Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

माहिती चोरीमुळे राजकारणीही गोत्यात
ऐक्य समूह
Tuesday, April 03, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: st1
फेसबुकच्या माहिती चोरीचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात अगोदर काँगे्रसवर आरोप झाले. त्यानंतर काँग्रेसने भाजपवर आरोप केले. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असले, तरी प्रत्यक्षात काँग्रेसला या प्रकरणात थोडे सबुरीने घ्यावे लागेल, असे दिसत आहे. प्रचारा-साठी मदत घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसने प्रचाराचे काम एका कंपनीला दिले होते. त्यावरून हा पक्ष अडचणीत आला आहे
 देशात सध्या माहिती चोरीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. यापूर्वी आधार कार्डाची माहिती सुरक्षित नव्हती. आता नागरिकांची कोणतीही माहिती कोणत्याही संस्थेकडे सुरक्षित असेल, याची शाश्‍वती राहलेली नाही. बँकांकडे असलेल्या खात्यांची माहितीही मध्यंतरी हॅक करण्यात आली होती. त्यातून नागरिकांच्या खात्यातले पैसे गायब होण्याचे प्रकार घडले होते. तंत्रज्ञान बदलले तसतसे त्याचा गैरवापर करण्याचे प्रकारही घडले आहेत. माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी केल्या जाणार्‍या उपायांपुढे जाऊन या माहितीची चोरी करून त्याचा गैरवापर स्वहितासाठी करण्याकडे कल वाढला आहे. मध्यंतरी ठाण्याच्या रजनी पंडित यांना अटक करण्यात आली. त्यांनी तर नागरिकांचेे कॉल डिटेल्स मिळवून त्याचा वापर
अन्य कारणासाठी केला होता. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणार्‍या याचिकांमागेही माहितीची चोरी करण्याची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. श्रीमती पंडित यांनी जसा माहितीचा गैरवापर केला तसाच गैरवापर अन्य संस्थाही करतात. नागरिकांची खासगी माहिती त्यांच्या परवानगीशिवाय अन्य कुणीही,कशासाठीही वापरू नये, असा नियम आहे. परंतु, आता सर्वांचा कल संकेत, नियम धाब्यावर बसवून स्वहित जोपासण्याकडे आहे. त्यात समाजमाध्यमेही मागे नाहीत. व्हाटॅस्अ‍ॅप, ट्विटर, यू ट्यूब, फेसबुक आदी माध्यमांमध्ये नागरिकांची खासगी माहिती सातत्याने पडत असते. त्यात नागरिकांची बँक खाती, क्रेडिट कार्डांचे व्यवहार तसेच नागरिकांचे सध्याचे ठिकाण, त्यांच्या हालचाली, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आदींची माहितीही मिळत असते. या माहितीचा वापर करून एखाद्याचे जीवनही उद्ध्वस्त केले जाऊ शकते. तंत्रज्ञान क्षेेत्रातील लोक त्याला दुजोरा देतात. खासगी गुप्तहेरही लोकांच्या या खासगी माहितीचा उपयोग करू शकतात.
महत्त्वाचे समाजमाध्यम
फेसबुक हे सध्याचे जगातले महत्त्वाचे समाजमाध्यम आहे. एकट्या भारतात त्याच्या वापरकर्त्यांची संख्या सुमारे वीस कोटी आहे. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप ही परस्परविरोधी माध्यमे. त्यांच्यात स्पर्धा आहे. वेगवेगळ्या सुविधा, वेगवेगळ्या सोयी देण्याची या दोन माध्यमांमध्ये स्पर्धा आहे. एखाद्याने एखादी सेवा दिली, की दुसरे माध्यम त्यापेक्षा अधिक चांगली वेगळी सेवा देण्याचा प्रयत्न करत असते. तसेच एखाद्या माध्यमाची काही चूक झाली की त्यावर दुसरे माध्यम तुटून पडत असते. फेसबुककडे नागरिकांचा डाटा होता. खासगी बाब सार्वजनिक करायची नसते. परंतु, पैशासाठी कोणीही, कुठल्याही थराला जायला तयार होते. आपल्या अशा दुष्कृत्यामुळे आपल्याला काम देणार्‍या संस्था अडचणीत येऊ शकतात, याचे भानही या संस्थांना राहत नाही. काँग्रेसचीही तीच अडचण झाली आहे. डेटाचोरीच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर काँग्रेसने एक पाऊल मागे घेत ‘प्ले स्टोअर’वरून आपले अ‍ॅप हटवले. यावरून भाजपने पुन्हा काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस आणि राहुल गांधी काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवाल भाजपने केला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत अ‍ॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती सिंगापूरमधील विदेशी कंपन्यांना पुरवल्याचा आरोप भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटद्वारे केला होता. त्यांच्या मते काँग्रेसने गुजरात निवडणुकांमध्येही लोकांची माहिती चोरी करून रणनीती आखली होती. आता कर्नाटकमध्येही काँग्रेस हेच करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
माहितीचा गैरवापर
झुकरबर्ग यांनी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करत यूजरच्या माहितीच्या गैरवापरावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटनमधील जवळपास सर्वच राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी पूर्ण पान जाहिरातींद्वारे माफीनामा प्रसिद्ध केला. या माफीनाम्यात त्यांनी म्हटले आहे, ‘तुमच्या माहितीचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. हे आम्हाला करता येत नसेल तर आम्ही अपात्र ठरत आहोत. तुमचा विश्‍वास आम्ही तोडला असून याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे असे घडणार नाही. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. फेसबुकने नियम बदलले असून यापुढे तुमची व्यक्तिगत माहिती बाहेर जाणार नाही. झुकरबर्ग यांनी गेल्या आठवड्यात जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करत यूजरच्या माहितीच्या गैरवापरावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. या जाहिरातीत माहितीचा गैरवापर करणार्‍या केंब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीचा उल्लेख नाही.
या जाहिरातीत  म्हटले आहे, की मोठ्या प्रमाणात डेटाचा अ‍ॅॅक्सेस असलेल्या सर्व अ‍ॅॅप्सची तपासणी करण्यात येत आहे. ती शोधून बंद करण्यात येतील आणि त्याची माहिती जाहीर करण्यात येईल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या माहितीचा गैरवापर करत आहेत, ही बाब आता नवीन राहिलेली नाही. परदेशी  कंपन्या या माहितीचा गैरवापर करतात. राहुल गांधी सिंगापूरहून आल्यानंतर सिंगापूरच्याच एका कंपनीने फेसबुकमधील माहितीचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले. काँग्रेसने अ‍ॅप डिलीट केल्यानंतर भाजप स्वस्थ बसला नाही. आधी  भाजप बॅकफूटवर होता. आता काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. त्यापूर्वी फेसबुकवरील 5 कोटी युजर्सचा डेटा चोरल्याच्या प्रकरणात वादामध्ये सापडलेली केंब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीची हिंदुस्थानातील वेबसाईट केंद्र सरकारनं बंद केली. ‘एससीएल इंडिया’ या कंपनीकडून ही वेबसाईट चालवली जाते. 10 राज्यांमध्ये या कंपनीचं काम सुरू असून या कंपनीत 300 पूर्णवेळ कर्मचारी आणि 1400 सहयोगी कर्मचारी काम करतात. अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान केंब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीवर फेसबुकवरील युजर्सचा डेटा चोरल्याचा आरोप आहे. या लोकांची माहिती तपासून केंब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीने ट्रम्प यांच्या बाजूची माहिती त्यांच्या फिडमध्ये ढकलण्यास सुरुवात केली होती. अध्यक्षीय निवडणुकी-च्या दरम्यान ट्रम्प यांना अनुकूल असे मत तयार करण्यात या डेटा चोरीचा उपयोग झाला. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या कंपनीचे काँग्रेसशी कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे कंत्राट काँग्रेसने या कंपनीला दिले असल्याचा दावा प्रसाद यांनी केला आहे. फेसबुकने हिंदुस्थानच्या निवडणुकीमध्ये ढवळाढवळ केल्यास त्यावर सरकार कठोर कारवाई करेल, असा इशाराही प्रसाद यांनी दिला आहे. खरे तर गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसने या कंपनीला काम दिले. परंतु, त्यात काँग्रेसने कुठेही अशी माहिती चोरल्याचे किंवा माहितीचा गैरवापर केल्याचे प्रकरण पुढे आलेले नाही. परंतु, हाती आयतं कोलित आल्याने भाजपने त्याचा वापर काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी केला. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही याबाबत आपल्या कंपनीकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. ‘या प्रकरणात विश्‍वासघात झाला आहे’ असे त्यांनी आपल्या निवेदनामध्ये स्पष्ट केले. फेसबुकवर अ‍ॅप्स निर्मात्यांना अनेक अ‍ॅप्समधून युजर्सची माहिती मिळते. अशा अ‍ॅप्सवर कठोर नियंत्रण आणणार असल्याचे झुकरबर्ग यांनी जाहीर केले आहे. तसेच भारतातील निवडणुका नि:पक्षपाती होण्यासाठी फेसबुक कटिबद्ध असल्याचे आश्‍वासनही झुकरबर्ग यांनी
दिले आहे.
गोपनीय माहिती
2014 मध्ये काही संशोधकांनी विदेशात प्रश्‍नमंजूषेचे आयोजन केले. त्यामुळे फेसबुकवरील लाखो लोकांची गोपनीय माहिती बाहेर आली. गेल्या आठवड्यात या प्रकरणी झुकरबर्ग यांनी केलेल्या वक्तव्यावर युुरोप आणि अमेरिकेतील तपास यंंत्रणांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. शिवाय त्यांना फेसबुक युजर्सच्याही प्रखर रोषाचा सामना करावा लागला होता. डेटा चोरीत आणखीही काही लोक किंवा कंपन्या असू शकतात. त्याचाही तपास आता केला जात आहे. या प्रकरणी सुरुवातीला एका ब्रिटिश कंपनीवर आरोप करण्यात आला होता, पण माफीच्या जाहिरातीत या कंपनीचा झुकेरबर्ग यांनी कुठेही उल्लेख केला नाही. राहुल गांधी यांनी त्यांचा डेटा सर्व जगासाठी खुला केला होता. हा डाटा माओइस्ट, दंगलखोर, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसाठी काँग्रेसने खुला केला का, अशी टीका मालवीय यांनी केली होती. देशातील लोकांचा काँग्रेसकडे असलेला डाटाही ते अशाच पद्धतीने खुला करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तिसर्‍या पक्षाला कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्याचे काहीच कारण नाही, असे भाजपने म्हटले आहे. त्यातही केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी तर काँग्रेसनं नमो अ‍ॅप डिलीट करण्याऐवजी चुकून काँग्रेस अ‍ॅप डिलीट केले, असे उपरोधाने म्हटले. फेसबुकवरील माहिती चोरी प्रकरण काँग्रेसच्या चांगलंच अंगलट आले आहे. माहिती तंत्रज्ञानाबाबत मागची काही वर्षं काँग्रेस बरीच पिछाडीवर होती. आता कुठे काँग्रेस याबाबत जागरूक होत आहे. त्याचा वापर युवकांना आकर्षित करण्यासाठी केला जात असतानाच आता माहिती चोरी प्रकरणाशी संबंधित कंपनीला काम दिल्याचे प्रकरण उघडकीस आल्या-नंतर काँग्रेसला काहीसे बॅकफूटवर जावे लागले आहे.
 - अजय तिवारी
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: