Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हाफिजची ‘एमएमएल’ दहशतवादी संघटना घोषित
ऐक्य समूह
Wednesday, April 04, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: na4
अमेरिकेच्या निर्णयाचे भारताकडून स्वागत
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि ‘जमात-उद-दावा’चा म्होरक्या हाफिज सईदने स्थापन केलेल्या ‘मिल्ली मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षाला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. याशिवाय ‘तेहरिक-ए-आझादी-ए-काश्मीर’ या संघटनेलाही अमेरिकेने दहशतवादी
संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचे भारत सरकारने स्वागत
केले आहे.
हाफिज सईदच्या ‘मिल्ली मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षाला अमेरिकेने मंगळवारी दणका दिला.  हा राजकीय पक्ष दहशतवादी संघटना असून त्याच्याशी संबंधित सात जणांनाही अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले. ‘लष्कर-ए-तोयबा’चे डावपेच उधळून लावून त्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ही कारवाई केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’ने स्वत:ला काहीही म्हणून घेतले तरी ती दहशतवादी संघटना आहे. अमेरिका ‘तोयबा’ला राजकारणात येऊ देणार नाही, असे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेचे समन्वयक नॅथन सेल्स यांनी सांगितले. या कारवाईनंतर आता अमेरिकेला ‘तोयबा’ची संपत्तीही जप्त करता येणार आहे. ‘तोयबा’ पाकिस्तानमध्ये सक्रिय असून या संघटनेचे दहशतवादी पाकमध्ये सभा घेऊन निधी गोळा करतात. दहशतवादी हल्ल्यांचे प्रशिक्षणही देतात, असे सेल्स यांनी सांगितले.
दरम्यान, हाफिजने ‘मिल्ली मुस्लीम लीग’च्या नोंदणीसाठी पाकच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता.
या अर्जाला पाकच्या गृह मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या एखाद्या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देऊ नये, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने हाफिजचा अर्ज रद्द केला होता. आता अमेरिकेच्या कारवाईमुळे त्याची कोंडी
झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: