Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे निवडणुकीत रंगत
ऐक्य समूह
Tuesday, March 13, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवण्यात येणार्‍या सहा जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार रिंगणात उतरवल्याने रंगत आली आहे. भाजपने प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन यांच्याबरोबरच महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना चौथा उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. भाजपने त्यांची उमेदवारी कायम ठेवली तर मतांची बेरीज जुळवण्यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. 15 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून तेव्हाच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार विजयासाठी किमान 42 मतांची आवश्यकता लागणार आहे. मतांचा कोटा पाहता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. शिवसेनेच्यावतीने माजी खासदार अनिल देसाई यांना तर काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसने वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभीमान संघटनेचे नेते नारायण राणे व केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांच्याबरोबरच महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनाही रिंगणात उतरवून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. राणे, मुरलीधरन, रहाटकर तसेच केतकर यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज भरले. 
त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती.
भाजपकडून तीन जागांसाठी चौथा उमेदवार रहाटकर यांना रिंगणात उतरवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी एका पक्षाचा उमेदवार धोक्यात आणला आहे. याउलट शिवसेनेचे विधानसभेत 63 आमदार असून त्यांच्याकडून अनिल देसाई 42 मते मिळवून सहज विजयी होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडे 21 अतिरिक्त मते असून ती मते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपचे 122 आमदार सभागृहात आहेत. त्यामुळे भाजपने उभे केलेले उमेदवार प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन हे उमेदवार सहज विजयी होणार आहेत. तर चौथ्या उमेदवारासाठी शिवसेनेची अतिरिक्त मते आणि अपक्षांच्या मतांची जुळवाजुळव करून भाजप चारही जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र, 15 मार्च रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी हे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपने आपल्या चौथ्या उमेदवाराचा अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे.
काँग्रेसकडे 42 आमदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले. तर नितेश राणे, कालिदास कोळंबकर हे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस पक्षात असले तरी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील याचा काँग्रेसला भरवसा नाही. त्यामुळे काँग्रसकडे फक्त 39 मते शिल्लक राहतात. काँग्रेसचे उमेदवार कुमार केतकर यांना विजयासाठी तीन मते कमी पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत 41 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि बंडखोर आमदार रमेश कदम हे दोघेही तुरुंगात आहेत. यापैकी भुजबळांची तब्येत ठीक नसल्याने ते राज्यसभेसाठी मतदान करतील की नाही याबाबत साशंकता आहे. तर रमेश कदम हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करतील की नाही याची शाश्‍वती नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांची सारी भिस्त ही अपक्ष आमदार व छोट्या पक्षांच्या आमदारांवर राहणार आहे.
राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार
भाजप : प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन, विजया रहाटकर.
शिवसेना : अनिल देसाई.
काँग्रेस : कुमार केतकर.
राष्ट्रवादी काँग्रेस : वंदना चव्हाण.
विधानसभेतील संख्याबळ
भाजप : 122, शिवसेना : 63, काँग्रेस : 41, राष्ट्रवादी काँग्रेस : 41, शेकाप : 3, बहुजन विकास आघाडी : 3, एमआयएम : 2, मनसे : 1, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष : 1, भारिप बहुजन महासंघ : 1, राष्ट्रीय समाज पक्ष : 1, समाजवादी पक्ष : 1, अपक्ष : 7.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: