Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुतळ्यांचे संरक्षण करा; मोदींचे राज्यांना निर्देश
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:38 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : त्रिपुरात व्लादिमीर लेनिन आणि तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्यानंतर बुधवारी सकाळी कोलकातामध्ये काही लोकांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यालाही काळे फासले. या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी गृह मंत्रालयाशी चर्चा केली असून अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत तसेच पुतळ्यांचे संरक्षण करावे, असे निर्देश दिले आहेत.
पुतळ्यांचे संरक्षण करण्यात यावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानेही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. यासंबंधी सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. मूर्तींची तोडफोड तसेच हिंसक घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. मूर्तींची तोडफोड करणार्‍या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था सुनिश्‍चित करण्यात यावी, असे आदेशही दिले आहेत.
पुतळे तोडण्याच्या घटनेचे आज राज्यसभेत जोरदार पडसाद उमटले. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्‍चिम बंगालमध्ये पुतळे तोडण्यात आल्याच्या घटनेची माहिती मीडियामधूनच कळली. पुतळे तोडणारे वेडे असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. संबंधित एजन्सी पुतळ्यांची नासधूस करणार्‍यांवर कठोर कारवाई करेल, असा मला विश्‍वास आहे, असे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
राज्यसभेचे कामकाज सुरू होताच माजी खासदार जितेंद्र कुमार जैन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नायडू यांनी विरोधकांना चर्चेला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. बँक घोटाळ्यांवर चर्चा करण्यासाठी नोटीस देण्यात आली असून हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सांगत नायडू यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याची विनंती सभागृहाला केली. बँक घोटाळा, आंध्रप्रदेशचा मुद्दा आणि कावेरी वाद या तिन्ही मुद्द्यांवर सभागृहात चर्चा झाली पाहिजे.
संपूर्ण देश ही चर्चा ऐकण्यासाठी उत्सूक आहे, असे नायडू यांनी सांगितले. मात्र विरोधकांनी पुतळे तोडण्याच्या घटनेचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. सभागृहातील गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर सभापतींनी दुपारी 2 पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
दरम्यान, सीपीएम महासचिव सीताराम येचुरी यांनी पुतळे तोडण्याच्या घटनेवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. पुतळे तोडणे तर हे संघाचे कामच आहे. गांधी हत्येपासून ते बाबरी पाडण्यापर्यंतच्या घटना त्याचा पुरावा आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
अमित शहांची नेत्यांना तंबी
त्रिपुरा आणि तामिळनाडूत पुतळ्याच्या तोडफोडी प्रकरणी भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांवर आरोप होत असतानाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नेत्यांना तंबी दिली. भाजपशी संबंधित नेते किंवा कार्यकर्त्यांचा पुतळ्याच्या तोडफोडीत सहभाग असल्याचे समोर आले तर त्यांच्यावर पक्षाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शहा यांनी दिला.
त्रिपुरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा पाडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली तर मंगळवारी तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. यातही भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याने भाजपवर टीका होत होती. अखेर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विटरवरून या वादांवर प्रतिक्रिया दिली. शहा यांनी ट्विट करत पुतळ्यांच्या तोडफोडीच्या घटनांचा विरोध केला. आम्ही अशा घटनांचे समर्थन करत नाही. या घटना दुर्दैवी आहेत. मी त्रिपुरा आणि तामिळनाडूतील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली आहे. पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये भाजपचे नेते व कार्यकर्त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. लोकांच्या आयुष्यात बदल घडवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. भाजप सर्वच विचारधारांचा आदर करणारा पक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षश्रेष्ठींनी फटकारल्यानंतर तामिळनाडू भाजपला जाग आली आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष टी. सुंदरराजन यांनी आर. मुथूरमनची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्याचा आरोप मुथूरमनवर होता. पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. सर्वच पक्षांनी या घटनांचा विरोध केला असला तरी यावरून राजकारण सुरूच आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: