Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

युद्ध परवडणार नाही...
ऐक्य समूह
Wednesday, February 21, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: st1
पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर होणारे हल्ले, वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि त्यात हकनाक मृत्युमुखी पडणारे आपले जवान तसेच निरपराध नागरिक ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मुख्य म्हणजे हे हल्ले पाक लष्कराकडून होत नसून त्यांनी पोसलेल्या अतिरेक्यांकडून घडवून आणले जात आहेत. म्हणजेच आपण सर्जिकल स्ट्राईकद्वारे कारवाई केली तरी त्यात अतिरेकी मरतील, पाक लष्कर सुरक्षित राहील
भारतीय लष्करी तळांवर होणारे अतिरेकी हल्ले, त्यात शहीद होणारे जवान, भारतीय तळांची होणारी हानी, सीमेपलीकडून होणार्‍या गोळीबारात नागरिकांचे होणारे नुकसान आणि होणारी जीवितहानी हे सर्व मुद्दे अत्यंत काळजीचे आणि चिंता वाढवणारे आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्या संरक्षणमंत्र्यांनी परवा पाकिस्तानला सज्जड दम दिला. हल्ल्यांना चोख उत्तर दिली जाण्याची धमकी दिली आहे. ‘त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून जशास तसे उत्तर दिले जाईल’, असे घमेंडखोर वक्तव्य केले गेले आहे. या सगळ्या वातावरणात कधीही दारूला बत्ती मिळू शकते असे वाटण्याजोगी परिस्थिती असल्याचे सर्वसामान्यांना वाटले तर चुकीचे नाही. मात्र प्रत्यक्षात या दोन देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडेल, प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होईल अशी कोणतीही शक्यता दिसत नाही.
थेट हल्ल्याची शक्यता नाही
संसदेवर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा भारताची अस्मिता दुखावली गेली होती. प्रचंड जनक्षोभ उसळला होता. तेव्हाही तत्कालीन पंतप्रधानांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या वल्गना केल्या होत्या. मात्र काही दिवसातच त्यांना सामोपचाराची भूमिका घ्यावी लागली. आताही परिस्थिती तशीच आहे. मनात असले तरी आपण हे टोकाचे पाऊल उचलू शकत नाही. कारण रशिया आणि अमेरिका या दोन्ही महासत्तांची मर्जी सांभाळूनच आपल्याला पुढे जाणे भाग असणार आहे. दुसरे म्हणजे फेब्रुवारीमध्ये उत्तरेकडचे बर्फ वितळू लागते आणि चीनची सीमा मोकळी होते. ऐन थंडीत या सीमावर्ती भागात बर्फाचा 20 ते 25 फूट थर असतो. त्यामुळे या काळात इथून चीनच्या आक्रमणाचा धोका नसतो. पण आता रस्ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे या भागातली सुरक्षा वाढवण्याचीही गरज आहे. चीन आक्रमण करेल असे नाही मात्र ती शक्यताही नाकारता येत नाही. म्हणजेच पाकिस्तानविरुद्ध आघाडी उघडली तरी सैन्याची निम्मी कुमक या सीमेवर ठेवावी लागेल आणि उर्वरित शक्तीनिशी पाकिस्तानचा मुकाबला करावा लागेल. त्यामुळे सध्याच्या काळात तरी पाकिस्तानवर थेट हल्ला होण्याची कोणतीही शक्यता नाही.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इच्छा असणे आणि तेवढी ताकद असणे या दोन भिन्न बाबी आहेत. पाकिस्तानला धडा तर शिकवायचा आहे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काय परिणाम होतील याकडेही लक्ष ठेवायचे आहे ही एक प्रकारे तारेवरची कसरत असणार आहे. कारण हे पाऊल उचलल्यास सध्या आपल्यावर प्रेम दाखवणारी अरब राष्ट्रे नेमके कोणते धोरण अवलंबतील हे आत्ताच सांगता येत नाही. ते त्यांची कड घेणारच नाहीत असे आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही. आपल्या भूतान, नेपाळ, ब्रह्मदेश यासारख्या मित्रराष्ट्रांनी पाठिंबा दिला काय आणि न दिला काय; काही फरक पडत नाही. कारण त्यांची ताकद अगदीच कमी आहे. त्यामुळे सध्या तरी थेट हल्ला न करता सर्जिकल स्ट्राईकचा मार्ग अवलंबून पाकिस्तानला दहशत दाखवली जाईल असे वाटते. यापूर्वीदेखील आपण सर्जिकल स्ट्राईक घडवून आणले होते. म्यानमार, पाकिस्तानमधल्या सर्जिकल स्ट्राईकचा बराच गवगवा झाला होता. पाकिस्तानसारख्या देशाला धाक दाखवणे हा त्या मागचा स्पष्ट हेतू होता. मात्र आता या देशाकडे गमावण्यासारखे काहीही राहिलेले नाही. शिवाय सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे जवान मृत्युमुखी पडत नसून अतिरेक्यांच्या छावण्या उद्ध्वस्त होतात आणि  पाकिस्तानसारखा देश दोन अतिरेक्यांच्या मोबदल्यात दहा भारतीय लष्करी जवान हा व्यवहार निश्‍चितच किती फायद्याचा आहे हे समजू शकतो. कारण हे अतिरेकी त्यांच्या सैन्यातील नाहीत.
नव्या शस्त्रांची खरेदी
कोणत्याही देशात सैन्यावर, लष्करी अधिकार्‍यांवर मोठा खर्च करावा लागतो. एका अर्थी देशाची ही मोठी गुंतवणूक असते. कोणत्याही देशाचे लाखो करोडो रुपये त्यांच्या प्रशिक्षणावर, भत्त्यांवर खर्च होत असतात. दोन जवान शहीद होतात तेव्हा हे नुकसान भरून काढण्यासाठी आणखी दोन जवान भरती करावे लागतात. उलटपक्षी, अतिरेक्यांच्या मरणाला काहीच किंमत नसते.  त्यांना केवळ दोन दिवस बंदूक कशी चालवायची हे शिकवायचे, त्यांच्या डोक्यामध्ये भारतीयांविरुद्ध अंगार पेटवायचा आणि सोडून द्यायचे... इतके केले तरी ते कामाला तयार होतात. त्यांना दोन-दोन दिवस उपाशी रहायची सवय असते. त्यामुळे उपासमार झाली तरी फरक पडत नाही. अठरा विश्‍व दारिद्र्य भोगणार्‍या, धर्मांधतेचा पगडा असणार्‍या वर्गाला अतिरेकी बनवणे खूप सोपे असते. घरच्यांना दोन-पाच लाख रुपये दिले की ते खूश होतात. एवढ्याशा रकमेनेही कुठेही तोंड न उघडण्याची शपथ ते देऊ शकतात. यामुळेच हजार-पाचशे अतिरेकी मेले तरी पाकिस्तानला फरक पडत नाही. म्हणूनच सर्जिकल स्ट्राईकमुळे अतिरेक्यांचे, पर्यायाने पाकिस्तानचे नेमके किती आणि कसे नुकसान होते हा अभ्यासाचा विषय ठरावा. शिवाय अतिरेकी आपल्या देशाचे नसल्यामुळे वार्‍यावर सोडणेही सहज शक्य होते. लष्करी जवानांबाबत हे करता येत नाही. त्यामुळेच भारताने सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करून अतिरेक्यांचे अड्डे उधळून लावले तरी पाकिस्तानचे काहीही नुकसान होणार नाही.
नुकतेच आपण शस्त्रसज्ज होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. भारताचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांच्या खरेदीचा घाट घातला. भारतीय लष्कराकडे असणारी शस्त्रसामग्री पुरेशी परिणामकारक आहे आणि दुसरे म्हणजे शस्त्र नव्हे तर शस्त्र पेलणार्‍या जवानाची मानसिकता युद्ध जिंकत असते. त्यामुळेच केवळ प्रचंड प्रमाणावर शस्त्रास्त्र खरेदी केली आणि ती जवानांच्या हाती दिली म्हणजेच सगळे साधले असे होणार नाही. आज आपण इस्रायलसारख्या देशाकडून हत्यारे विकत घेत आहोत. सत्तर वर्षांपूर्वी आपण स्वतंत्र झालो आणि त्याच वेळी हा देशही स्वतंत्र झाला. पण आज तो निर्यातदार आणि आपण आयातदार आहोत. त्यांच्याकडे हत्यारे तयार करण्यासाठी लोखंड नाही, बंदुकीची गोळी बनवण्यासाठी लागते ते सल्फर नाही, केसिंगसाठी लागणारे कॉपर नाही, ब्रास नाही मात्र तरीही ते हत्यारे पुरवणार आहेत! उलटपक्षी, आपल्याकडे या सगळ्याचीच उपलब्धता आहे. 
दहशतवाद्यांच्या टोळ्या
आज आपण अमेरिकेच्या मैत्रीमुळे सुखावत आहोत. अमेरिकेने पाकिस्तानची लष्करी मदत  रोखून धरल्याबद्दल समाधान व्यक्त करत आहोत. पण या पाठिंब्यावर पाकिस्तानशी युद्ध छेडणे वेडेपणाचे ठरणार आहे. कारण काहीही म्हटले तरी अमेरिकेला पाकिस्तानशी मैत्री ठेवणे भाग आहे. अफगाणिस्तानमध्ये वर्चस्व राखण्यासाठी त्यांना पाकिस्तानच्या भूमीची आवश्यकता आहे. या मैत्रीखातर पाकिस्तानही कोणत्याही थराला जाऊ शकतो. समजा, अमेरिकेला दाऊद हवा असेल तर पाकिस्तानचा अध्यक्ष त्याला घेऊन तिकडे जाईल अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला केल्यास अमेरिकेची बिनशर्थ साथ मिळेल अशी अपेक्षा धरण्यात अर्थ नाही.
पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर टोळ्या कार्यरत आहेत. इथल्या भागात त्यांचेच राज्य चालते. त्या कोणाचेही ऐकत नाहीत. गिलगिस्तान, बाल्कीस्तान आदी प्रांतांमध्ये त्या विखुरल्या आहेत. त्या पाक लष्करालाही भीक घालत नाहीत. त्यामुळेही सीमावर्ती भागात हल्ले करून पाकिस्तानी लष्कराचे नुकसान होते असे नाही तर सर्वप्रथम या टोळ्यांना झळ सोसावी लागते. पण यामुळे पाकिस्तानचा स्वार्थ साधला जातो. काहीही नुकसान न होता त्यांना उपद्रवी ठरणार्‍या टोळ्यांचाच बंदोबस्त होतो. प्रत्यक्ष हल्ला अथवा सर्जिकल स्ट्राईक करताना या सगळ्या बाबी आपण लक्षात घ्यायला हव्यात. कारण शेवटी जवान हुतात्मा होतात याचे दु:ख असले तरी ते सोसणे अपरिहार्य आहे. शेवटी आम्ही सैनिकच आहोत पण मोठे दु:ख हे आहे, की आम्ही कोणासाठी आणि कोणामुळे मरतो. पाकिस्तानी सैन्यातले शंभर मेले आणि आपले शंभर मेले तर हरकत नाही. पण सध्या पाकिस्तानच्या सैन्याला हातही लागत नाही आणि आपले जवान धारातीर्थी पडत आहेत याचा मात्र खेद वाटतो.
 - कर्नल अरविंद जोगळेकर (नि.)        
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: