Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वृद्धेचे 40 हजारांचे दागिने लांबवले
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 11 : मिलिटरी अपशिंगे (ता. सातारा) येथील वृध्देशी ओळख वाढवत शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञात महिलेने 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना सातारा बसस्थानक परिसरातील सेव्हन स्टार इमारतीजवळ घडली. याची शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, महिलेकडून महिलेची फसवणूक व चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  सातारा शहरात गेल्या अनेक वर्षर्ंपासून अशी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. 
द्रौपदा जर्नादन पांढरे (वय 65, रा. मि. अपशिंगे) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. शनिवारी त्या कामानिमित्त सातारामध्ये आल्या होत्या. काम झाल्यानंतर त्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सेव्हन स्टार कॉम्प्लेक्स परिसरात थांबल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी महिला तेथे आली व तिने रस्ता ओलांडून देते, असे सांगितले. बोलत असतानाच आपले एकच माहेर असल्याची थाप मारत त्या महिलेने ओळख असल्याचे भासवले. अज्ञात महिला बोलत असतानाच द्रौपदा पांढरे यांना परिसरात चोर्‍यामार्‍या होत असल्याने गळ्यातील सोन्याची माळ काढून ठेवा, असे तिने सांगितले. त्यानुसार पांढरे यांनी गळ्यातील 40 हजार रुपयांचा ऐवज काढला. त्यावेळी अज्ञात महिलेने सोन्याची माळ बांधून देते, असे सांगितले व हात चलाखीने ती माळ चोरली. रस्ता ओलांडल्यानंतर ती महिला पांढरे यांना सोडून निघून गेली.  अज्ञात महिला परिसरातून निघून गेल्यानंतर द्रौपदा पांढरे यांना त्यांच्या पर्समध्ये सोन्याची माळ नसल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा तपास फौजदार शेडगे करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: