Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जवानाच्या पत्नीला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणार्‍यास अटक
ऐक्य समूह
Saturday, March 10, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 9 : मिलिटरीमध्ये पती असलेल्या महिलेला बहीण मानत असल्याचे भासवून तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणार्‍याला महिलादिनीच स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गैरफायदा घेण्यास विरोध केल्यानंतर संशयिताने महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली होती. महिलेने तक्रार केल्यानंतर गणेश भरत पवार (वय 36, रा. शाहूनगर) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दिली असून अधिक माहिती अशी, संबंधित महिलेचे पती मिलीटरीमध्ये जवान आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये महिलेची सातारा येथे गणेश पवार याच्याशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर संशयिताने त्या महिलेच्या कुटुंबीयांची सर्व माहिती काढली. महिलेचा पती सातार्‍यात नसल्याने व इतर घरात कोणी नसल्याने त्याने महिलेला बहीण मानत असल्याचे सांगून भावनिक केले. ओळखीनंतर गेल्या काही दिवसांपासून संशयित गणेश पवार हा महिलेला त्रास देवू लागला. त्यातूनच त्याने महिलेचा विनयभंग करुन जवळीक साधण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेच्या लक्षात सर्व प्रकार आल्यानंतर त्यांनी गणेश पवार याला समज दिली. मात्र तरीही गणेश पवार महिलेला वारंवार फोन करुन धमकी देत त्रास देवू लागला. सांगतो तसे न ऐकल्यास तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकीही दिली. या सर्व प्रकारामुळे महिला घाबरली व तिने कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात जावून संशयिताविरुध्द तक्रार दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: