Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर चर्चेसाठी समितीची स्थापना
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: mn2
सहा मंत्र्यांचा समावेश, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : किसान सभा मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची एक उच्चस्तरीय बैठक रविवारी रात्री वर्षा निवासस्थानी घेतली. आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी घेतला. त्यात एकूण 6 मंत्री असतील. यामध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा समावेश आहे. सोमवारी दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना केले आहे. दरम्यान, परीक्षांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी सोमवारी सकाळी आझाद मैदानाकडे जाणारा मोर्चा रविवारी मध्यरात्री निघणार आहे. रात्री हा मोर्चा सायन येथील सोमय्या मैदानात विश्रांती घेणार होता. मात्र, त्यात हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. तीस हजार शेतकरी आणि आदिवासी समाजातील नागरिकांचा समावेश असलेल्या या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.    
या पाठिंब्याचे मोर्चाच्या नेतृत्वाने स्वागत केले आहे. मात्र, सर्वांसोबतच्या चर्चेसह आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ही आरपारची लढाई असल्याचे मोर्चाचे नेते अशोक ढवळे यांनी सांगितले.
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: