Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राम मंदिर आहे त्याच जागेवर होणार : जोशी
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: mn5
5नागपूर, दि. 11 (वृत्तसंस्था) : यावेळी त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली. राम मंदिर तर होणारच. त्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराशिवाय आणखी काहीच होणार नाही. जमिनीच्या मालकी हक्काबाबत कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच मंदिर बनविण्याची प्रक्रिया पुढे जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिली.
या मुद्द्यावर सामंजस्याने तोडगा काढण्याच्या प्रयत्नांचंही त्यांनी समर्थन केले. राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वसंमती होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र एवढी वर्ष झालीत  त्यामुळे आता या मुद्द्यावर काही तोडगा निघेल असे वाटत नाही. परंतु तरीही सर्वसंमती होत असेल तर त्याचे स्वागतच करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी चौथ्यांदा निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. 92 वर्षांपासून संघ काम करत आहे. या 90 वर्षांत आम्ही देशभरात 60 हजार ठिकाणांपर्यंत पोहोचलो. केंद्रात भाजपचे सरकार आल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाढला नाही, तर स्वयंसेवकांमुळे संघ वाढला आहे. यावरून लोकही संघाला स्वीकारत असल्याचे स्पष्ट होत आहे. संघावर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा संघ दुप्पट वाढला होता. संघामुळे भाजप 2014 मध्ये सत्तेवर आला असे मी मानत नाही. त्यावेळी परिस्थिती तशी होती. 2019 मध्ये देशातील जनता भाजपच्या पाठीशी उभी राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
पुतळे तोडण्याचा निषेध
यावेळी त्यांनी लेनिन यांचा पुतळा तोडण्याच्या घटनेचा निषेध नोंदविला. लेनिन यांचा पुतळा तोडण्यात आला. त्याचा संघ निषेध करतो. यावेळी त्यांनी केरळात राजकीय हत्या करण्यात आल्याच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले.
आर्थिक घोटाळा हा यंत्रणेचा दोष
पीएनबी बँकेत नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्यावरही त्यांनी भाष्य केले. यंत्रणेतील त्रुटींमुळे हा घोटाळा झाला आहे. अशा घटना सरकारने गंभीरपणे घेतल्या पाहिजेत आणि त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आर्थिक घोटाळेबाज देशाबाहेर पळून जाणे घातक आहे. सरकारने अशा प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देवून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
शेतकर्‍यांचे प्रश्‍न गांभीर्याने सोडवा
शेतकर्‍यांचा लाँगमार्च सोमवारी मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. त्याविषयी विचारले असता सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे संवेदनशीलतेने पाहावे, या प्रश्‍नी सरकारला संवेदनशील व्हावे लागेल. शेतकर्‍यांनीही त्यांच्यात काही सुधारणा घडवून आणाव्यात, असे त्यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: