Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

बिटकॉइन ते भारतकॉइन
ऐक्य समूह
Friday, February 23, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: st1
 बिटकॉइन या आभासी चलनाची चर्चा अजूनही संपलेली नाही. या चलनाच्या वाढत्या किंमतीने, पर्यायाने वाढत्या संपत्तीने अनेकांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. या संदर्भातील अनेक व्यवहार आजही सुरू आहेत. अर्थात असे असले तरी हुरळूून जाऊन यात गुंतवणूक करणे हा फायद्याचा व्यवहार ठरु शकतो असे खात्रीशीर सांगता येत नाही. म्हणून या चलनासंबंधीच्या विविध बाबींचा विचार करणे गरजेचे ठरते
माणसाने अगदी पुरातन काळापासून आर्थिक व्यवहार करण्याचे विविध मार्ग  अवलंबले आहेत. वस्तुविनिमय उर्फ ‘बार्टर एक्स्चेंज’ ही या प्रकाराची सुरुवात म्हणता येईल. कालांतराने सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीनंतर नाणी आणि त्यानंतर नोटांचा वापर होऊ लागला आणि आर्थिक क्षेत्रात नवी दालने उघडली जाऊन तसेच इतर व्यावहारिक गरजांपोटी बँका, धनादेश, क्रेडिट नोट इत्यादी प्रकार अस्तित्वात आले. इलेक्ट्रॉनिक्स आणि इंटरनेट-दळणवळण आणि संवादातल्या सध्याच्या प्रगतीमुळे नेट बॅँकिंग, खात्यात थेट रक्कम जमा होणे इत्यादी बाबींचा वापर सुरू झाला. परिणामी, प्रत्यक्ष रक्कम बाळगण्याची गरज बर्‍याच अंशी संपुष्टात आली आहे असे म्हणता येईल. गेल्या काही हजार वर्षांमधल्या या प्रवासात वापरल्या गेलेल्या प्रत्येक पद्धतीचे फायदे-तोटे आहेतच. उदा. वस्तुविनिमय हा भयंकर वेळखाऊ प्रकार आहे. आपल्याकडे असणार्‍या वस्तूची समोरच्याला गरज असणे आणि आपल्याला हवी असणारी वस्तू त्याच्याकडे उपलब्ध असणे हा या व्यवहारांचा पाया आहे. या दोन गोष्टींची सांगड घालू शकणारी व्यक्ती शोधणे आणि दोघांनाही परस्परांकडे असणार्‍या वस्तू पसंत पडून प्रत्यक्ष देवाणघेवाण होणे ही फारच मोठी प्रक्रिया आहे.
आभासी चलन
या संदर्भात नाणी अथवा नोटा ही संकल्पना फारच क्रांतिकारी म्हणावी लागेल. अर्थात प्रत्येक राजाने, संस्थानिकाने आणि देशाने स्वतःची नाणी पाडल्याने स्थानिक पातळीवर सुविधा मिळाली असली तरी त्यांना सार्वत्रिक मान्यता नसल्याने (म्हणजेच एका राज्याची नाणी दुसर्‍या राज्यात स्वीकारली जात नसल्यामुळे.) व्यापारउदिमाच्या एकंदर विस्ताराला अडथळे जाणवू लागलेच. या रोख व्यवहारांमध्ये (उदा. बनावट चलनामार्फत) फसवणुकीचा वाव होता शिवाय एखाद्या देशामधील राजकीय अस्थिरतेमुळे त्याचे विशिष्ट चलन कालबाह्य किंवा अवैध ठरण्याचाही धोका होता. या पार्श्‍वभूमीवर देशाच्या मध्यवर्ती बॅँकेने संबंधित चलनाची हमी देणे, केंद्रात सरकार कोणाचेही असो ही बाब चलनधारक नागरिक तसेच संस्थांसाठीही महत्त्वाची असून जगातील सर्वच देशांच्या चलनाला असा आधार नसतो हा मुद्दाही लक्षात घेण्याजोगा आहे. कोणतीही भारतीय चलनी नोट पहा, त्यावर मैं धारक को ---- रुपए अदा करने का वचन देता हूं, असे रिझर्व्ह बॅँकेच्या गव्हर्नरने लिहून दिलेले असते. अर्थातच अशी चलने अधिक सुरक्षित मानली जातात.
गेल्या काही वर्षांमध्ये चलनासंदर्भात आणखी एक वरची पातळी गाठली गेली आहे.  ती आहे आभासी चलनाची. बिटकॉइन हा शब्द आता परिचित झाला आहे. फक्त इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध असणार्‍या या आभासी चलनाचा वापर सर्वच क्षेत्रांमध्ये वाढू लागला आहे. 2009 मध्ये उदयाला आलेल्या बिटकॉइनची किंमत सातत्याने वाढत आहे. गेल्या काही महिन्यांमध्येच बिटकॉइनच्या मूल्यामध्ये 350  टक्क्यांनी वाढ झाली आहे. सातोशी नाकामोटो या संगणकतज्ञाने दोन व्यक्तींदरम्यान रकमेचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण करणारी ही पद्धत 2008 मध्ये शोधली. हे एक ‘ओपन सोर्स कोड’ असून त्यावर फक्त ओळखीतून म्हणजेच बिटकॉइनधारक व्यक्तीमार्फतच प्रवेश मिळू शकतो. आपल्यासाठी नवे ‘बिटकॉइन वॉलेट’ सुरू करून देणार्‍या मोजक्या साइट्सदेखील आहेत. त्यावर अमेरिकन डॉलर्स भरणारी व्यक्ती बिटकॉइनधारक होऊ शकते. त्यानंतर खातेधारकाने केलेल्या कामापोटी किंवा पुरवलेल्या सेवेपोटी त्याला बिटकॉइन्सच्या रूपात पेमेंट केले जाते. ह्या ‘डिस्ट्रिब्युटेड लेजर’ कार्यप्रणालीचा वापर मुख्यतः गैरकृत्यांसाठी केला जात असला तरी बॅँक खात्यामार्फत पार पाडले जाणारे अनेक ‘व्हाइट’ आर्थिक व्यवहारही येथे होत असतात. या प्रक्रियेला ब्लॉकचेन असेही नाव आहे.
असुरक्षित गुंतवणूक
प्रणालीच्या प्रशासकांद्वारे  बिटकॉइन्सची संख्या मर्यादित ठेवली जाते आणि नवीन कॉइन्स प्रसारात आणण्यासाठी विकेंद्रित स्पर्धात्मक बोली पद्धतीचा वापर केला जातो. याला ‘बिटकॉइन मायनिंग’ असे म्हणतात. नवीन कॉइन्स मिळवणारे हे मायनर्स उर्फ खाणकामगार त्यासाठी विशिष्ट गुप्त हार्डवेअर्स आणि कोड्सचा उपयोग करतात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गुप्तता पाळली जाते आणि सर्वांची ‘प्रायव्हसी’ जपली जाईल याकडे लक्ष ठेवले जाते. अर्थात या आभासी चलनाचेही फायदे-तोटे आहेतच परंतु सर्वप्रथम जाणवणारी बाब म्हणजे बिटकॉइनची सुरक्षितता  किंवा असुरक्षितता. कारण हे चलन प्रचलित कायद्यामध्ये बसत नाही. त्यामुळे त्याला कोणताही कायदेशीर सुरक्षाविषयक आधार नाही, त्यावर कोणाचेही फारसे नियंत्रणही नाही, की त्याची कसली हमीदेखील नाही. हे झाले कायदेविषयक दृष्टिकोनातून. आता बिटकॉइन कार्यपद्धतीच्या तांत्रिक बाजूचे काही पैलू पुढे आले असून त्यावरही तिची स्थिती डळमळीतच आहे असे म्हणावे लागेल.
 जगभरात अब्जावधी डॉलर्सची रोख रक्कम बिटकॉइन्सच्या रूपाने ठेवण्यात आली आहे. हिला ‘डिजिटल गोल्ड’ असे नाव आहे. आतापर्यंत बिटकॉइनसंबंधीची अस्थिरता किंवा संवेदनशीलता फक्त त्यांच्या किमतीपुरती मर्यादित आहे असे मानले जात होते. परंतु या  तांत्रिक पर्दाफाशामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे, कारण बिटकॉइनमध्ये घातलेला पैसा परत मिळेल की नाही याचीच चिंता वाटू लागली आहे. बिटकॉइन संकल्पनेची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे पारदर्शकता आणि कमीत कमी मध्यस्थ उर्फ सेवा-पुरवठादार नसणे. अन्य आर्थिक व्यवहारांमध्ये आपली बॅँक ही मध्यस्थ किंवा सेवा पुरवठादार असल्यामुळे तिला संबंधित व्यवहाराची पूर्णपणे माहिती असते. इथे तसे होत नाही. बिटकॉइन देणारा आणि घेणारा यांच्यामधील व्यवहाराची नोंद फक्त एका ‘टाइम-स्टॅँप’द्वारे ठेवली जाते.
आता भारतकॉइन
दुसरा धोका आहे वापरकर्त्याने पासवर्ड विसरण्याचा किंवा पासवर्ड चोरीला जाण्याचा. तो कुठे नसतो, असा प्रश्‍न कोणीही विचारेल आणि ते खरेही आहे. परंतु इथले बरेचसे व्यवहार अनधिकृत असल्यामुळे पासवर्डद्वारे होणार्‍या संभाव्य चौर्याच्या बाबतीत पीडिताची अवस्था ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी होणार हे नक्की. कारण इथे पासवर्ड परत मिळवण्याची किंवा नवा पासवर्ड तयार करण्याची सोय नाही. परिणाम? बिटकॉइनमध्ये गुंतवलेली सर्व रक्कम गेली... बिटकॉइनमधून मिळणार्‍या नेमक्या याच ‘सुविधां’मुळे तूर्त तरी तिचा वापर हवाला व्यवहार करणारे, अतिरेकी आणि ड्रग डीलर्समार्फतच जास्त प्रमाणात होत आहे. बिटकॉइनच्या कार्यपद्धतीवर कोणाचेही नियंत्रण नाही.
अशी ही यंत्रणा भारतकॉइन या नावाने सादर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आपल्याला आभासी चलनाची खरोखरीच गरज आहे का? ही प्रणाली आपल्याकडे व्यवस्थित चालू शकेल का? हिच्यामार्फत (आधीच समांतर अर्थव्यवस्थेने आणि काळ्या धनामुळे ग्रस्त आणि त्रस्त असलेल्या.) आपल्या अर्थकारणामध्ये ‘हवाला’साठी खास सोय तर उत्पन्न होणार नाही? या आणि अशा काही अत्यंत कळीच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळायला हवीत. कारण आपल्याही गुप्तचर संस्थांनी बिटकॉइनसारख्या आभासी चलनांचा वापर मुख्यतः बेकायदेशीर आणि देशद्रोही कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅँकेनेही आभासी चलन न वापरण्याचे आवाहन केले असून बिटकॉइनसह इतर कोणत्याही आभासी चलनाला (क्रिप्टोकरन्सी) भारतामध्ये वापरासाठी परवानगी दिली नसल्याचे सांगितले आहे. भारतात बिटकॉइन्स मिळवून देणार्‍या काही एजन्सीज आहेत. परंतु त्यांना कोणतंही अधिकृत स्वरूप नसल्यामुळे त्याबाबतच्या व्यवहारांना सुरक्षितता नाही. आपल्याकडे आभासी चलनांसंबंधात स्पष्ट कायदेकानून आणि कार्यपद्धती अस्तित्वातच नसल्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तरीही असे एखादे प्रकरण उद्भवल्यास आरबीआयची मदत घेतली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आभासी चलनाच्या स्वीकाराबाबत घाईने (आणि अर्धवट) निर्णय न घेता त्यासंबंधीच्या सर्व कार्यप्रक्रिया समजून घेऊन त्या बरोबरीने अस्तित्वात आणणे अत्यावश्यक आहे.
   -  डॉ. दीपक शिकारपूर
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: