Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन
ऐक्य समूह
Saturday, March 10, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. पतंगराव कदम यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.
पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय
पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात शाळा नसल्याकारणाने पतंगराव कदम यांना 4 ते 5 कि.मी. चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावे लागत होते. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर त्यांनी सातार्‍यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजे याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. 1964 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.
राजकीय कारकीर्द
1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सात वेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
1968 मध्ये ते एस.टी. महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आणि तेव्हापासून गेली 40 हून अधिक वर्षे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. पश्‍चिम महाराष्ट्रातील ‘लोकनेता’ म्हणूनही त्यांचा गौरव झाला.
जून 1991 ते मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री
मे 1992 ते 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)    
ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य
आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री
नोव्हेंबर 2004 पासून पुढे-पुनर्वसन आणि मदतकार्ये या
खात्यांचे मंत्री
प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल,
पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण
मार्च 2009 पासून-कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते
नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन-
वनविभाग
19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य-
वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन.
शनिवारी सकाळी 7 ते 9 यावेळेत पुण्यातील निवासस्थानी व 10.30 ते 11.30 या वेळेत धनकवडी येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: