Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुरेंद्र गुदगे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
ऐक्य समूह
Friday, March 09, 2018 AT 11:40 AM (IST)
Tags: re1
5वडूज, दि. 8 : मायणी, ता. खटाव येथील केबल व्यावसायिक मोहन जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेले जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज येथील न्यायालयाने गुरुवारी फेटाळला.
मायणी येथील केबल व्यावसायिक मोहन जाधव यांनी दि. 26 फेब्रुवारी रोजी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली होती. जाधव यांच्या नातेवाइकांनी या घटनेची फिर्याद मायणी पोलीस दूरक्षेत्रात देताना जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी जाधव यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी तणावपूर्ण वातावरणात गुदगे यांच्या विरोधात मायणी पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुदगे यांनी वडूज येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकारी व बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करताना, सुरेंद्र गुदगे यांच्या विरोधकांनी राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने जाधव यांच्या अपघाती मृत्यूचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे अ‍ॅड. मुकुंद सारडा यांनी सांगितले. जाधव हे मायणी अर्बन बँकेचे कर्जदार होते. कर्जवसुली करण्याचा किंवा त्यासाठी धनादेशाबाबत खटला दाखल करण्याचा बँकेला अधिकार असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. फिर्यादीची बाजू अ‍ॅड. नितीन गोडसे यांनी मांडली. जाधव यांनी मायणी अर्बन बँकेची कर्जफेड 2015 मध्ये करूनही द्वेषबुद्धीने त्यांच्याविरुद्ध धनादेश न वटल्याचा खटला सुरू ठेवण्यात आला होता. जाधव यांनी 30 जून 2017 अखेर करमणूक करही भरल्याचे सिद्ध झाले आहे. सुरेंद्र गुदगे यांचा त्या विषयीचा अर्ज खोटा आहे. गुदगे यांनी जाधव यांना दमदाटी केल्याने त्यांनी त्रासास कंटाळून भीतीपोटी आत्महत्या केली. जाधव यांच्या खिशातील चिठ्ठीबाबत तपास करणे बाकी असल्याने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची   मागणी अ‍ॅड. गोडसे यांनी केली. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. प्रल्हाद सावंत यांनी धनादेश खटल्यातील रोजनामे दाखवून गुदगे यांनी जाधव यांना यापूर्वी दिलेल्या त्रासाची माहिती दिली. तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या सुनावणीसाठी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन सुरेंद्र गुदगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे गुदगे यांना आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागणार आहेत. गुदगे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: