Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सरकारचे मोर्चेकर्‍यांना चर्चेचं निमंत्रण
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: mn1
चर्चेतून सकारात्मक तोडगा निघेल : ना. महाजन
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार करत नाशिकहून पायपीट करत मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल बावट्यातील हजारो शेतकर्‍यांच्या ताफ्याने रविवारी मुलूंड चेक नाका ओलांडला. दरम्यान, सरकारच्यावतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोर्चेकरांची भेट घेऊन चर्चेचे निमंत्रण दिले. सोमवारी यासंदर्भात मोर्चेकरांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. यातून निश्‍चितच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सरकारबरोबर चर्चा जरी सुरू राहिली तरी दुसरीकडे आंदोलनही सुरू राहील, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी दिली.
गिरीश महाजन यांनी रविवारी दुपारी आंदोलकांची भेट घेतली. सरकारच्यावतीने भेट देणारे ते पहिलेच मंत्री ठरले. त्यांनी आंदोलकांना सरकारच्यावतीने चर्चेचे निमंत्रण दिले. चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आंदोलकांशी चर्चा झाली. त्यांना उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेला बोलावले आहे. या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघेल, असा मला विश्‍वास आहे.
आंदोलकांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, आदिवासींचा समावेश आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कोणालाही त्रास न देता हे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी उन्हातान्हाचा विचार न करता मुंबईला आलेत. त्यांच्या मागण्यांचा विचार होईल. चर्चेतून 100 टक्के तोडगा निघेल, असे ते म्हणाले.
दुसरीकडे अजित नवले यांनी सरकारच्या या भूमिकेचे स्वागत केले. देर आये, दुरूस्त आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सरकारने यापूर्वीच जर चर्चा सुरू केली असती तर आज ही वेळ आली नसती. पण आम्हीही चर्चेस तयार आहोत. आमच्या प्रमुख मागण्यांबाबत ठोस आणि लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. तसेच चर्चा जरी सुरू राहिली तरी आंदोलन मात्र थांबणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, शिवसेना आणि मनसे पाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा यांच्यावतीने आयोजित लाँग मार्चला आता काँग्रेसने, राष्ट्रवादीने देखील पाठिंबा दर्शवला आहे. शेतकर्‍यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक-मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकर्‍यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकर्‍यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरद्वारे मांडले आहे.
काय आहेत मागण्या ?
शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी शेतकर्‍यांच्या नावावर कराव्यात, कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय कर्जमाफी, शेती मालाला दीडपट हमीभाव, स्वामिनाथन आयोगातील रास्त शिफारशींची अंमलबजावणी, वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी, या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी 12 मार्चला किसान सभेचा हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. या मोर्चानंतर सरकार शेतकर्‍यांसाठी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: