

सरकारचे अजब फर्मान
vasudeo kulkarni
Wednesday, February 21, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: lola1
 विदर्भ-मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रातील गहू, ज्वारी, संत्री, आंबा, हरभरा, कापूस, अशी पिके जमीनदोस्त झाली. शेतकर्‍यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. लिंबाएवढ्या आकाराच्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्यामुळे, पोपट, चिमण्या, कावळे, बगळे, असे हजारो पक्षीही गारपिटीने मृत्युमुखी पडले. शेतकर्‍यांनी पाळलेल्या हजारो कोंबड्या गारपिटीच्या मार्‍याने दगावल्या. काही जनावरांचेही मृत्यू झाले. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने नुकसान भरपाई जाहीर करून दिलासा दिला. गारपिटीने मेलेल्या कोंबड्या आणि जनावरांचे पंचनामे झाल्यावर, या आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांनाही नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्‍वासन सरकारने दिले. गारपिटीने मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या आणि जनावरांचे पंचनामे करायचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी पशुसंवर्धन खाते आणि तलाठ्यांना दिले आहेत. पण पशुसंवर्धन खात्याच्या अधिकार्‍यांनी आणि काही तलाठ्यांनी गारपिटीने मेलेल्या कोंबड्या शवविच्छेदनासाठी सरकारी जनावरांच्या दवाखान्यात घेऊन याव्यात, असे फर्मान शेतकर्‍यांना काढल्याने, शेतकरी हवालदिल झाले आहेत. मेलेल्या जनावरांच्यासाठी आर्थिक मदत हवी असेल, तर मृत कोंबड्या, गायी-म्हशींना दवाखान्यात घेऊन या, त्यांचे शवविच्छेदन करून घ्या, अन्यथा आम्ही जबाबदार राहणार नाही, असा पवित्रा हे अजब फर्मान काढणार्‍या अधिकार्‍यांनी घेतल्यामुळे, शेतकरी हवालदिल झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गारपीटग्रस्त भागाला भेट देऊन, शेतकर्‍यांच्या पिकांच्या हानीची आणि मेलेल्या जनावरांची पाहणी केली, तेव्हा त्यांच्याकडे शेतकर्‍यांनी मृत जनावरांच्या शवविच्छेदनाबाबतच्या अजब फर्मानाची माहिती दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे अजब फर्मानाने चक्रावून गेले. गारपिटीमुळे मृत्यू झालेल्या कोंबड्यांना सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात कसे न्यायचे, गायी-म्हशींच्या मृतदेहांची वाहतूक कशी करायची अशी विचारणा शेतकर्‍यांनी केली, तेव्हा या अधिकार्‍यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मेलेल्या कोंबड्या आणि जनावरांची विल्हेवाट तातडीने लावणे आवश्यक असल्याने, संबंधित अधिकार्‍यांनी आणि तलाठ्यांनी गावात येऊन मृत कोंबड्या-जनावरांची पाहणी करावी, खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना द्यावा, अशी विनंती शेतकर्‍यांनी केली होती. पण तीही धुडकावण्यात आली. चव्हाण यांनी या अजब फर्मानाचे जाहीरपणे वाभाडे काढले. या मृतदेहांना पुरून टाकले नाही, तर ते कुजून सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात येईल, याची पर्वा प्रशासनाला नसल्याची टीका त्यांनी केली. विरोधी पक्षनेत्यांनी या समस्येला वाचा फोडल्यावर, हे फर्मान मागे घेण्यात आले. पण प्रशासन हे असंवेदनशील आणि शेतकर्‍यांची छळवणूक करणारे आदेश कसे काढते हे या फर्मानाने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. गारपिटीच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्या हजारो पोपट आणि बगळे-अन्य पक्ष्यांचे मृतदेह मात्र वनखात्याच्या कर्मचार्‍यांनी तातडीने पुरून टाकले आणि आरोग्याला निर्माण होणारा धोका टाळला. महसुली खात्याला मात्र कोंबड्या-जनावरांच्या मृतदेहांची तातडीने विल्हेवाट लावली नाही, तर त्याचे जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील, असे का वाटले नाही असा चव्हाण यांचा रोकडा सवाल आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: