Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल 59 लाखांची ऐतिहासिक भरपाई
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: lo3
विमा कंपनीला न्यायालयाचा आदेश
5सातारा, दि. 11 : पूर्णवेळ गृहिणीचे काम करणार्‍या विवाहित महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या वारसांना 59 लाख नुकसान भरपाई विमा कंपनीने द्यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा न्यायालयाने दिला.
स्वत:चे कोणतेही उत्पन्न नसलेल्या व संसारी स्त्रीच्या भूमिकेतून दिवसरात्र स्वत:च्या कुटुंबासाठी कार्यमग्न असलेल्या गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई जिल्ह्यातील न्यायालयाच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या न्यायालयीन इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम ठरली आहे.
अर्जदारांतर्फे काम पाहिलेले अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की  कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप महादेव गुरव हे त्यांची पत्नी वैशाली, मुलगी प्रतीक्षा आणि मुलगा प्रतीक यांच्यासह कारमधून दार्जिलिंगकडे जात होते. जाताना वाटेत राईगंज शहराजवळ त्यांच्या कारची समोरून आलेल्या मालट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दिलीप गुरव यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली व मुले गंभीर जखमी झाली होती. या अपघातातून दिलीप गुरव व मुले बचावली; परंतु त्यांची पत्नी वैशाली यांना प्राणघातक दुखापती झाल्याने त्यांचा दुसर्‍या दिवशी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या दोन्ही वाहनांचा विमा न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीकडे उतरविण्यात आला होता. त्यामुळे या अपघाती मृत्यूबद्दल नुकसान भरपाई मिळावी म्हणून वैशाली यांचे वारस असलेल्या दिलीप गुरव व त्यांच्या मुलांनी कराड येथील न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता. गुरव यांनी दिलेल्या अर्जात  वैशाली या पूर्णवेळ गृहिणी होत्या. त्यामुळे त्यांना स्वत:चे कोणतेही उत्पन्न नव्हते. अशा गृहिणींच्या अपघाती मृत्यूबद्दल भरपाईच्या प्रकरणांमध्ये गृहिणींचे उत्पन्न निश्‍चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने व मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमध्ये घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अशा गृहिणीच्या कमवत्या पतीच्या उत्पन्नाचा विचार होऊन पतीच्या उत्पन्नाच्या एक तृतियांश इतकी रक्कम गृहिणीचे गृहित उत्पन्न मानण्यात येते. अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय व मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन या कामी अर्जदारांची  बाजू मांडताना न्यायालयापुढे असे नमूद केले, की दिलीप गुरव हे बँकेत अधिकारी असून अपघाताच्या वेळी त्यांना दरमहा एक लाखांपेक्षा जास्त पगार होता. त्यामुळे स्वत:चे कोणतेही उत्पन्न नसलेल्या त्यांच्या पत्नी वैशाली यांचे गृहित उत्पन्न हे त्यांच्या पगाराच्या कमीत कमी एक तृतियांश इतके म्हणजेच 33 हजार दरमहा इतके धरून त्यानुसार अर्जदारांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. अर्जदारांच्या मागणीला विमा कंपनीतर्फे जोरदार विरोध करण्यात येऊन अशा गृहिणीचे गृहित उत्पन्न जास्तीत जास्त दरमहा 3 हजार इतके धरावेे.
वैशाली यांची साथ, प्रोत्साहन व पार पडलेल्या कौटुंबिक जबाबदार्‍यांमध्ये यांचा मोलाचा वाटा होता. या बाबींचा विचार करून कराड येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश सी. पी. गड्डम यांनी वैशाली यांचे गृहित उत्पन्न दरमहा 33 हजार इतके धरून त्यानुसार एकूण 44 लाख अधिक अर्ज दाखल तारखेपासून होणारे व्याज 15 लाख, अशी एकूण 59 लाख इतकी नुकसान भरपाई अर्जदार दिलीप गुरव व मुलांना न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीने द्यावी, असा आदेश दिला आहे
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: