Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विप्लव कुमार देव यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
ऐक्य समूह
Saturday, March 10, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: na2
5आगरतळा, दि. 9 (वृत्तसंस्था) : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर शुक्रवारी विप्लव कुमार देव यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विप्लव कुमार देव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून जिष्णू देव शर्मा यांच्यासह भाजपच्या अन्य नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल तथागत रॉय यांनी मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि भाजप संसदीय बोर्डाचे सदस्य उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री माणिक सरकार हे देखील उपस्थित होते. विप्लव कुमार आणि  पक्षाचे नेते राम माधव यांनी स्वतः जाऊन माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. त्रिपुरा विधानसभेत 60 जागांपैकी भाजपला 35 जागा मिळाल्या आहेत तर भाजपचे मित्रपक्ष जनजाती पार्टी आयपीएफटीला 8 जागा मिळाल्या आहेत. डाव्यांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच भाजपचे दोन तृतीयांश बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. सीपीएमला 16 जागा मिळाल्या असून काँग्रेसला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.
 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: