Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शरद पवार-ममता बॅनर्जी एकत्र
ऐक्य समूह
Saturday, March 10, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: na3
5कोलकाता, दि. 9 (वृत्तसंस्था) : भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर भक्कम आघाडी उभारण्यासाठी एकीकडे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झालेल्या असताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली नवी चाल खेळत येत्या 27 आणि 28 मार्च रोजी दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीचे पहिले आमंत्रण पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देण्यात आले आणि त्यांनीही या बैठकीला मी नक्की हजर राहणार, असा शब्द पवारांचे दूत म्हणून गेलेल्या प्रफुल्ल पटेल यांना दिला आहे.
पवारांनी बोलावलेल्या बैठकीचे आमंत्रण देण्यासाठी आज प्रफुल्ल पटेल कोलकाता येथे गेले होते. तिथे त्यांनी ममता यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीनंतर पटेल यांनी चर्चेचा तपशील पत्रकारांना दिला. शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात तिसरी आघाडी उभारण्याचा हे दोन्ही नेते प्रयत्न करणार आहेत. त्यासाठीच दिल्लीत बैठक होत असून या बैठकीला ममता उपस्थित राहणार आहेत, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
पवारांनी तिसर्‍या आघाडीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे ममता यांनी स्वागत केले आहे. 
तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व कोण करणार, हा मुद्दा गौण असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशाला तिसरा सक्षम पर्याय द्यायला हवा व केंद्रात सत्तांतर घडवायला हवे, हे लक्ष्य
घेऊन आपण पुढे जायचे आहे, असे ममतांचे मत असल्याचेही पटेल यांनी नमूद केले. 27 आणि 28 मार्च रोजी होणारी बैठक ही
सुरुवात असेल. त्यानंतर अशा अनेक बैठका होतील व विविध पक्षांची देशपातळीवर मोट बांधण्यात येईल, असेही पटेल यांनी
स्पष्ट केले. दरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
यांनीही राष्ट्रीय पातळीवर भाजप व काँग्रेसविरोधी आघाडी उभारण्याची गरज असल्याचे मत काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले
असून पवार यांच्याकडून राव यांनाही बैठकीसाठी आमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: