Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नेपाळमध्ये विमान कोसळून 50 प्रवाशांचा मृत्यू
ऐक्य समूह
Tuesday, March 13, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: na2
5काठमांडू, दि. 12 (वृत्तसंस्था) : नेपाळमधील काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना एक विमान कोसळलेे. विमानात 67 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर होते. हे विमान यूएस-बांग्ला एअरलाईनचे होते. त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पूर्वेकडील भागात जाऊन हे विमान कोसळल्याची माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे. जळालेल्या अवस्थेतील काही मृतदेह विमानाच्या अवशेषांमधून बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, या दुर्घटनेत किमान 50 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने सैन्याच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने दिले आहे. हे विमान ढाक्काहून काठमांडूला निघाले होते. उतरण्याच्या वेळी विमान धावपट्टीच्या दिशेने झुकले आणि जवळच्या फुटबॉल मैदानावर जाऊन आदळले. विमानातून धुराचे लोट निघत होते. या अपघातानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांना वाचविण्याचे कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. आत्तापर्यंत 17 जखमी प्रवाशांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती पर्यटन मंत्रालयाचे सहसचिव सुरेश आचार्य यांनी दिली. बचावकार्यात नेपाळच्या सैन्याची देखील मदत घेण्यात आली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: