Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोईसर एमआयडीसीत भीषण आग; 3 ठार
ऐक्य समूह
Saturday, March 10, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: mn3
5पालघर, दि. 9 (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी क्षेत्रातील एका कारखान्यात गुरुवारी रात्री बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीन जण ठार झाले असून 12 जण जखमी झाले आहेत. आगीची झळ एमआयडीसीतील इतर तीन केमिकल कारखान्यांना बसल्याने एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. सुमारे दीड तास स्फोटांचे आवाज सुरू होते. या स्फोटांमुळे पालघर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांनाही हादरे बसले. भूकंप झाल्याची अफवा पसरल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली होती.  
बोईसर एमआयडीसीतील झोन सातमध्ये असलेल्या नोवाफिन केमिकल कंपनीच्या कारखान्यात रात्री साडेअकराच्या सुमारास पहिला स्फोट झाला. कारखान्यातील बॉयलरचा हा स्फोट होता. या स्फोटामुळे कारखान्यात भीषण आग लागली. संपूर्ण कारखाना आगीत खाक झाला आणि बघता बघता संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. ही आग शेजारच्या तीन केमिकल कारखान्यांमध्ये पसरल्याने स्फोटांची मालिकाच सुरू झाली. या दुर्घटनेत आरती कंपनीतील पिंटू कुमार गौतम, जनू अडारिया आणि अलोक नाथ या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. आग नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरी मधूनच धुमसणार्‍या आगीवर अग्निशमन दलाचे जवान लक्ष ठेवून आहेत.
...आणि लोक घर सोडून पळाले!
बोईसर एमआयडीसीत झालेले स्फोट इतके भीषण होते, की त्यामुळे सुमारे 20 किलोमीटरचा परिसर हादरून गेला. पालघर शहरासह जिल्ह्यातील उमरोळी, सातपाटी, केळवा व चिंचणीसह अनेक गावांत हादरे जाणवले. भूकंप झाल्याची अफवा पसरल्याने लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागी जमा झाले. सर्वत्र एकच घबराट उडाली होती. मात्र, हा भूकंप नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: