Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माझ्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचे श्रेय जनतेचेच
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: mn4
5रायगड, दि. 11 (वृत्तसंस्था) :   माझ्या पन्नास वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचे श्रेय जनसामान्य जनतेचेच आहे. पन्नास वर्ष संसदीय कामकाज करण्याची संधी त्या जनसामान्यांनी मला दिली असल्याने खरतर त्या जनसामान्यांचा सत्कार होणे गरजेचे आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी रोहा येथे बोलताना केले आहे.
विधानपरिषद, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा तब्बल पन्नास वर्षांचा संसदिय कामकाजाचा प्रदीर्घ कालखंड खा. शरद पवार यांनी पूर्ण केल्याचे औचित्य साधून रोहा येथे आयोजित रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात रोहाचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
खा. पवार म्हणाले, मला राजकारणात मिळालेली संधी ही महाराष्ट्रातील जनतेमुळे मिळाली आहे. राजकारण करताना संकटे येतच असतात परंतु सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी शेवटपर्यंत जपली पाहिजे. समाजातील सर्वात लहान माणसाच्या जीवनात परिवर्तन आणून त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव प्रयत्नशील राहील.  महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचे राज्य आहेे.
देशातील व राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर बोलताना खा. पवार म्हणाले, महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. रायगड जिल्ह्यातील जनता देखील जेथे कर्तृत्व दिसेल त्याच्या पाठीशी जातपात न मानता ठामपणे उभी राहते. योग्य व्यक्तींच्या हाती देशाची व राज्याची सुत्रे सोपविण्यासाठी सर्वांनी सज्ज होणे गरजेचे आहे. शेतकरी कामगार पक्ष हा जिल्ह्यातील महत्त्वाचा पक्ष आहे. रायगड जिल्ह्यातील शेकाप-राष्ट्रवादी आघाडी जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्यास आ. सुरेश लाड, आ. निरंजन डावखरे, आ. अनिल तटकरे, रोहाचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, राजीप अध्यक्षा आदिती तटकरे, पंचायत समितीच्या सभापती विना चितळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, सुनील तटकरे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत तटकरे, राजीप सभापती नरेश पाटील व उमा मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका चिपळूणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: