Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा शी जिनपिंग यांचा मार्ग मोकळा
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:25 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : चीनच्या संसदेने रविवारी राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची निर्धारित मर्यादा संपुष्टात आणली आहे. त्यामुळे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चीनच्या संसदेने दोन कार्यकाळाची अनिवार्यता दोन तृतीयांश बहुमताने संपुष्टात आणली. सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) द्वारे प्रस्तावित सुधारणेस मंजुरी मिळणार हे निश्‍चितच मानले जात होते.
सातत्याने पक्षाच्या प्रस्तावांचे समर्थन करत असल्यामुळे सुमारे तीन हजार सदस्य असलेल्या संसद नॅशनल पीपल्स काँग्रेसला नेहमी रबर स्टँप संसद म्हटले जाते. संसदेच्या वार्षिक सत्राच्या आधीच सीपीसीने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळाची सीमा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. 
तत्पूर्वी, माओत्से तुंग यांच्याप्रमाणे अनिश्‍चित काळापर्यंत एखाद्याकडून सत्ता मिळवण्याचा धोका ओळखून ज्येष्ठ नेते देंग शियोपिंग यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळ म्हणजेच 10 वर्षांपर्यंत सत्तेत राहण्याची मर्यादा निश्‍चित केली होती. दरम्यान, रविवारी झालेल्या संवैधानिक बदलाबरोबरच 64 वर्षी शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे, जो 2023 मध्ये संपणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: