Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इच्छामरणाला अखेर परवानगी
ऐक्य समूह
Saturday, March 10, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : इच्छामृत्यूबाबत (पॅसिव्ह इथुनेशिया) सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने इच्छामरणाला परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना काही अटी-शर्तीही ठेवल्या आहेत. न्यायालयाच्या या निकालामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्यांना इच्छामृत्यूचा अधिकार मिळाला आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. के. सिकरी, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला. शेवटचा श्‍वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे. त्याला सन्मानाने मरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने इच्छामरणाला परवानगी दिली आहे. केवळ श्‍वास सुरू आहे म्हणून एखाद्या मरणासन्न व्यक्तीला जिवंत ठेवणे योग्य ठरणार नसल्याचेही न्यायालयाने या निकालात नमूद केले आहे. त्यामुळे अंथरुणाला खिळलेले अर्थात जे मरणासन्न अवस्थेत आहेत  अशा व्यक्तींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हेंटिलेटरवर ठेवता येणार नाही. जर त्यांनी इच्छा मरणाची मागणी केली तर तत्कालीन परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय घेता येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या निर्णयाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून इच्छा मरणाबाबतचे निकष ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. इच्छामृत्युपत्र मॅजिस्ट्रेट समोरच करण्यात यावे. त्यासाठी दोन साक्षीदार असावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 इच्छामृत्युपत्र करण्याच्या अधिकाराबाबत 2005 मध्ये ‘कॉमन कॉज’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. संविधानाच्या अनुच्छेद 21 अनुसार नागरिकांना जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर इच्छामृत्यूचाही अधिकार देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णाला आपण आता बरं होऊ शकत नाही याची जाणीव होईल तेव्हा आपल्याला जबरदस्तीने व्हेंटिलेटरवर ठेवू नये, अशी मागणी ती व्यक्ती करू शकते. त्यावर मरणासन्न व्यक्तीला इच्छा मृत्युपत्र तयार करण्याचा अधिकार दिला जाऊ शकत नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. परंतु वैद्यकीय मंडळाच्या आदेशानंतर मरणासन्न व्यक्तीचे व्हेंटिलेटर काढले जाऊ शकते, असे सरकारने सांगितले होते.
इच्छामृत्युपत्र म्हणजे काय?
 मरणासन्न स्थितीत पोहचल्यावर किंवा शरीर उपचाराला साथ देत नसेल तर कोणत्या पद्धतीने उपचार केले जावेत अथवा करू नयेत, याबाबत एखादी आजारी व्यक्ती त्याची इच्छा मृत्युपत्रात नमूद करू शकते. एखादी मरणासन्न व्यक्ती मृत्यूच्या दारात पोहचल्यास त्याच्यावरील उपचार बंद केले जातात. त्याला इच्छामृत्यू (पॅसिव्ह इथुनेशिया) असे म्हटले जाते.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: