Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्वाचा संगम असलेला नेता हरपला!
ऐक्य समूह
Tuesday, March 13, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: mn2
पतंगराव कदम यांना विधिमंडळात भावपूर्ण श्रध्दांजली
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : सर्वसामान्याचे नेतृत्व निर्माण करून महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात स्वतंत्र ओळख करणारे आणि शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा तिहेरी संगम असलेल्या नेत्यास महाराष्ट्र मुकला अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना भावना व्यक्त करताना गहिवरून आले. सभागृहात कदम यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य पतंगराव कदम यांचे निधन झाल्यामुळे सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या पतंगराव कदम यांच्या प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अवघ्या 20 व्या वर्षी पतंगराव कदम यांनी पुणे येथे भारती विद्यापीठाची स्थापना करून गोरगरिबांसाठी शिक्षणाची गंगा सुरू केली. ते प्रयोगशील, शिक्षणतज्ञ, समाजसेवक म्हणून कार्यरत राहिले. सांगली जिल्ह्यातील पलूस विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले. सामान्य शिक्षक ते कुलपती हा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असा आहे. ते शिक्षणाचे प्रचारक व प्रसारक होते. सर्वांना सोबत घेवून चालण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. हसत खेळत काम करण्याचा त्यांचा स्वभाव होता. खुल्या मनाने व दिलाने ते मदत करत. त्यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. ते आपल्यातून निघून जातील, असे कधीही वाटले नाही. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांच्या अकाली जाण्याने  महाराष्ट्राला शाप लागला की काय असे वाटते. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या सामान्यांचे नेतृत्व करणारे नेते जमिनीपासून आकाशापर्यंत पोहोचतात व निघून जातात. त्यांची ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे प्रतोद शंभूराज देसाई, चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, काँग्रेसचे अमित देशमुख, जयकुमार गोरे, गोपाळ अग्रवाल, सुनील केदार, दीपिका चव्हाण, कुपेकर, प्रशांत ठाकूर, सुनील जगताप, आर. टी. देशमुख, उल्हास पाटील, सुजित मिंचेकर, सुभाष पाटील, शरद सोनवणे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कॅन्सर रोगाला आळा घालण्यासाठी धोरण ठरवा
विधानसभेतील सहकारी आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्या अकाली जाण्यामुळे सभागृहापर्यंत कॅन्सर येवून पोहोचला आहे. जीवन पध्दती बदलण्याची आवश्यकता आहे. औषध फवारणी केलेला भाजीपाला पोटात जात असल्यामुळे दुर्धर आजाराचा सामना करावा लागत असल्यामुळे औषधी फवारणी विरोधी कायदा करून औषधींवर बंदी आणणे आवश्यक आहे. सभागृहात या विषयावर चर्चा घडवून आणावी, त्याकरता समिती गठीत करावी, कॅन्सरला आळा घालण्यासाठी धोरण ठरविणे आवश्यक आहे, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शोक प्रस्तावाचे वाचन करून सभागृहात श्रध्दांजली अर्पण केल्यावर विधानसभेचे आजचे कामकाज तहकूब केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: