Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

बिबट्या शहरात का घुसला?
ऐक्य समूह
Friday, February 23, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: lolak1
 सातारा शहराच्या शाहूपुरी परिसरातल्या अंबेदरे रस्त्यात गौरव माने या 20 वर्षाच्या युवकावर भेदरलेल्या बिबट्याने झडप घातल्याच्या घटनेने, शहराच्या परिसरात दहशत निर्माण झाली. गेल्या काही महिन्यात अजिंक्यतारा, कास पठाराच्या भागात समाजकंटकांनी डोंगरात वणवे लावायचा विघ्नसंतोषी उद्योग सुरू केला. या वणव्याने गवत तर जळालेच पण नव्याने लावलेली झाडांची रोपटी, दोन चार वर्षे जगलेली झाडे, पक्ष्यांची घरटीही जळून भस्मसात झाली. तीन दिवसांपूर्वी सायंकाळी अशाच काही विघ्नसंतोषी लोकांनी यवतेश्‍वरच्या डोंगरात वणवा लावला. त्या भागातच हा बिबट्या फिरत असावा. अचानक लागलेल्या आगीने घाबरलेला, भेदरलेला बिबट्या डोंगर उतरून अंबेदरेच्या रस्त्यावर आला असावा. जंगल हे बिबट्या, रानडुकरे आणि अन्य प्राण्यांचे हक्काचे-सुरक्षित आश्रयस्थान! पूर्वी जंगले घनदाट असल्याने वाघ, बिबट्यांचे अन्न असलेली हरणे आणि अन्य प्राणीही विपुल प्रमाणात होते. तृणभक्षक प्राण्यांना गवत, पक्ष्यांना फळे, अळ्या असे अन्न आणि मांसभक्षक प्राण्यांनाही त्यांची शिकार सहजपणे मिळत असे. गेल्या चाळीस वर्षात विकासाच्या गोंडस नावाखाली जंगलांच्या कत्तली झाल्या. जंगलातल्या झाडांची प्रचंड तोड झाली. डोंगरांचे हिरवे आच्छादन हळूहळू संपत गेले. जंगलाच्या भागात अतिक्रमणे वाढली. चोरट्या शिकार्‍यांनी केलेल्या शिकारीमुळे वाघ, बिबट्या आणि अन्य प्राण्यांची संख्या कमी होत गेली. भारतातल्या बहुतांश संरक्षित व्याघ्र प्रकल्पांच्या जंगलातल्या वाघांचीही संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने कमी झाली, ती चोरट्या शिकारीमुळे आणि वाघ, बिबट्यांचे जंगलांचे संरक्षक कवच नाहीसे झाल्यामुळेच!
सातारा, पाटण, कराड, महाबळेश्‍वर परिसरातल्या नागरी वस्त्यात अधूनमधून वाट चुकलेल्या बिबट्यांचे दर्शन घडतेच. काही भागात तर उसाच्या शेतातही आपल्या पिलांसह बिबट्या माद्यांनी तळ ठोकल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट्या नागरी वस्तीत घुसतो, तो जंगलात त्याचे भक्ष्य त्याला मिळत नसल्यानेच! नागरी वस्तीतल्या कोंबड्या, गायी-म्हशी, शेळ्या, कुत्री अशा जनावरांवर वाट चुकलेले बिबटे हल्ले चढवतात. प्राणी खातात. नागरी वस्तीत बिबट्या घुसल्यावर दहशत निर्माण होते. वनखाते बिबट्या आढळलेल्या भागात, बिबट्याला पकडायसाठी सापळे लावले जातात. बिबट्या त्या सापळ्यात अडकतोच असे मात्र नाही. बिबट्या आणि वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान असलेली जंगले उजाड झाल्याने आणि उंच गवतात लपायच्या त्यांच्या जागाही वणव्यामुळे नाहीशा होत असल्यानेच, हे वन्यपशू भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात जंगल सोडून वणवण भटकतात. वाट चुकतात. काही वेळा भक्ष्याचा पाठलाग करताना, विहिरीतही पडतात. अडकून पडलेल्या बिबट्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून पुन्हा जंगलात सोडावे लागते. नागरी वस्त्यात बिबट्या घुसल्याने, माणसावर हल्ले चढल्याने भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिकच आहे. पण बिबट्या नागरी वस्त्यात घुसतो, ते माणसांच्या चुकीने! त्यात या मुक्या प्राण्याची काही चूक नसते. जंगलांच्या कत्तली करणार्‍या, डोंगर-जंगलात वणवे लावणार्‍यांनीच ‘चूड दाखवून वाघ घरात घेणे’ या म्हणीप्रमाणेच हे संकट ओढवून घेतले आहे.  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: