Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

श्रमिकांच्या झुंजार नेत्या
ऐक्य समूह
Friday, February 23, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: vi1
मुंबई शहरातल्या श्रमिकांसाठी सलग 70 वर्षे आंदोलनाद्वारे सरकारशी झुंजणार्‍या ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांच्या निधनाने, महाराष्ट्रातल्या सामाजिक आंदोलनाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. माहेरी आणि सासरीही स्वातंत्र्य चळवळीतल्या सहभागाचा वारसा मिळालेल्या कमलताईंच्या पतीचे विवाहानंतर अल्पावधीतच निधन झाले. आपले मेहुणे बाबूराव सामंत यांच्या सल्ल्याने त्या समाजवादी पक्षाच्या विविध आंदोलने आणि चळवळीत सक्रियपणे सहभागी झाल्या. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोेरे यांच्या त्या विश्‍वासू सहकारी आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असत. मृणालताई गोरे आणि कमल देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निघालेल्या लाटणी मोर्च्यांची दहशत सरकारला होती. हजारो महिलांचे नेतृत्व करणार्‍या कमलताईंना मृणालताईंच्या बरोबरच पाणीवाली बाई असा लौकिक मिळाला होता. सर्वसामान्य आणि गोरगरीब महिलांच्या हंडा मोर्चांनी सरकारलाही सळो की पळो करून सोडले होते. मुंबई महापालिकेच्या त्या माजी नगरसेविका होत्या. 1973 मध्ये त्या मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. विधानसभेतही त्यांनी श्रमिकांच्या प्रश्‍नांना वाचा फोडत सरकारला सातत्याने धारेवर धरले होते. फेरीवाल्या महिलांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधातही त्यांनी याच महिलांना बरोबर घेऊन मंत्रालय आणि मुंबई महापालिकेवर अनेकदा मोर्चे काढले होते. मुंबईकरांना आणि विशेषत: गरिबांच्या वसाहतीत, झोपडपट्ट्यात पिण्याचे पाणी, दवाखाने, प्राथमिक शाळा, अशा नागरी सुविधा मिळवून द्यायसाठी त्यांनी सरकार आणि महापालिकेला भाग पाडले होते. अहिल्याताई रांगणेकर, मृणालताई आणि कमलताईंना महाराष्ट्रात रणरागिणी म्हणून ओळखले जाई.
सामाजिक सेवाकार्यातही त्यांचा कृतिशील सहभाग होता. स्वाधार संस्था आणि नागरी विकास संस्थेच्याद्वारे त्यांनी गरिबांना महानगरी मुंबईत हक्काची घरेही मिळवून दिली होती. महागाई आणि गरिबांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्याकडे चर्चेसाठी लढाऊ महिला आघाडीने अनेकदा वेळ मागूनही, त्यांची भेटही घेतली नाही आणि वेळही दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच धडक मारीत, प्रचंड घोषणाबाजी करीत, मंत्रालय दणाणून सोडले. मृणालताई, कमलताई आणि अहिल्याताई यांच्यासह 32 महिला निदर्शकांना पोलिसांनी मंत्रालयातून फरपटत खाली नेण्याचा निंद्य प्रयत्न केला होता. या निदर्शक महिलांना सरकारने जामीन मिळू दिला नाही. त्यांच्यावर खटला भरला. पण याच महिलांनी अंतुले यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे चव्हाट्यावर तर मांडलीच, पण अ‍ॅड. प. बा. सामंत यांच्या सहाय्याने थेट मुंबई उच्च न्यायालयातच अंतुले यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी खटला दाखल केला. मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर करणार्‍या अंतुले यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले आणि याच महिलांनी त्यांची सत्तेची मस्तीही जिरवली. कमलताईंच्या निधनाने मुंबईतल्या लढाऊ आंदोलनांचे पर्व आता संपले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: