Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

डॉ. आंबेडकरांच्या नावाचा नवा वाद
vasudeo kulkarni
Tuesday, April 03, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: vi1
उत्तर प्रदेश सरकारने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात दुरुस्ती करायचा आदेश काढल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. आतापर्यंत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेच नाव देशवासीयांना परिचित असताना, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मात्र त्या नावात दुरुस्ती करून त्यांच्या नावाचा वापर त्यांच्या वडिलांच्या नावासहित म्हणजेच डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असा केला जावा, असे आदेश काढले आहेत. सरकार दरबारी डॉ. बी. आर. आंबेडकर आणि डॉ. भीमराव आंबेडकर असा त्यांच्या नावाचा वापर केला जात असे. महाराष्ट्रात मुलानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लिहायची पद्धत असल्यामुळे, यापुढे परंपरेनुसारच डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा वापर केला जावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य प्रशासन आणि अलाहाबाद-लखनौ उच्च न्यायालयाच्या खंडपीठालाही या आदेशाची माहिती देण्यात आली आहे.
लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने डॉ. आंबेडकर यांच्या नावात ठरवून ही दुरुस्ती केल्याचा डॉ. आंबेडकरवादी संघटना आणि राजकीय पक्षांचा आरोप आहे. पण, सरकारने मात्र या नावाच्या दुरुस्तीत काही राजकारण नाही, राज्यघटनेच्या प्रतीवर डॉ. आंबेडकर यांनी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अशी पूर्ण नावानेच सही केल्याचे सरकारने जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे या नावाच्या दुरुस्तीबाबत विशेष आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी गेले वर्षभर मोहीमच उघडली होती. केंद्र सरकारशी त्यांनी याबाबत पत्र व्यवहार केल्याचा खुलासाही सरकारने केला आहे.
राज्यातील भाजप सरकार दलित नेत्यांच्या श्रद्धा स्थाना बाबत राजकारण करून दलितांची मतपेढी आकर्षित करून घेत आहे, असा दलित संघटनांचा आरोप आहे. समाजवादी पक्षाचे नेते अनुराग भदोरिया यांनी सरकारच्या या निर्णयावर जाहीर  टीका केली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मात्र हा आरोप फेटाळताना, या निर्णयाचा वेगळा अर्थ लावू नये, असे आवाहन केले आहे.
डॉ. आंबेडकर यांनी घटनेवर पूर्ण नावाने सही केली असली , तरी काही ठिकाणी त्यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर   अशीही सही केलेली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव वडिलांच्या नावासह म्हणजेच पं.जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे लिहिले जात नाही. महात्मा गांधीजींचे नावही पूर्ण लिहिले जात नाही. उत्तर भारतात काही नेत्यांची नावे अशी संक्षिप्तच लिहिली जातात, पण महाराष्ट्रात वडिलांच्या नावासह पूर्ण नाव लिहिले जात असल्याचा दाखला देत, सरकारने ही दुरुस्ती केली आहे. या निर्णयाचे साद-पडसाद उत्तर प्रदेशसह देशातल्या राजकारणातही उमटत असले, तरी आदित्यनाथ सरकारने मात्र या निर्णयाचे समर्थन करीत, आपला निर्णय पुढे रेटायचा निर्धार केला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: