Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

‘आप’ची गुंडगिरी
vasudeo kulkarni
Friday, February 23, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: ag1
स्वच्छ, लोकहितवादी, पारदर्शी, लोककल्याणकारी कारभाराच्या घोषणा देत, राजधानी दिल्लीची सत्ता हस्तगत करणार्‍या आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार गेली तीन वर्षे भांडणे, संघर्ष, गैरव्यवहार, उधळपट्टीच्या अंदाधुंदीच्या कारभारानेच सतत गाजते आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या आमदारांनी केलेले घोटाळे, गैरव्यवहाराचे पंचनामेही अनेक वेळा झाले. नायब राज्यपाल आणि केजरीवाल यांच्यातला सत्तेच्या अधिकारांचा संघर्ष गाजला. वारंवार न्यायालयातही गेला. न्यायालयानेच अंतिम अधिकार नायब राज्यपालांचेच असल्याचा निकाल दिल्याने, केजरीवालांना चरफडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जनतेचा विश्‍वास गमावलेल्या या सरकारने जाहिरातबाजीवर मात्र शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी केली. आता सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सरकारची जाहिरातबाजी उपग्रह वृत्त आणि मनोरंजन वाहिन्यांवर करायचे डोहाळे या सरकारला आणि पक्षाच्या आमदारांना लागलेले आहेत. या जाहिराती मोठ्या प्रमाणात द्याव्यात, सरकारच्या लोकाभिमुख कारभाराचा गाजावाजा व्हावा, यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानात सोमवारी रात्री बाराच्या दरम्यान जे काही घडले, ते सरकारच्या आणि पक्षाच्या प्रतिमेला डांबर फासणारे, प्रशासनाला धमक्यांच्या-दबावाच्या जोरावर दावणीला बांधायचा प्रयत्न असल्यानेच, या नव्या घटनेचा पंचनामा सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना या जाहिरातीबाबत चर्चा करायसाठी केजरीवाल यांच्या निवासस्थानी बोलावून घेतले होते. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अकरा आमदारांनी, मुख्य विषय बाजूला ठेवत, आधारपत्रिकेशी शिधापत्रिका जोडली नसल्याने, अडीच लाख कुटुंबांना शिधा मिळत नसल्याने, तो तत्काळ सुरू करावा, अशी मागणी केली. असे का घडले अशा प्रश्‍नांची सरबत्तीही त्यांच्यावर केली. प्रकाश यांनी या प्रश्‍नाचे उत्तर अशा बैठकीत द्यायला आपण बांधील नाही. नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री विचारतील, तेव्हाच आपण याबाबत खुलासा करू, असे त्यांनी सांगताच, या आमदारांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्यावर सामूहिक दबावही आणला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. आमदार प्रकाश जारवाल आणि आमदार अजय दत्त यांनी त्यांच्या अंगावर हातही उगारला. त्यांना धक्काबुक्की केली. जीवे मारायच्या धमक्याही दिल्या. आमच्या म्हणण्यानुसारच कारभार झाला पाहिजे, अन्यथा बघून घेऊ, असे हे आमदार प्रकाश यांना जरबेने सांगत होते. या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेले प्रकाश मुख्यमंत्र्यांच्या त्या खोलीतून कसेबसे बाहेर पडले आणि आपल्या मोटारीतून निघून गेले. या मारहाणीबाबत त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून, पोलिसांनी या दोन्ही आमदारांना अटक करून तपास सुरू केला आहे. दिल्ली सरकारच्या प्रशासनाला या घटनेची माहिती समजताच, त्यांनी संघटितपणे मोर्चा काढून आप सरकारचा निषेध केल्याने आणि दिल्ली सरकारच्या आयएएस अधिकार्‍यांनी राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेऊन निषेध नोंदवत संरक्षण मागितले आहे तर या दोन्ही आमदारांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये प्रकाश यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने, हे प्रकरण चिघळले आहे.     

हुल्लडबाजीचा कलंक
अरविंद केजरीवाल यांची सत्तेच्या राजकारणात येण्यापूर्वीची प्रतिमा देशभरात भ्रष्टाचाराच्या विरोधात निर्भयपणे लढणारा नेता अशी होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीत केेलेल्या आंदोलनाचे संघटन त्यांनीच केले होते. त्या आंदोलनाला दिल्लीसह देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानेच, तेव्हाच्या केंद्र सरकारला अण्णांची लोकपाल विधेयकाची मागणी मान्य करायला लागली होती. केजरीवाल यांची प्रतिमा स्वच्छ आणि लढाऊ असल्याने, दिल्ली विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियतेची लाटही दिल्लीत निष्प्रभ ठरली आणि आम आदमी पक्षाने त्या निवडणुकीत 70 पैकी 67 जागा जिंकून नवा विक्रमही प्रस्थापित केला होता. पण लोकमताच्या या कौलानुसार आम आदमी पक्षाच्या केजरीवाल यांच्या सरकारने, मतदारांची अंदाधुंद आणि भ्रष्ट कारभार करून निराशा केली. जनतेचा विश्‍वासही गमावला आणि आता प्रशासनाच्या कर्मचार्‍यांचाही विरोध अंगावर ओढवून घेतला आहे. या सरकारचे मंत्री उद्धटपणे  वागत असल्याच्या सार्वजनिक तक्रारी यापूर्वीही होत्याच. आता खुद्द सचिवांनाच मारहाण झाल्याच्या घटनेने या पक्षाची उरलीसुरली विश्‍वासार्हताही संपली आहे. हुल्लडबाजीचा कलंक लागलेला असतानाही असे काही घडलेच नाही, असा सारवासारवीचा खुलासा शिसोदिया यांनी केल्यामुळे कर्मचार्‍यांच्या असंतोषाचा भडका अधिकच उडाला. राज्याच्या मुख्य सचिवाला मारहाण आणि धमक्या देणार्‍या या आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी घातलेल्या राड्याने, हे आमदार काय लायकीचे आहेत, हे दिल्लीकरांच्यासमोर आले, ते बरे झाले! अवघ्या महिन्यापूर्वीच लाभाचे म्हणजे संसदीय सचिवांचे पद स्वीकारल्याबद्दल आपच्या वीस आमदारांना अपात्र ठरवायच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्याने, हे आमदार आता अपात्र ठरले आहेत. दिल्ली विधानसभेत आप सरकारला भक्कम बहुमत असले, तरी सत्तेचा माज चढलेले मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार हे अन्य राजकीय पक्षापेक्षा काहीही वेगळे नाहीत. त्यांनाही सत्तेचा माज चढल्याचे या घटनेने चव्हाट्यावर आले आहे. प्रशासनातल्या कर्मचार्‍यांनाच अशा धमक्या आमदार देत असतील, तर मंत्र्यांची वागणूक काय असेल हे समजू शकते. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे आमदार-मंत्र्यांना जनतेच्या सुख-दु:खाशी काही देणेघेणे राहिलेले नाही. सत्ता हेच त्यांचे साधन झघले आहे. अन्य राजकीय पक्ष भ्रष्ट आणि फक्त आम आदमी पक्ष, पक्षाचे नेते-कार्यकर्ते तेवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ, असा प्रचार करणार्‍या केजरीवाल यांच्या ढोंगबाजीचा बुरखा यापूर्वी अनेकदा फाटला आहेच. आत आमदारांच्या हुल्लडबाजीने त्यांच्या सत्तेला खग्रास ग्रहण लागले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: