Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कावेरीचे पाणी कर्नाटककडून प्रदूषित
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: na4
5कर्नाटक, दि. 11 (वृत्तसंस्था) : कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यात वाद सुरू आहे. अशात या वादाला नवे वळण लागले आहे. हे वळण या पाण्याच्या गुणवत्तेपर्यंत गेले आहे. कारण तामिळनाडूत पोहोचणारे कावेरी नदीचे पाणी कर्नाटककडून दूषित केले जाते आहे, असे केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आपल्या अहवालात म्हटले आहे. शुक्रवारी केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या अहवालात कर्नाटकातून तामिळनाडूला जाणारे कावेरी नदीचे पाणी प्रदूषित केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कावेरीच्या उपनद्या असलेल्या थेनपेन्नायर आणि अर्कावती नद्यांचे पाणी तामिळनाडूत पोहोचण्या आधीच प्रदूषित होत आहे. त्यांचे पाणी कावेरीला मिळते त्यामुळे कर्नाटकातून तामिळनाडूत  पोहोचणारे पाणी प्रदूषित असते असे प्रदूषण नियामक मंडळाने म्हटले आहे. तामिळनाडूने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी, कंपन्यांमधून आलेला कचरा नदीत फेकणे यासंबधी कर्नाटक सरकारने उपाय योजले पाहिजेत, असे आदेश न्यायालयाने देण्यासंबंधीची मागणी होती. तामिळनाडूत दक्षिण, पश्‍चिम आणि उत्तर भागातून येणारे पाणी हे लाइफलाइन प्रमाणे आहे.  त्यामुळे ते प्रदूषित नसावे यासाठी ही मागणी करण्यात आली होती. हे पाणी ज्या तामिळनाडूच्या ज्या भागात येते त्यातल्या 20 टक्के जनतेला या पाण्यामुळे प्यायचे पाणी उपलब्ध होते. एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये चालवण्यात येणार्‍या 127 पेयजल योजनांसाठी प्रामुख्याने कावेरी नदीचे पाणीच वापरले जाते. मागील वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांच्या कालावधीत प्रदूषण नियामक मंडळाने कर्नाटक आणि तामिळनाडू येथील कावेरी, थेनपेन्नायर आणि अर्कावती नदीतील पाण्याचे नमुने तपासले होते. कावेरी नदीत तिच्या दोन उपनद्यांचे पाणी मिसळण्याआधी ही चाचणी करण्यात आली होती. यानंतर थेनपेन्नायर नदीचे पाणी प्रदूषित आहे आणि त्यात सुधारणा करण्याची गरज आहे ,असे प्रदूषण नियामक मंडळाने स्पष्ट केले होते. तसेच अर्कावती आणि कावेरी नदीचे पाणीही प्रदूषित असल्याचे प्रदूषण नियामक मंडळाने म्हटले आहे. त्यामुळे कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून असलेला वाद आता दर्जाच्या मुद्द्यावरही वाद होण्याच्या स्थितीतच आला आहे, असेच म्हणता येईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: