Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

मायेची सावली हरवली
vasudeo kulkarni
Friday, March 30, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: lolak1
वटवृक्षाचे झाड आपल्या आश्रयाला आलेल्या सार्‍यांना सावली देते. पण, हे झाड मात्र उन्हा-पावसात, वार्‍या-वादळात ताठपणे उभे असते, याची जाणीव त्या वृक्षाच्या छायेत असलेल्यांना नसते. पण, हा वटवृक्ष जेव्हा कोसळतो, तेव्हा मात्र अथांग आकाश दिसायला लागते आणि आपल्याला मायेची सावली, आधार देणारा हा वटवृक्षच आता जगात राहिला नसल्याच्या जाणिवेने, त्या वटवृक्षाच्या मायेच्या छायेत असलेल्यांना ‘सैरभैर’ या शब्दाचा खरा अर्थ आणि कटू वास्तव कळते. सौ. सुमन तुकाराम कुलकर्णी यांच्या निधनाने त्यांच्या गणगोत आणि कुलकर्णी कुटुंबातल्या सार्‍याच मित्र परिवाराला त्यांचे जग सोडून जाणे, चटका लावणारे ठरले आहे. टी. डी. वहिनी या नावाने कोल्हापूर, सांगली, बेळगाव परिसरात सर्वपरिचित असलेली ही माउली वयोमानानुसार थकली होती. पिकले पान कधीतरी गळतेच, हे जीवनसत्य असले, तरी ते कळूनही उमजत मात्र नाही. आपण आता पोरके झालो, याची हळवी जाणीव मात्र त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वच परिवाराला झाली आहे.
तुकाराम दत्तात्रय उर्फ टी. डी. कुलकर्णी यांच्या त्या पत्नी. टी. डी. साहेब नावाप्रमाणेच तुकाराम महाराज! मुंबईच्या ऑर्थररोड तुरुंगाचे ते तुरुंगाधिकारी होते. पुढे कोल्हापुरात आले आणि कारखानदार झाले. त्या काळात कोल्हापूरची शिवाजी उद्यमनगरी वारंवार मंदीच्या लाटेत सापडत असे. टी. डी. साहेब मुख्य भागीदार असलेल्या जयभवानी आयर्न वर्क्सचे 14 भागीदार होते. त्या सार्‍यांना सांभाळून घेत ते हा उद्योग व्यवस्थित चालवित. आर्थिक प्राप्ती मात्र फारशी होत नसे. तरीही त्या तुटपुंज्या मिळकतीत टी. डी. वहिनी संसार आणि परिवार व्यवस्थित-मायेने सांभाळत. त्या अन्नपूर्णा होत्या. घरी ओळखीचे आणि अनोळखी असे कुणीही येवो, त्यांना त्या दोन घास आग्रहाने खायला घालत. टी. डी. साहेबांना पुस्तकांचे प्रचंड वेड. कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतल्या विठ्ठलकृपा या तीन खोल्यांच्या भाड्याच्या घरात सारी पुस्तकेच पुस्तके होती. पुस्तके ठेवायला घरात जागाच उरली नाही, तेव्हा गॅलरीतल्या पिंपात पुस्तके सुरक्षित ठेवली जात. पुस्तके विकत घेणे आणि आवडलेली पुस्तके आपल्या मित्र परिवाराला भेट द्यायचा छंद असलेल्या टी. डी. साहेबांना वहिनींनी सदैव साथ दिली. टी. डी. साहेब तत्त्वनिष्ठ. नीतिमूल्यांची प्रचंड चाड असलेल्या टी. डी. साहेबांनी तेव्हा अर्थमंत्री असलेल्या मधू दंडवते यांनाही तारा करून जाब विचारीत. तीस वर्षांपूर्वी टी. डी. साहेबांनी वाङ्मय चर्चामंडळ सुरू केले. पण त्याचा व्याप आणि ताप मात्र वहिनींनीच हसतमुखाने सहन केला. आल्या संकटाने त्या कधी खचल्या नाहीत आणि संपत्तीचा अहंकारही त्यांना कधी झाला नाही. टी. डी. आणि टी. डी. वहिनी हे अद्वैत होते. टी. डी. साहेबांच्या लहरी सांभाळत त्यांनी संसार करताना, त्यांच्या ‘जोडूनिया धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनानुसार आपल्या पतीने सामाजिक कार्यासाठी मुक्तहस्ते दिलेल्या लाखो रुपयांच्या दानाचाही कधी गवगवा केला नाही. 25 वर्षांपूर्वी टी. डी. साहेबांना अचानक प्रकृतीचा त्रास झाला. रुग्णालयात ठेवावे लागले. तेव्हा या माउलीने ते  बरे होईपर्यंत 3 दिवस अन्नपाणीही वर्ज्य केले होते. ज्येष्ठ साहित्यिक बाबा पाटील, मधू भोसले यांच्यासह अनेक साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांची त्यांच्या घरी वर्दळ असे. पण, त्यांची ऊठबस करताना आणि त्यांना जेवू घालताना वहिनींनी कधीच नाराजी दाखवली नाही.
अतिथी देवो भव हा त्यांच्या संसाराचा मूलमंत्र होता. आपल्या लाडक्या नातवाचे गिरीशचे गंभीर आजारपण, त्याला नवसंजीवनी द्यायसाठी मुलगा कमलाकरने केलेले दिव्य, सूनबाईची धावपळ आणि नातसूनेच्या संसारात अचानक आलेले संकट संपेपर्यंत सार्‍यांनाच धीर दिला. मुलगा आणि सी. ए. असलेल्या नातवाचा उद्योग-व्यवसाय उत्तम चालल्याचेही त्यांना अतीव समाधान होते. जगदंबेच्या कृपेने सर्व काही ठीक आहे, आता फक्त वय साथ देत नाही, एवढेच त्या म्हणत. कोल्हापूरच्या दुधाळी येथील छोट़्या सदनिकेत येथील ज्येष्ठ समर्थ रामदासांच्या दासबोधाचे सदैव पारायण आणि त्याची शिकवण सर्वार्थाने आचरणाता माउलीच्या सावलीला-आशीर्वादाला पारखे झाले. गणगोत त्यांच्या मायेच्या रुणात राहील.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: