Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

विद्यार्थ्यांचा छळ
vasudeo kulkarni
Friday, March 30, 2018 AT 10:53 AM (IST)
Tags: ag1
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) मंडळाकडून याच महिन्यात घेतल्या गेलेल्या बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र आणि दहावीचा गणिताचा पेपर फुटल्याने या दोन्ही विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय या मंडळाने जाहीर केल्याने, या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्या देशभरातल्या 27 लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास आणि छळाला सामोरे जावे लागते आहे. गेल्या काही वर्षात देशभरात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम दर्जेदार आणि गुणवत्तेचा असल्याचा बोलबाला-गाजावाजा समाजात झाल्याने, हा अभ्यासक्रम शिकवणार्‍या माध्यमिक शाळांची संख्याही प्रचंड वाढली आणि ती सातत्याने वाढतेच आहे. यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 5 मार्चला सुरू करण्यात आल्या होत्या. 26 मार्च रोजी बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची आणि 28 मार्चला दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणित विषयाची परीक्षा दिली. पण या दोन्ही विषयांच्या प्रश्‍नपत्रिका व्हॉटस्अ‍ॅप, सामाजिक माध्यमात फुटल्याचे निष्पन्न झाल्याने या दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द करायचा निर्णय या मंडळाने घेतला. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होवू नये आणि या परीक्षांच्या अभ्यासक्रमांचा दर्जा कायम राहावा, यासाठीच हा फेरपरीक्षांचा निर्णय मंडळाने घेतल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले आहे. या पेपरफुटीच्या प्रकरणात नेमके कोण सहभागी आहेत आणि या प्रश्‍नपत्रिका कशा फुटल्या हे पोलिसांकडून झालेल्या चौकशीनंतर बाहेर येईल. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. वास्तविक केंद्रीय माध्यमिक शिक्षण आणि अन्य राज्यातील माध्यमिक मंडळांच्या प्रश्‍नपत्रिका फुटणे मंडळांच्या विश्‍वासार्हतेला चूड लावणारे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे होय. यापूर्वीही काही विद्यापीठांच्या, मंडळांच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्याच्या घटना घडलेल्या होत्या. बिहारमध्ये तर काही वर्षांपूर्वी शाळा-महाविद्यालयात राजरोसपणे परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपीच्या घटना घडत असत. सामूहिक कॉपी रोखायसाठी  बिहार सरकारने कडक उपाययोजना अंमलात आणल्यावर कॉपीचे आणि सामूहिक कॉपीमुळे त्या विषयांच्या फेर परीक्षा घ्यायचे सत्र कमी झाले. ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी किंवा प्रश्‍नपत्रिका फुटल्याच्या घटना पूर्वी घडत होत्या, त्याच केंद्रावरील त्या विषयांच्या परीक्षा रद्द करून, त्याच केंद्रापुरत्या फेरपरीक्षा घेतल्या जात असत. पूर्वी प्रश्‍नपत्रिकांच्या झेरॉक्स आणि सोडवलेल्या उत्तरपत्रिका कॉपीसाठी काही परीक्षा केंद्रातल्या विद्यार्थ्यांना कॉपीसाठी दिल्या जात असल्याचे प्रकार घडत होते. या सामूहिक कॉपी प्रकरणात केंद्र संचालक, पर्यवेक्षक सामील असल्याचेही चौकशीनंतर निष्पन्न झाले होते. कॉपी आणि प्रश्‍नपत्रिका फुटणे हा शैक्षणिक विश्‍वाला कलंक लावणारा आणि लक्षावधी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी क्रूर खेळ करणारा प्रकार असला तरी पेपर फुटीच्या घटना काही पूर्णपणे रोखल्या जात नाहीत, हे सरकार आणि माध्यमिक शिक्षण मंडळांचे अपयश होय!        ंर्
सामाजिक माध्यमांचा गैरवापर
  काही वर्षांपूर्वी परीक्षा केंद्रातून चोरलेल्या किंवा फोडलेल्या प्रश्‍नपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती काढून, त्या विकून कोट्यवधी रुपये कमवणार्‍यांच्या टोळ्या देशभरात होत्या. या टोळ्यातले गुन्हेगार शिक्षण मंडळ आणि विद्यापीठातल्या संबंधिताशी हातमिळवणी करून प्रश्‍नपत्रिका परीक्षांच्या आधी मिळवत असत आणि त्या विकून आपले उखळ पांढरे करीत असत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी त्यांचे काही देणे-घेणे नव्हते. केंद्र आणि राज्य सरकारांच्या पोलीस खात्याने या कॉपीबहाद्दर आणि प्रश्‍नपत्रिका विकणार्‍या टोळ्यांचा विध्वंस केला. या गोरख धंद्यात काही क्लासवालेही सामील असल्याचे या घटनात उघड झाले होते. शालेय मंडळ आणि विद्यापीठांच्या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका अत्यंत गुप्त आणि सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांना पाठवल्या जातात. ज्या विषयाची परीक्षा असेल, त्याच विषयाची प्रश्‍नपत्रिका परीक्षा केंद्रावर-परीक्षा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना वाटली जाते. प्रश्‍नपत्रिकांचे हे पाकीट सीलबंद असते. प्रश्‍नपत्रिका जिथे छापल्या जातात, त्या मुद्रणालयातही कडक सुरक्षा व्यवस्था असते. प्रश्‍नपत्रिका फुटू नयेत यासाठी अशी  खबरदारी घेऊनही त्या फुटतात आणि ज्या विद्यार्थ्यांचा या पेपरफुटीशी काहीही संबंध नसतो, त्यांच्यावर फेरपरीक्षेची शिक्षा सक्तीने लादली जाते. निरपराध विद्यार्थ्यांचा असा छळ करणारी ही शिक्षण आणि परीक्षा पद्धती असली तरी त्यात काही सुधारणा मात्र होत नाहीत, ही बाब सरकारला आणि शिक्षण मंडळे, विद्यापीठांनाही लाजिरवाणी होय. गेल्या काही वर्षात भारतात स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला. देशाच्या कानाकोपर्‍यात व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक या सह अन्य अ‍ॅपद्वारे फुटलेल्या प्रश्‍नपत्रिकांची छायाचित्रे क्षणार्धात सर्वत्र पोहोचू शकतात. त्यामुळेच केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या फुटलेला प्रश्‍नपत्रिका देशभरात कुठे कुठे प्रसारित झाल्या, हे शोधणे तसे खूपच अवघड असल्याने या मंडळाने देशातल्या सर्वच केंद्रातल्या दहावी आणि बारावीच्या फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा पुन्हा घ्यायचे जाहीर केले आहे. दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा देशातल्या 18 लाख 38 हजार आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची परीक्षा 11 लाख 86 हजार विद्यार्थ्यांना द्यावी लागेल. ज्या बहुतांश विद्यार्थ्यांनी वर्षभर अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिल्या त्यांना प्रश्‍नपत्रिका फुटीच्या शिक्षेचा तडाखा बसणार आहे. प्रश्‍नपत्रिका फोडायच्या या गुन्ह्यात सामील असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी! पण, न केलेल्या गुन्ह्याची अशी कठोर शिक्षा लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी का घ्यायची या उत्तर मात्र सरकार आणि हे मंडळ देत नाही. ुया आधी लाच घेऊन काही विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणायचा पराक्रम बिहार राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने केला होता. राज्यातल्या अनेक परीक्षा आणि प्रश्‍नपत्रिका फुटींचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले होते. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ, मात्र  अशा घटनांना परीक्षा पद्धतीतल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारापासून अलिप्त होते. आता तेही या घोटाळ्यात सापडल्याने देशातल्या शिक्षण आणि परीक्षा पद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उभे
राहिले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: