Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
किरकोळ कारणावरून मित्रानेच काढला मित्राचा काटा
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: lo3
स सातारा नगरपालिका शॉपिंग सेंटरमधील घटना स अवघ्या 8 तासात संशयित गजाआड
5सातारा, दि. 11 : सातारा नगरपालिकेच्या इमारतीखाली असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये शनिवारी मध्यरात्री राजेंद्र बबन सूर्यवंशी (वय 45, रा. घोरपडे कॉलनी, केसकर पेठ सातारा) यांचा त्याचाच  मित्र युवराज उर्फ बाबू रामचंद्र भोसले (वय 34, रा. केसरकर पेठ) याने डोक्यात तीक्ष्ण हत्याराने गंभीर वार करुन निर्घृण खून केल्याचे समोर आले. कोणताही पुरावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या 8 तासात मारेकर्‍याला गजाआड केले. दरम्यान, दारु कमी दिली व जुन्या वादाच्या संशयाच्या कारणातून हा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी सातारा नगरपालिकेच्या शॉपिंग मॉल सेंटरमध्ये एकजण मृतावस्थेत पडला असल्याची चर्चा सातार्‍यात वार्‍यासारखी पसरल्यानंतर तेथे बघ्यांची एकच गर्दी उसळली. स्थानिक गुन्हे अन्वेषण, शहर पोलीस यांनीही घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता मृतदेह अंथरूणावर होता व त्याचा धारदार शस्त्राने खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाच्या शेजारी दारूच्या बाटल्या आणि जेवणाच्या पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. याचवेळी सूर्यवंशी कुटुंबीय घटनास्थळी आल्यानंतर तो मृतदेह राजेंद्र सूर्यवंशी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यानच्या काळात खुनाचे कारण? राजेंद्र सूर्यवंशी तेथे का झोपत होते? खून कशाने झाला? खुनी कोण?  
नेमकी घटना किती वाजता घडली? असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी श्‍वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले. श्‍वान पथकाने मृतदेहापासून ते रस्त्यापर्यंत माग काढला. मात्र पुढे ते तेथेच घुटमळले. राजेंद्र सूर्यवंशी याचा भाऊ शेखर सूर्यवंशी याने पत्रकारांना माहिती देताना सांगितले, की त्याची पत्नी त्याला सोडून पाच ते सहा वर्षांपासून माहेरी मुलांसह रहात होती. राजेंद्र हा पेंटरचे काम करतो. गेले 5 ते 6 वर्षांपासून तो रात्री घरी न झोपता नगरपालिकेच्या इमारतीखाली नव्याने गाळे काढले आहेत तेथेच झोपतो. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे तो जेवण करुन झोपायला गेला असल्याचे मृताचे भाऊ शेखर सूर्यवंशी यांनी सांगितले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून एलसीबीच्या पोलिसांनी तत्काळ तपासासाठी पथके रवाना केली. खुनाची घटना सकाळी समोर आल्यानंतर दिवसभर त्याबाबत सातार्‍यात चर्चा सुरू होती. दिवसभर खुनाचे गूढ असतानाच एलसीबीला अवघ्या 7 तासात खुनाचा छडा लावण्यात यश आले. संशयित बाबू भोसले व मृत राजेंद्र सूर्यवंशी हे मित्र होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दोघे झोपण्याच्या ठिकाणी आले. झोपण्यापूर्वी आणलेल्या दारुवरुन त्यांचा वाद झाला. संशयिताला दारु कमी मिळाल्याने वादाचे पर्यवसन हाणामारीत व त्यानंतर संशयिताने धारदार शस्त्राने वार केला व खुनाच्या घटनेनंतर तो पसार झाला. अखेर सायंकाळी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विकास जाधव, फौजदार प्रसन्न जर्‍हाड, हवालदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, उत्तम दबडे, मुबीन मुलाणी, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, विजय सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: