Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

जीवनव्रती पुरातत्त्वशास्त्रज्ञ
vasudeo kulkarni
Friday, March 30, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: vi1
भारतासह जगातल्या प्राचीन संस्कृतीचा, मानव आणि प्राणी जीवनाच्या उत्क्रांतीचा शोध-वेध घेण्यासाठी डॉ. मधुकर केशव उर्फ म. के. ढवळीकर यांनी अर्धशतक अथक संशोधन आणि अभ्यास केला होता. भारतातल्या पुरातत्त्व संशोधनाला त्यांनी नवी दिशा दिली होती. आपण सांगतो तोच इतिहास आणि तेच सत्य, असा हटवादीपणा त्यांच्याकडे कधीच नव्हता. प्राचीन साहित्यातील पुरावे आणि उत्खननात मिळालेल्या विविध अवेशषांची सांगड घालून ते संशोधनाचे सिद्धांत मांडत. नवे पुरावे मिळाल्यावर आपल्याच जुन्या निष्कर्षात सुधारणाही करायची त्यांची तयारी असे. मानवजातीच्या इतिहासाशी संबंधित असलेल्या प्रागतिक संस्कृतीचे संशोधन आणि दर्शन घडवायसाठी त्यांनी भारत आणि ग्रीसमध्ये झालेल्या उत्खननातही भाग घेतलेला होता.
16 मे 1930 रोजी पाटस येथे जन्मलेल्या ढवळीकर यांनी 1958 मध्ये पुणे विद्यापीठातून इतिहास आणि पुरातत्त्व विषयातील एम. ए. पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली. पुरातत्त्व शास्त्रात संशोधन करून ते पीएच. डी. झाले. नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व शास्त्र या विषयाचे ते काही काळ प्राध्यापक होते. केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या मानवशास्त्र विभागातही त्यांनी काही काळ नोकरी केली. पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि नंतर ते संचालकही होते. विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत पुरातत्त्व शास्त्र शिकवण्यात या विषयाची गोडी लावण्यात ते कुशल होते. केवळ वर्गातच नव्हे, तर उत्खननाच्या जागांवर विद्यार्थ्यांना नेऊन त्यांनी अभ्यासाला प्रत्यक्ष संशोधनाचीही जोड दिली. पुणे जिल्ह्यातल्या इनामगाव येथे डेक्कन कॉलेजतर्फे झालेल्या उत्खननात त्यांनी 15 वर्षे सातत्याने संशोधन केले होते. इंडियन आर्किओलॉजिकल सोसायटीचे सचिव, रांची येथील सायन्स काँग्रेसच्या पुरातत्त्व आणि मानववंश शास्त्र विभागाचे अध्यक्ष सोलापूरमध्ये झालेल्या इतिहास परिषदेचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. क्यूबातील हवाला विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ, अशा ख्यातनाम संस्थांत त्यांनी अध्यापन केले होते. ग्रीस आणि भारतातील संस्कृतीचा विकास एकाच कालखंडात झाल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत. त्यामुळेच ग्रीस-मधील पेला येथे झालेल्या उत्खननात त्यांना मुद्दाम बोलावून घेण्यात आले होते. ते स्वत: पुरातत्त्व शास्त्रातले ख्यातनाम संशोधक आणि प्रकांडपंडित होतेच, पण त्यांनी याच शास्त्रात अनेक विद्यार्थीही घडवले. 2011 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान केला होता. महाराष्ट्राची कुळकथा, भारताची कुळकथा, कोणे एके-काळी सिंधु संस्कृती, नाणकशास्त्र, पुरातत्त्व विद्या यासह त्यांचे 27 ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय पुरातत्त्व शास्त्राच्या संशोधनाला नवी दिशा देणारा संशोधक हरपला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: