Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

मानवी तस्करीचे काळे विश्‍व
ऐक्य समूह
Friday, March 30, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: st1
पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी याला पतियाळाच्या स्थानिक न्यायालयाने मानवी तस्करीसाठी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे साहजिकच संगीत आणि कलाक्षेत्रात खळबळ उडाली. दलेरवर 2003 मध्येच गुन्हा दाखल झाला असला तरी आता तो सिद्ध झाल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. त्या निमित्ताने अवैध मानवी वाहतूक आणि मानवी तस्करी याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे
दलेर मेहंदी हा खरे तर प्रचंड लोकप्रियता लाभलेला कलाकार. त्याच्या अनेक गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. त्याचे कार्यक्रम जबरदस्त लोकप्रिय होत असल्याने लोक त्याला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी गर्दी करत असत. परंतु आता हा गायक गुन्हेगार असल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आश्‍चर्य आणि निराशा व्यक्त होत आहे. मानवी तस्करी केल्याबद्दल दलेरला शिक्षा झाली आहे. साहजिकच त्याने नेमके काय आणि कसे केले याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. मानवी तस्करी आणि अवैध मानवी वाहतूक यामध्ये फरक मानला जातो. जबरदस्तीने कामगार म्हणून काम करण्यासाठी, लैंगिक गुलामगिरीसाठी किंवा व्यापारी लैंगिक छळाच्या हेतूने मानवी वाहतूक करणे अशी अवैध मानवी वाहतुकीची शास्त्रशुद्ध व्याख्या केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे, तर शारीरिक किंवा लैंगिक शोषणाच्या हेतूने अवैधरीत्या लोकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवले जाण्याला अवैध मानवी वाहतूक म्हणतात. यासाठी देशांतर्गत आणि परदेशात केल्या जाणार्‍या मानवी वाहतुकीचाही समावेश होते. अवयवांची किंवा ऊतींची तस्करी, जबरदस्तीने विवाह करणे, सरोगसी करण्यास भाग पाडणे या गोष्टींचाही यात समावेश होतो. मात्र अवैध मानवी तस्करी ही अवैध मानवी वाहतुकीपेक्षा भिन्न असते. यामध्ये दुसर्‍या व्यक्तीला स्वेच्छेने विनंती करून किंवा विकत घेऊन किंवा कामावर ठेवून घेऊन त्यांची आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे चोरटी वाहतूक करण्याचा समावेश होतो. सहसा अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला किंवा संबंधित देशात कायदेशीर मार्गांनी प्रवेश मिळणे
शक्य नसते.
पैसे घेऊन स्थलांतर
दलेर मेहंदी आणि त्याच्या भावाला 2003 मध्ये मानवी तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याने आणि त्याचा भाऊ शमशेर मेहंदी यांनी आपल्याला कॅनडामध्ये स्थलांतर करण्यास मदत करण्यासाठी पैसे घेतल्याची तक्रार पंजाबमधील बलबेहरा गावातील बक्षीस सिंग नावाच्या व्यक्तीने पतियाळा पोलिसांकडे केली होती. त्यावरून पोलिसांनी दलेर आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आणखी 35 जणांनी अमेरिकेत बेकायदा स्थलांतर करण्यास मदत करण्यासाठी या दोघांनी पैसे घेतल्याच्या तक्रारी दाखल केल्या आणि पोलिसांनी त्यांच्या विरोधात 31 खटले दाखल करण्यात आले. नुकतीच या प्रकरणी दलेरला दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. शमशेरचा गेल्या वर्षी मृत्यू झाला आहे. मेहंदी बंधूंनी 1998 आणि 1999 मध्ये संगीताच्या कार्यक्रमासाठी दोन संच नेले होते. त्यापैकी दहा लोकांना गटाचे सदस्य असल्याचे दाखवून बेकायदेशीररीत्या तिथेच सोडण्यात आले होते. दलेर मेहंदीने अमेरिकेच्या दौर्‍यात सॅनफ्रान्सिस्को इथे गुजरातच्या तीन मुलींना सोडले होते. काही अभिनेत्यांसह 1999 मध्ये केलेल्या अमेरिकेच्या दौर्‍यात या बंधूंनी न्यू जर्सी येथे तीन मुलांना सोडले होते. 1998-99 मध्ये त्यांनी अशा प्रकारे 10 लोकांना परदेशात सोडून दिले, असेही आरोप त्यांच्यावर होते.
आंतरराष्ट्रीय टोळ्या
एकूणच, या प्रकरणामुळे जगभरच चिंताजनक मानल्या गेलेल्या मानवी तस्करीचा विषय पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. सहसा या प्रकारांमध्ये महिला आणि मुले यांचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. या प्रकाराची मुळे प्राचीन काळापासूनच गुलामगिरीच्या प्रथेत दडल्याचे दिसते. त्या अर्थाने ही आधुनिक काळातील गुलामगिरीची प्रथा आहे असे म्हटले जाते. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी मानवी तस्करी करण्याचे प्रमाण बरेच वाढवल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करी हा शब्द स्थलांतरितांची तस्करी यासाठीही वापरला जातो. स्थलांतरितांची रस्ते, सागरी किंवा हवाई मार्गाने तस्करी करण्याचा यात समावेश होतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिक किंवा इतर भौतिक लाभासाठी व्यक्तीला ती ज्या राष्ट्राची नागरिक नाही तिथे बेकायदेशीरपणे स्थलांतरित
करणे म्हणजे मानवी तस्करी असे म्हटले जाते.
मानवी तस्करीत आंतरराष्ट्रीय टोळ्या प्रचंड पैसा मिळवतात. 2014 च्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आकडेवारीनुसार, संबंधितांनी अशा तस्करीतून सुमारे 150 अब्ज अमेरिकन डॉलर एवढा नफा कमावला होता. मानवी तस्करी बेकायदेशीरच आहे. मात्र यामध्ये त्या व्यक्तीचे लैंगिक किंवा शारीरिक शोषण करण्याचा हेतू असतोच असे नाही. बर्‍याचदा संबंधित ठिकाणी त्या व्यक्तीला पोहोचवल्यानंतर ती व्यक्ती तिथे तिच्या मनाप्रमाणे वागण्यास स्वतंत्र असते, असे व्याख्येनुसार म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात तस्करी झालेल्या स्थलांतरितांनाही धमक्या, छळ, गैरवापर आणि मृत्यू यांना तोंड द्यावं लागण्याची अनेक प्रकरणे असल्यामुळे मानवी तस्करीचे गांभीर्य अवैध वाहतुकीपेक्षा तसूभरही कमी होत नाही.
नफेखोरीचा धंदा
तस्करीच्या प्रकारांमध्ये वैयक्तिकपणे काम करणार्‍या अनेक लोकांचे जाळे असते. या गुन्ह्यांचे समाजावर दूरगामी आर्थिक आणि कायदेशीर परिणाम होत असतात. मात्र, या समस्येवर कोणत्याही देशाला कायमस्वरूपी किंवा खरे तर प्रभावी तोडगा शोधता आलेला नाही. त्यामुळे अनेक देश आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट बनवले जावे, या मुद्द्यावर वेळोवेळी भर देत आहेत. 2015 मध्ये सीरियात सातत्याने सुरू असलेल्या नागरी युद्धामुळे मानवी तस्करीला ऊत आला होता. अशा प्रकारे सीरियातून युरोपमध्ये सुमारे 10 लाख लोक स्थलांतरित झाल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीवरून दिसते. या वर्षी सुमारे 3800 हून अधिकजणांचा मानवी तस्करीत
मृत्यू झाल्याचेही या अहवालात
म्हटले आहे. मानवी तस्करीच्या भयावह परिणामांचे हे केवळ एक उदाहरण आहे. दलेरने केलेली अवैध वाहतूक ही मानवी तस्करी आहे, असे तक्रारकर्त्यांनी केलेल्या तक्रारींमध्ये मांडलेल्या मुद्द्यांवरून दिसते. या लोकांनी आपल्याला परदेशात पोहोचवावे म्हणून त्याने मागणी केलेली रक्कम स्वेच्छेने दिली आहे. त्यांना त्यांच्या विनंतीनुसार तिथे पोहोचवले गेले असते तर कदाचित हा अवैध व्यवहार असाच चोरटेपणाने अनेक वर्षं तसाच सुरूही राहिला असता. त्यामुळे साहजिकच हे लोकही गुन्हेगारच आहेत. दलेरने आणि त्याच्या भावाने अमेरिकेत सोडून दिल्या गेलेल्या लोकांचे पुढे काय झाले याचा तपास झाला का, असल्यास ते कुठे आहेत, आणखी किती लोकांना अशा प्रकारे त्याने सोडून दिले होते याविषयीचे तपशील जाहीर झालेले नाहीत.
दलेरने आपल्या प्रसिद्धीचा आणि कलेचाही गैरफायदा घेतला यात शंकाच नाही. साहजिकच इथे असा प्रश्‍न उपस्थित होतो, की दलेरच्या कलाकार संचातील सर्व लोक परत आले का आणि आले नसतील तर ते कुठे राहिले याची चौकशी होत नव्हती का? ज्यावेळी अनेक कलाकार अशा प्रकारे दौर्‍यांसाठी परदेशी जातात त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील लोकांच्या संख्येची जाताना आणि परत आल्यावर चौकशी होत नाही का? तसे असेल तर ही बाब गंभीर आहे आणि खात्रीशीर चौकशी केली जात असेल तर या प्रकरणी तक्रार दाखल होण्या-आधीच हे प्रकार उघड का झाले नाहीत? कलेच्या आड अशा प्रकारे गुन्हेगारी करणारे लोक कलेच्या क्षेत्राला काळिमा तर फासतातच; शिवाय कायदेशीर पळवाटा शोधून त्यावर पांघरूणही घालतात. त्यामुळे अशा प्रकारांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. विशेषतः अशा प्रकारे परदेशातून येणारे फक्त कलाकारच नव्हे; तर इतर लोकही वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या देशातही अशा
प्रकारे लोकांना सोडून देतात का हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. जगभरच दहशतवाद्यांच्या सुरू असलेल्या वाढत्या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर तर हे प्रकार अधिकच गंभीर बनतात यात शंका नाही.
   - संजय साळुंखे
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: